Nashik News : राजकारण आणि युद्धात प्रत्येक डाव टाकताना ध्येय आणि लक्ष्य स्पष्ट असेल तरच टाकला जातो. माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap News) यांनी शिवसेना गटात प्रवेश केला. तो अनेकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. त्यातील राजकीय ध्येय आणि लक्ष्य दोन्हीही बुचकाळ्यात टाकणारे आहेत. बबन घोलप यांनी देवळाली मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून 1985 मध्ये पहिल्यांदा उमेदवारी केली होती. त्यावेळी त्यांचे चिन्ह होते मशाल. 1990 मध्ये ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा विजयी झाले. तेव्हापासून 2019 पर्यंत या मतदारसंघात शिवसेनेने त्यांना संधी दिली होती.
शिवसेनेची (Shiv Sena) आमदारकी सलग तीस वर्ष त्यांच्या कुटुंबात होती. या कालावधीत त्यांची कन्या महापौर देखील झाली. बबन घोलप उपनेते होते. शिर्डी मतदारसंघाबाबतच्या (Shirdi Constituency) काही निर्णयामुळे वरिष्ठांशी त्यांचे वाद झाले होते. त्यामुळे त्यांचे पद काढून घेण्यात आले होते. घोलप यांच्या मते याबाबत पक्षाने त्यांना विश्वासात घेतले नाही. ही त्यांची तक्रार आहे. त्यातूनच त्यांनी शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला आहे.
घोलप यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशामुळे घोलप यांच्या पदरात काय पडणार? शिंदे गटाला काय लाभ होणार? आणि घोलप यांच्या पश्चात दुसऱ्या पिढीच्या राजकारणाचे काय होणार? असे प्रश्न सध्या नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेत.
घोलप यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांचे चिरंजीव माजी आमदार योगेश घोलप अद्यापही ठाकरे गटातच आहेत. त्यांची दुसरी कन्या तनुजा भोईर ही भारतीय जनता पक्षात आहे. या तिघांचेही कार्यक्षेत्र देवळाली मतदारसंघ आहे. यामध्ये योगेश घोलप आगामी निवडणुकीसाठी (Election) शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उमेदवारी मागू शकतात. तनुजा भोईर या भाजपकडून इच्छुक आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
घोलपांच्या अस्तित्वाची लढाई
एकापेक्षा अधिक पक्ष एकाच कुटुंबातील किती जणांना उमेदवारी देऊ शकेल? हा एक राजकीय प्रश्न आहे. बबन घोलप यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे घोलप कुटुंबियांची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर देखील कमी होणार आहे. परिणामी योगेश घोलप यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्याच ठाकरे गटातील अन्य प्रतिस्पर्धी गटांकडून उघड उघड आव्हान मिळू शकते. त्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत येईल, हे वेगळे सांगायला नको.
देवळाली मतदारसंघाचा विचार करता तीस वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या घोलप यांचे ठोस असे राजकीय अस्तित्व दाखविणारे घटक नाहीत. सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संधी देऊन किती मोठे करतात याचे उदाहरण म्हणून घोलप यांच्याकडे बोट करता येते. या मतदारसंघात भगूर नगरपालिका शिवसेनेच्या विजय करंजकर यांच्या वर्चस्वाखाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे राजकारण सध्या भाजपच्या हाती आहे. ग्रामीण भागातील आदिवासी पट्टा काँग्रेसच्या अधिपत्याखाली आहे. पंचायत समितीत ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत घोलप यांचे काय? हा प्रश्नच आहे.
अहिरे, भुजबळांचा प्रचार करणार?
देवळाली मतदार संघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे मोठ्या मताधिक्याने योगेश घोलप यांचा पराभव करून विजयी झाल्या होत्या. त्यांचे पूर्ण राजकारण घोलप विरुद्ध अन्य सर्व असे होते, आता येत्या निवडणुकीत महायुती कायम राहिल्यास नैसर्गिक न्यायाने देवळाली मतदारसंघात विद्यमान आमदार अहिरे यांना उमेदवारी मिळेल, अशा स्थितीत योगेश घोलप त्यांच्या विरोधात उमेदवार असू शकतात त्यामुळे त्यांच्या विरोधात सातत्याने राजकारण केले त्या अहिरे यांच्या प्रचाराचा झेंडा बबन घोलप यांना घ्यावा लागेल. ही वेळ त्यांच्यावर आल्यास तो काळाने घेतलेल्या राजकीय सूड ठरू शकतो
आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) असतील. छगन भुजबळ हे अजित पवार गटाचे नेते आहेत. दुसरीकडे भुजबळ आणि घोलप हे एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आहेत. या स्थितीत घोलप भुजबळ यांचा प्रचार करणार का? हा देखील दुसरा प्रश्न आहे.
फायदा राष्ट्रवादीला
घोलप यांनी जरी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी, त्याचा लाभ मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला अधिक होऊ शकतो. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचे राजकीय भवितव्य काय? हे आगामी काळात स्पष्ट होईल. घोलप यांच्या मते ते गेल्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेचे काम करीत आले आहेत. आता उतारवयात त्यांच्यावर पक्षांतराची वेळ आली आहे. राजकारणात देखील वीस ते पंचवीस वर्षांनी नवी पिढी उदयास येत असते. घोलप यांच्या कुटुंबातही नवी पिढी राजकारणात सक्रिय आहे. त्यांना वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. आमदारकीची स्वप्न पडत आहेत. अशा स्थितीत घोलप यांनी केलेले पक्षांतर कितपत लाभदायी ठरेल, हे सांगता येत नाही.
घोलप अखिल भारतीय चर्मकार संघटनेचे नेते आहेत. त्या दृष्टीने शासनाचे एखादे महामंडळ पदरात पाडून घेण्यासाठी कालचे पक्षांतर उपयुक्त ठरेल. मात्र देवळाली मतदारसंघात या पक्षांतराने त्यांची राजकीय प्रतिष्ठा आणि प्रतिमा उज्वल होईल का? याचे उत्तर मात्र थोडेसे अवघडच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.