

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने (BJP) ममतांच्या विरोधात वकील असलेल्या प्रियांका टिबरेवाल (Pryinaka Tibrewal) यांना मैदानात उतरवले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 7 वर्षांतच त्यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची संधी मिळाली आहे.
प्रियांका या 41 वर्षांच्या आहेत. त्या कोलकता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. त्यांनी 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे खासदार बाबुल सुप्रिया यांच्या विधी सल्लागार म्हणून प्रियांका काम करीत होत्या. सुप्रियो यांनीच त्यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवला होता. तेव्हापासून त्यांची भाजपमधील वाटचाल वेगाने सुरू आहे.
प्रियांका टिबरेवाल या मागील विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार स्वर्णा कमल यांच्याकडून पराभव झाला होता. याचबरोबर कोलकता महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टिबरेवाल या तृणमूलच्या स्वपन सम्मादार यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. नंतर 2020 मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनवण्यात आले होते.
भाजपला ममतांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा होता परंतु, अनेक नेत्यांना यास नकार दिला. डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीने बडे भाजप नेते ममतांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. राज्यात तृणमूलच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये टिबरेवाल यांचा समावेश आहे. याच याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य भाजपने सहा जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. यातील भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रियांका टिबरेवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बंगालमधील भवानीपूरसह समशेरगंज आणि जांगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबरला मतदान होईल. निवडणुकीचा निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.