

मुंबई : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संबंधित लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गैरव्यवहारांवर बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणात गुन्हा झाल्याचे स्वत: लोकायुक्तांनी मान्य केल्याने संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधकांनी केली.
तर, लोकमंगलने व्याजासकट निधी परत केला आहे. उलट कंपनीचा प्रामाणिकपणा लक्षात घ्यायला हवा, अशा थेट शब्दात राज्यसरकारने पाठराखण केली.
आतापर्यंत संबंधित आरोपीला अटक होत नसेल तर त्याची चौकशी कशी होणार असा सवाल करत विरोधकांनी न्यायालयीन चौकशी मागणी केली.
याप्रकरणी लोकयुक्तांनी अहवाल दिल्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल का, असा प्रश्न शिवसेनेच्या अनिल परब यांनी उपस्थित केला. यावर लोकायुक्तांनी नेमके काय आदेश दिले हे तपासून घेईन आणि याबाबत सभागृहालाही माहिती देईन असे सभापतींनी सांगितले.
यानंतरही विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये खडाजंगी सुरू होती. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
लोकमंगलने बनावट बिले सादर करुन शासकीय अनुदानाचा मुद्दा कॉंग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यात आलेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मात्र या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास सुरू आहे असून कोणालाही पाठीशी घातले जात नसल्याचा दावा दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे. लोकमंगलने निधीचा गैरवापर केला नाही. त्यांनी ठराव करून व्याजासकट निधी परत केला आहे. त्यामुळे उलट त्यांचा प्रामाणिकपणाच लक्षात घ्यायला हवा, असा दावा खोतकर यांनी केला. शिवाय, सरकारने स्वत:हून या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचाही दावा त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यमंत्र्यांच्या उत्तरावर तीव्र आक्षेप घेतला. स्वत:हून नव्हे तर लोकायुक्तांनी त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. खोट्या कागदपत्रांद्वारे सरकारी निधी लाटण्याच्या या प्रकरणात सहकार मंत्री देशमुखांप्रमाणेच पशुधन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव यांच्यावरही दोषारोप करत ताशेरे ओढले होते, असे विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.