Pune Porsche Accident News: पैसे मोजले जातात, कायदा गुंडाळून ठेवतात, हे घडतेच कसे?

Pune Accident News: 'हिट अँड रन'ची प्रकरणे नवीन नाहीत. पुण्यातील अपघातामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. श्रीमंतांसमोर पोलिस कसे वाकतात, कठोर असलेला कायदा कसा लवचिक होतो, हे पुण्यातील प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama

Pune Porsche Accident News: देशात दरवर्षी जवळपास साडेचार लाख रस्ते अपघात होतात आणि त्यात जवळपास दीड लाख लोकांचा जीव जातो. केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातील ही माहिती आहे. 2022 मध्ये देशभरात 4,61,312 रस्ते अपघातांत 1,68,491 जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यात (Pune) नुकत्याच झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांचा बेदरकारपणा, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, नशेच्या अंमलाखाली वाहन चालवणे अशी काही प्रमुख कारणे यासाठी देता येतील. 2022 मध्ये झालेल्या अपघातांत जवळपास 15 टक्के प्रकरणे हिट अँड रनची होती. (Pune Porsche Hit And Run Case)

'हिट अँड रन'चे पुण्यातील हे प्रकरण काही नवे नाही, यापूर्वीही अशी प्रकरणे घडली आहेत. त्यातील काही सेलिब्रिटी आरोपी सहिसलामत सुटले आहेत. त्यामुळे तर असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत नसतील ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कायदे कठोर असणे आणि त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी करणे, या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, हे पुण्यातील अपघातानंतर (Pune Accident) ठळकपणे समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) हिट अँड रन प्रकरण गाजले होते. 2002 मध्ये फूटपाथवर झोपलेल्या लोकांना त्याने आपल्या वाहनाखाली चिरडले होते. या प्रकरणातून तो कसा कसा वाचत गेला, हे देशाने पाहिले आहे. सबळ पुराव्यांअभावी 13 वर्षांनंतर त्याची मुक्तता झाली. सामान्य लोकांना व्यवस्थित वागणूक न देणाऱ्या सर्वच यंत्रणा हाय प्रोफाइल लोकांसाठी कशा पद्धतीने वागतात, हे सलमान खानच्या प्रकरणावरून लोकांसमोर आले होते.

एखादे हिट अँड रनचे प्रकरण घडले की, सलमान खानच्या प्रकरणाची हमखास चर्चा होते. मात्र सलमान खानचे हिट अँड रन प्रकरण हे काही पहिलेच नव्हते. त्यापूर्वीही एका बॉलीवूड अभिनेत्याने 'हिट अँड रन' केले होते. आता हा अभिनेता विस्मरणात गेला आहे. पुरू राजकुमार... होय, चित्रपटांत विशिष्ट संवादफेकीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजकुमार यांचा पुत्र. चित्रपटसृष्टीत राजकुमार यांचे एक वेगळे स्थान आहे, ते अबाधित आहे. त्यांचा मुलगा पुरू राजकुमार मात्र अभिनय क्षेत्रात अपयशी ठरला.

डिसेंबर 1993 मध्ये मध्यरात्री एक इम्पोर्टेड कार सुसाट धावत होती. बांद्रा येथील रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार फूटपाथवर चढली. त्या कारने तिघांना चिरडले. तिघांचाही मृत्यू झाला होता. दोघे गंभीर जखमी झाले होते. कारखाली अडकलेल्या लोकांना तसेच सोडून चालकाने अपघातस्थळावरून पोबारा केला होता. ती आलीशान इम्पोर्टेड कार पुरू राजकुमार (Puru Rajkumar) याची होती.

Pune Hit And Run Case
Pune Porsche Accident News: कल्याणीनगर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी धमकावलं? पोलिस आयुक्तांनी दिलं उत्तर

रात्री उशीरापर्यंत हॉटेलांमध्ये पार्ट्या करणाऱ्या पुरू राजकुमारच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण होते की नाही, ही तपासणारी चाचणीच त्यावेळी झाली नव्हती. त्यामुळे त्या रात्री तो दारू प्यायलेला होती की नाही? हे अखेरपर्यंत समोर आले नाही. केवळ एक रात्र पोलिस कोठडीत काढल्यानंतर त्याचा जामीन झाला होता. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी तो हॉटेलमध्ये दिसून आला होता. हिट अँड रन प्रकरणात त्याच्या वकीलांनी केलेला युक्तिवाद धक्कादायक होता. पुरू राजकुमार हा उदयोन्मुख अभिनेता असून, त्याला तुरुंगवास झाला तर त्याच्या कारकीर्दीवर परिणाम होईल, असा युक्तिवाद त्यांच्या वकीलांनी केला होता. हे तर काहीच नाही, खरा धक्का पुढे आहे. न्यायालयाने मृतांच्या वारसांना तीस हजार आणि जखमींना 5 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. अशा प्रकारे ते प्रकरण तडीला गेले होते.

