Shashi Tharoor News : शशी थरूर यांनी एका दगडात मारले दोन पक्षी; दोघांचीही झेप मोठी...

Overview of Operation Sindoor and Its Objectives : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. पण भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकला पळताभूई थोडी केली.
Shashi Tharoor
Shashi TharoorSarkarnama
Published on
Updated on

राजकारण आणि अन्य देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठीची रणनीती यामध्ये मोठा फरक असतो. त्याला आपण कुटनीती म्हणतो. परराष्ट्र मंत्रालयाचे हे काम. सर्वसामान्य जनतेसमोर परराष्ट्र धोरणातील फारसे बारकावे येत नाही किंबहुना ते येऊही दिले नाहीत. मंत्री, अधिकाऱ्यांकडून फारतर 10-15 टक्के माहितीच मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहचवली जाते. बंद दाराआडच दोन देशांमध्ये रणनीती ठरत असते. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यात मुरलेले आहेत, हे सुरूवातीलाच स्पष्ट करायला हवे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. पण भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकला पळताभूई थोडी केली. त्यानंतर पाककडूनच शस्त्रसंधी म्हणजे सीझफायरसाठी बोलणी सुरू करण्याचा प्रस्ताव आला. चर्चेअंती शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब झाले. पण दोन्ही देशांकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याआधीच अमेरिकेतेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियातून याची माहिती दिली अन् इथूनच राजकारण तापू लागले.

आपण केलेल्या मध्यस्थीमुळे सीझफायरचा निर्णय झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. त्यांचा हा दावा भारतासाठी आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक असाच होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बुधवारी (ता. ५) निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘ट्रम्प यांनी मोदीजींना फोन केला आणि म्हणाले, ‘काय सुरू आहे? नरेंदर सरेंडर’. मोदीही होय सर म्हणाले आणि त्यांच्या सूचनांचे पालन केले.’’

Shashi Tharoor
महुआ मोइत्रांमुळे राजकीय करिअर संपले तरीही सूर जुळले!

पाकचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असेलले शशी थरूर विविध देशांत भारताची बाजू ठामपणे मांडत आहेत. त्यांना स्वपक्षातील नेत्यांकडूनच टीकेला सामोरे जावे लागत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करत ते भारताची भूमिका परखडपणे मांडत आहेत. राहुल यांच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेलाही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. थरूर यांचे हे उत्तर म्हणजे केवळ राहुल गांधीच नव्हे तर ट्रम्प यांनाही प्रत्युत्तर आहे.

याचअनुषंगाने थरूर यांना अमेरिकेतच प्रश्न विचारण्यात आला. ट्रम्प यांच्याकडून होत असलेल्या मध्यस्थीच्या दाव्यावर भारताची भूमिका ठाम आहे का? तुमच्या पक्षाकडूनही हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे, असे विचारणा थरूर यांना करण्यात आली होती. त्यावर त्यांना एकाने याबाबत तिथेच राहुल गांधींच्या संरेडर विधानाचीही आठवण करून दिली.

Shashi Tharoor
Rahul Gandhi News : राहुल गांधींना कोर्टाने धरले धारेवर; भारतीय सैन्याविषयी बोलणे भोवणार?

थरूर यांनी या प्रश्नाच्या उत्तराची सुरूवातच मिश्कीलपणे हसून केले. भारताने कुणालाही मध्यस्ती करायला सांगितले नव्हते, असे थरूर यांनी ठामपणे सांगितले. ‘मला अमेरिकन अध्यक्षपद आणि राष्ट्राध्यक्षांबद्दल खूप आदर आहे. आम्ही स्वतःसाठी एवढेच म्हणू शकतो की, आम्हाला कधीही कोणालाही मध्यस्थी करण्यास सांगण्याची गरज नाही,’ असेही थरूर म्हणाले. राहुल गांधी यांच्या विधानाबाबत थरूर यांनी थेटपणे भाष्य केले नसले तरी त्यांनी अत्यंत चपखलपणे ट्रम्प आणि राहुल यांनाही उत्तर दिले आहे.

ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहे. त्यांच्या काही विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. काही निर्णय मागेही घेतले. त्यांच्यातील इगो, अहंकार त्यांना शांत बसू देत नाही. जगावर वर्चस्व गाजविण्याची त्यांची इर्षा तीव्र होतेय. पण थरूर यांनी त्याला न जुमानता अमेरिकेतच भारताची भूमिका परखडपणे मांडत जशास तसे उत्तर दिले आहे. पण आता हेच थरूर भारतात राहुल गांधी आणि पक्षातील नेत्यांना कसे पटवून देणार, याबाबत उत्सुकता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com