Narendra Modi VS INDIA Alliance : राजधानीच ताब्यात, 'एनडीए'ला बारा हत्तींचं बळ; मोदींची तिसरी टर्म सुसाट, इंडिया आघाडी 'बॅकफूट 'वर..!

NDA Government : वर्षअखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत देशातील 21 राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे एनडीएला बळ मिळाले आहे. भाजप आणि एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या आता 19 झाली आहे.
Narendra Modi, Arvind kejriwal
Narendra Modi, Arvind kejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवत भाजपने तब्बल 27 वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले आहे. याद्वारे एनडीएची एकूण 19 राज्यांत सत्ता आली आहे. लोकसभा निवडणुकीत स्बबळावर स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या भाजपने त्यानंतर झालेल्या विविध राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकीत मोठे यश मिळवत आपली पकड घट्ट केली आहे. हालचाल करू पाहणाऱ्या मित्रपक्षांकडे आता शांत राहण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिलेला दिसत नाही.

लोकसभेच्या 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्रात सलग तिसऱ्यांदा भाजपप्रणित एनडीएची सत्ता आली आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. मात्र या निवडणुकीत एनडीएच्या जागा घटल्या. स्वबळावर स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे भाजपची स्थिती कमकुवत झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षांचा भाजपला टेकू घ्यावा लागला. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे. बिहारवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे.

यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांनीही केंद्र सरकारकडून विविध मागण्यांची पूर्तता करून घेतली आहे. अर्थसंकल्पात बिहारसाठी हात ढिला सोडणाऱ्या सरकारने महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र हात आखडता घेतल्याची टीका विरोधकांकडून झाली. एकतर बिहारमध्ये वर्षखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे, दुसरे म्हणजे महाराष्ट्रात एकट्या भाजपला बहुमताच्या जवळ जाणारा आकडा मिळाला आहे. त्यामुळे मित्रपक्ष कोणत्याही प्रकारची हालचाल करू शकत नाहीत. हे लक्षात घेतल्यास भाजपने दिल्ली जिंकली, याचे राजकीय महत्व किती मोठे आहे, हे लक्षात येईल.

Narendra Modi, Arvind kejriwal
Delhi Assembly Result : काँग्रेसने आपचा बदला घेतला....तब्बल 14 जागांवर केले नुकसान

लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर 8 राज्यांत विधानसभेची निवडणूक झाली. त्यात आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर, ओडिशा, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडचा समावेश आहे. यापैकी आंध्र प्रदेश, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आली. केंद्रात सत्तेत एकत्र असले तरी सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप आणि एसकेएमची युती तुटली होती. जम्मू-काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्स आणि जेएमएम आघाडीची सत्ता आहे.

दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर भाजप आणि एनडीएची (NDA) शक्ती वाढली आहे, भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार असलेले दिल्ली हे देशातील 19 वे राज्य ठरणार आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांत भाजपची स्वबळावर सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या भाजपला दिल्ली निवडणुकीतील यशामुळे एकप्रकारचा 'बूस्टर' मिळाला आहे. एनडीएची शक्ती वाढली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना भाजप आणि मित्रपक्षांचा आत्मविश्वास या यशामुळे वाढणार आहे.

Narendra Modi, Arvind kejriwal
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी दिल्ली जिंकल्यानंतरचं भाषण गाजवलं; अण्णा हजारेंचीही आठवण काढली

एनडीएची परीक्षा यानंतर आता बिहारमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. नितीशकुमार यांचा पलटी मारण्याचा अनुभव पाहता त्या चर्चांना बळ मिळत होते. अर्थसंकल्पात बिहारवर झालेला योजनांचा वर्षाव आणि भाजपला दिल्लीत मिळालेले यश, यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत बिहारमधील 40 पैकी 30 जागा एनडीएला मिळाल्या होत्या.

पुढील तीन वर्षांत 21 राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी. तमिळनाडू, केरळ या राज्यांत 2026 मध्ये निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांत 2027 मध्ये निवडणूक होणार आहे. 2028 मध्ये 10 राज्यांत विधानसभेची निवडणूक होईल.

त्यात हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, कर्नाटक, त्रिपुरा, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोराम, राजस्थान आणि छत्तीसगढचा समावेश आहे. दिल्ली निवडणुकीच्या निकालामुळे पुढील तीन वर्षांत होणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी एनडीएला बळ मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com