Marathwada Politics: दसरा मेळाव्यात एकत्र आलेले बहीण-भाऊ आव्हानांना तोंड देऊ शकतील?

Pankaja Munde Dasara Melava Dhananjay Munde: पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे अनेक वर्षांनंतर दसरा मेळाव्यात भगवानगडावर एकत्र आले. मराठवाड्यात सध्या भाजपची अवस्था बिकटआहे. हे दोघे आपल्या पक्षांसमोर असलेल्या मराठवाड्यांतील आव्हानांवर मात करतील का?
Pankaja munde Dhananjay Munde
Pankaja munde Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News: पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे बहीण-भाऊ अनेक वर्षांनंतर दसरा मेळाव्यात एकत्र आले. भगवान गडावर बहीण - भावंडांची एकत्र उपस्थिती त्यांच्या समर्थकांसाठी मोठी आनंदाची घटना म्हणावी लागेल. गेल्या पाच वर्षांत पंकजाताई यांना राजकीय विजनवास सहन करावा लागला, दोन पराभवही सहन करावे लागले. राजकीय समीकरणे बदलल्यामुळे बहीण-भावाची दिलजमाई झाली आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. महाविकास आघाडी स्थापन झाली आणि एकेकाळचे शत्रू मित्र बनले. त्यानंतर दोन प्रादेशिक पक्ष फुटले. त्यामुळे समीकरणे पुन्हा बदलली.

तिकडे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले. त्या आंदोलनाला ओबीसी समाजातील नेत्यांचा विरोध झाला. त्याला कारणीभूत ठरली ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावी, ही जरांगे पाटील यांची मागणी. बीड जिल्ह्यात हे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.

राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये पंकजाताई मुंडे कॅबिनेट मंत्री होत्या. त्या निवडणुकीपूर्वी त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला राज्यभरात प्रतिसाद मिळाला होता. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला.

परळी मतदारसंघातून बंधू धनंजय मुंडे यांनीच त्यांचा पराभव केला. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पंकजाताई मंत्री होत्या त्यावेळी धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी पंकजाताई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून रान पेटवले होते.

विधानसभेला पराभव झाल्यानंतर पंकजाताई या राजकीय विजनवासात गेल्या. पक्षाने त्यांच्या पुनर्वसनाचा विचारही केला नव्हता, उलट त्या अडचणीत कशा येतील, यासाठी प्रयत्न झाले होते. पंकजाताई यांनीही पक्षाच्या बाबतीत काही विधाने केली.

त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत गेल्या. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि धनंजय मुंडे हे अजितदादांसह भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले, कॅबिनेट मंत्रीही झाले.

Pankaja munde Dhananjay Munde
Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभेच्या 388 नव्हे, 288 जागा आहेत; ठाकरे गटाला माहीत नाही?

पंकजाताई यांना पक्षाने बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली. कॅबिनेटमंत्री असलेले बंधू धनंजय मुंडे सोबत असतानाही त्यांचा पराभव झाला. पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. सामाजिक समीकरणे बदलली आहेत, हे यावरून दिसून आले.

या पराभवानंतर भाजपने पंकजाताई मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सामाजिक समीकरणे बदलली नसती तर भाजपने पंकजाताई यांना ही संधी दिली असती का, हा आणखी वेगळा विषय आहे.

गोपीनाथ मुंडे हयात असताना आणि त्यांच्याशी मतभेद झालेले नसताना धनंजय मुंडे हे दसरा मेळाव्याला त्यांच्यासोबत उपस्थित राहायचे. नंतर त्यांनी काकांपासून फारकत घेतली आणि त्यांच्यात राजकीय वैर निर्माण झाले.

बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे बहीण-भाऊ पुन्हा एकत्र येऊ शकले आहेत. ते एकत्र येऊनही लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघावरची त्यांची पकड सैल झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत पंकजाताई या मराठवाड्यातील भाजपचे नेतृत्व करू शकतील किंवा भाजपसमोरील आव्हानांना सामोरे जाऊ शकतील, याबाबत साशंकताच आहे.

