Mumbai News: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढत शिवसेनेच्या दोन गटातच होत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अमोल गजानन कीर्तीकर आणि शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसने नऊ वेळा आपल्या ताब्यात ठेवला आहे.
यापैकी पाच वेळा अभिनेते सुनील दत्त आणि एकदा प्रिया दत्त यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेकडून मधुकर सरपोतदार आणि गजानन कीर्तीकर यांनी प्रत्येकी दोन वेळा तर जनता पक्षाकडून राम जेठमलानी यांनी इथून दोन वेळा मैदान मारले आहे.
लोकसभेत या निवडणुकीत (North West Mumbai Loksabha 2024) आता या मतदारसंघातील लढत शिवसेनेच्या दोन गटांत होत असल्याने विशेष लक्षवेधी बनली आहे. निष्ठावान आणि गद्दार असे शिवसेनेचे दोन भाग झाले, या परिस्थितीत मूळ शिवसैनिक कुणाच्या पाठीमागे उभे राहतात, हे निकालानंतर स्पष्ट करणारी ही निवडणूक आहे.
महायुतीच्या उमेदवारासोबत भाजप हा प्रमुख पक्ष आहे तर फारसा प्रभाव नसलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), वंचित आघाडी सोबत आहेत तर महाविकास आघाडीसाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी तसेच आम आदमी पार्टीची साथ आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल, यात शंका नाही.
ईडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटातील नेते रवींद्र वायकर (Ravindra waikar) यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ईडी चौकशीनंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी वायरकरांच्या विरोधात दंड थोपटले आहे.
वायकर हे ईडीच्या अटकेला घाबरून शिंदे गटात गेले असल्याचा बोलले जाते. त्यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आग्रहामुळे ते मैदानात उतरले आहेत.
अमोल किर्तीकर यांचे वडील खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत. वडील खासदार असल्यामुळे अमोल हे दहा वर्षांपासून जनतेच्या संपर्कात आहेत. तर वायकर यांचे कागदोपत्री पारडे आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले वायकर ३५ वर्षांपासून शिवसेनेत आहेत. त्यांनी तीन वेळा विधानसभा, चार वेळा महापालिका निवडणुका चांगल्या मतांनी जिंकल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मतदारसंघात एकूण १७ लाख ३५ हजार ८८ मतदार असून गेल्या पाच महिन्यांत २८ हजारांच्या संख्येने वाढ झाली आहे. यापैकी ६० टक्के उत्तर भारतीय, २० ते २२ टक्के मराठी व मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार अशी विभागणी आहे. यात उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरणार आहेत.
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडे सुनील प्रभू (दिंडोशी) आणि ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व) असे दोनच मतदारसंघ आहेत, तर विद्या ठाकूर (गोरेगाव), डॅा. भारती लव्हेकर (वर्सोवा), अमित साटम (अंधेरी पश्चिम) तसेच रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व) हे चार मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.