

Union Education minister : NEET-UG परीक्षेच्या वादानंतर अडचणीत सापडलेल्या शिक्षण मंत्रालयाची धुरा आता वरिष्ठ कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
संसदीय अनुभव आणि संकट व्यवस्थापन हाताळण्याचे कौशल्य या जोरावर 2019 ते 2024 पर्यंत जोशी संसदीय कार्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला होता. संसदेत सरकारची रणनीती आखणे, विरोधकांशी समन्वय साधणे आणि कठीण परिस्थिती हाताळण्यात त्यांची हातोटी आहे. सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयही सांभाळत आहेत.
वादग्रस्त मंत्रालयातही प्रशासकीय शिस्त राखण्याची त्यांची प्रतिमा आहे. पंतप्रधान मोदींच्या सर्वात जवळच्या आणि अनुभवी नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी पूर्ण जबाबदारीने हे काम पार पाडेन. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असा आत्मविश्वास जोशी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला आहे.
जोशी यांच्यासमोरील ही आहेत आव्हाने
विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करणे, हे प्रल्हाद जोशी यांच्या समोरील सर्वात मोठे आणि कठीण आव्हान असणार आहे. NEET-UG मधील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. तो पुन्हा मिळवणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे या परीक्षा घेणाऱ्या एनटीए वर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही. पारदर्शक परीक्षा होण्यासाठी NTA मध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचे शिवधनुष्य प्रल्हाद जोशी यांना पेलावे लागणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या कामकाजात सुधारणा करून भविष्यात पेपरफुटी रोखावी लागेल. यासाठी संगणक आधारित परीक्षा - CBT प्रणालीचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे.
कठोर कायदा आणावा लागेल
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आधीच प्रस्तावित असलेला कडक कायदा प्रभावीपणे राबवणे आणि शैक्षणिक संस्थांशी थेट संवाद वाढवणे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, उच्च शिक्षणातील सुधारणा, विद्यापीठांच्या मान्यता प्रक्रिया आणि कौशल्याधारित शिक्षणाला गती देणे. यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये चांगला समन्वय साधण्याची तारेवरची कसरत जोशी यांना करावी लागणार आहे.
सरकारचा संदेश काय?
राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देणे म्हणजे सरकार सध्या मोठा राजकीय बदल न करता प्रशासकीय स्थिरता आणि संकट व्यवस्थापनावर भर देत आहे, असा स्पष्ट संदेश आहे. पुढील काळात जोशी शिक्षण मंत्रालयात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय परीक्षांवरील विश्वास कसा परत आणतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.