Pankaja munde Dhananjay Munde
Sharad Pawar: 'तुम्ही काही काळजी करू नका, 84 हो किंवा 90, हे म्हातारं काही..'; शरद पवारांचा महायुतीला इशारा

गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्वगुण अफलातून होते, याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. ते हयात होते तोपर्यंत मराठवाड्यातील भाजपचे नेतृत्व त्यांनी एकहाती केले. तसे ते भाजपचे राज्याचेच नेते होते, मात्र एकवेळ अशी आली होती की पक्षात त्यांची कुचंबणा सुरू होती.

गोपीनाथ मुंडे यांना माणसे जोडण्याचा, त्यांच्या संपर्कात राहण्याचा छंद होता. विरोधी पक्षांतही त्यांचे मित्र होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री अजरामर आहे. त्या मैत्रीचे दाखले आजही दिले जातात.

गोपीनाथ मुडे यांची बीड लोकसभा मतदारसंघावर, पक्षावर घट्ट पकड होती. मैत्री आणि संपर्क वाढवण्यासाठी त्यांनी पक्षांची मर्यादा कधीही पाळली नाही, म्हणजे पक्षाच्या बाहेरही त्यांची मैत्री होती, पक्षाच्या बाहेरचे लोकही त्यांच्या संपर्कात राहायचे.

पक्षातील एखादा नेता नाराज झाला की गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी फिरायची आणि संबंधित नेत्याची नाराजी दूर व्हायची. विरोधकांवर टीका करताना ते भाषेची मर्यादा पाळायचे. पंकजाताई यांच्यात वडिलांचे हे गुण आहेत का?

याचे उत्तर नाही असेच आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक आणि पंकजाताई यांचे समर्थकही हे मान्य करतील. धनंजय मुंडे यांच्यामध्येही काकांचे नेतृत्वगुण नाहीत, हे वेगळे सांगायची गरज नसावी.

मराठवाड्यातील 8 पैकी एकाही लोकसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यात भाजपची परिस्थिती बिकट आहे. जिल्हा सांभाळण्यात अपयशी ठरलेले बहीण-भाऊ मराठवाड्यात भाजप आणि महायुतीची बाजू कशी सांभाळणार, असा प्रश्न आहे.

अर्थात एका निवडणुकीत पराभव झाला म्हणून नेतृत्व संपले, असे म्हणता येणार नाही, मात्र मराठवाडा सांभाळण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जे नेतृत्वगुण होते, त्यांची गरज असते. तसे गुण बहिणीकडे आणि भावाकडेही नाहीत, हे त्यांचे समर्थकही मान्य करतील.

शरद पवारांच्या सामना कसा करणार?

अजितदादा पवार यांच्यासोबत गेल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. हे त्यांच्यातील अपरिपक्वतेचे लक्षण म्हणावे लागेल. याबाबत प्रतिक्रिया विचारल्यानंतर शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख टाळत मी त्यांच्यावर बोलणार नाही, असे म्हटले होते.

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांचा रोष ओढवून घेतला आहे. आपल्याला सोडून गेलेल्यांच्या विरोधात शरद पवार सध्या रणनीती आखत आहेत. ती रणनीती फुटीर आमदारांच्या पोटात गोळा आणणारी आहे. ते धनंजय मुंडे यांना यातून वगळतील, याची सुतराम शक्यता वाटत नाही.

शरद पवार यांनी असा एखादा डाव टाकला तर धनंजय मुंडे यांना त्यांच्या परळी मतदारसंघातून बाहेर पडणेही अवघड होऊ शकते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात पंकजाताई यांचा समावेश होईल, अशी चर्चा होती, मात्र विस्तार झालाच नाही.

त्यामुळे पंकजाताई यांच्यावरही मर्यादा आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत ही बहीण-भावाची जोडी मराठवाड्यातील भाजप आणि महायुतीसमोरील आव्हांना सक्षमपणे सामोरी जाऊ शकेल का, याबाबत साशंकताच आहे.

Pankaja munde Dhananjay Munde
Rahul Gandhi : राहुल गांधी, ताकही फुंकून पिणार! दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांना 3 महत्वाच्या सूचना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com