राणेंना मोठा धक्का! न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळताच पोलिसांनी घेतलं ताब्यात

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला आहे.
police detain bjp leader and union minister narayan rane
police detain bjp leader and union minister narayan rane
Published on: 
Updated on: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. राणेंच्या विरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत राणेंचा अटकपूर्व जामीन रत्नागिरीतील सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर पोलिसांनी राणेंना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  

राणेंना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वरमधील गोळवली गावात पोलीस दाखल झाले. पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतल्याचे समजते. थोड्याच वेळात त्यांच्या अटकेची कारवाई होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आत्तापर्यंच राणेवर तीन ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहे. राणेंना अटक होईल का, हे लवकरच समजेल. आतापर्यंत महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमध्येही गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रुभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाडमध्ये भादंवि कलम 153, 189, 504, 505 (2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईत नारायण राणेंच्या जुहू येथील घरासमोर आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने पोलिसांनी सैाम्य लाठीमार केला. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे. ही दगडफेक भाजपने केली असल्याचा आरोप युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे.  मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. 

या सर्व वादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. राणेंच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही, पण पक्ष आम्ही म्हणून राणेंच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात राणेंनी केलेल्या एका वाक्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बोलण्याच्या ओघात हे झाले असावे. मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिन विसरतात तेव्हा कुणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी भाजप नाही पण पक्ष पूर्ण ताकदीनं राणेंसोबत आहे. कारवाई ज्या पद्धतीनं होतेय ते चुकीचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com