Pune Hit And Run Case
Pune Porshe Accident : पोलिस आयुक्त म्हणजे पुण्याला लागलेले 'कलंक', त्यांना बडतर्फ करा, राऊत कडाडले !

सप्टेंबर 2002 ची ती रात्र फूटपाथवर झोपलेल्यांसाठी काळरात्र ठरली

सलामान खानचे हिट अँड रन (Salman Khan Hit and Run) देशभरात गाजले होते. 27 सप्टेंबर 2002 ची ती रात्र फूटपाथवर झोपलेल्या गरीबांसाठी काळरात्रच ठरली. सलमान खान हा त्याचा चुलत भाऊ कमाल खानबरोबर (Kamal Khan) रात्री साडेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडला. घराबाहेर त्याचा अंगरक्षक आणि चालक रवींद्र पाटील उभा होता. रवींद्र पाटील हा मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबल. टोयोटा लँड क्रूझरमधून ते जुहू येथील रेन बारमध्ये पोहचतात. सलमाननेच वाहन चालवले होते. सलमान आणि त्याच्या मित्रांनी बीयर, कॉकटेल व्हाइट बकार्डी रम अशी ऑर्डर दिली होती, असे बारच्या व्यवस्थापकाने सांगितले होते.

...अन् सबळ पुराव्याअभावी सलमान खान सुटला

रेन बारमधून निघाल्यानंतर सलमान आणि त्याचे मित्र हॉचेल जेडब्ल्यू मॅरिएट मध्ये जातात. काहीवेळ तिथे थांबून ते रात्री उशीरा बाहेर पडतात. पाहटे तीन वाजता सलमानची लँड क्रूझर बांद्रा हिल रोडवर भरधाव धावत असते. हिल रोडवर चालकाचे नियंत्रण सुटते आणि गाडी फूटपाथवर चढते. फूटपाथवर झोपलेले पाचजण गाडीखाली चिरडले जातात. गाडीच्या खाली अ़़डकलेल्यांना मदत करायचे सोडून सलमान खान आणि त्याचे मित्र पळून जातात. मदतीसाठी आलेल्या लोकांनी सलमानला ओळखलेले असते. ते प्रकरण न्यायालयात वर्षानुवर्षे चालते. अनेक साक्षीदार फितूर होतात. हिट अँड रनचा साक्षीदार असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचा हलाखीच्या स्थितीत मृत्यू होतो. अन्य एक साक्षीदार कमाल खान हाही देशातून गायब होतो आणि अखेर सलमान खान सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातून सुटतो.

Pune Hit And Run Case
Pune Porshe Accident : पोर्शे कार अपघात प्रकरण : "इतक्या कमी वेळेत जामीन कसा काय?" युगेंद्र पवारांचा खडा सवाल

कंझावाला हिट अँट रन केस

दिल्लीतही 31 डिसेंबर 2022 रोजी मन हेलावून टाकणारे हिंट अँड रन प्रकरण घडले होते. स्कूटीवरून जाणाऱ्या अंजली नावाच्या तरुणीला कारने जोरदार धडक दिली होती. इतकेच नव्हे तर धडक दिल्यानंतर कारने ती स्कूटी 13 किलोमीटरपर्यंत फरफटत नेली होती. ती तरुणी कारखाली अडकलेली होती. तशाच अवस्थेत तिला 13 किलोमीटर फरफटत नेण्यात आले होते. त्यामुळे त्या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कारमधील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण कंझावाला हिट अँट रन केस (Kanzawa hit and run case) या नावाने ओळखले जाते. पोलिसांनी आरोपींवर 800 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. तरुणी कारखाली अडकलेली आहे, हे माहीत असूनही तिला 13 किलोमीटर फरफटत नेण्यात आले होते. ती ओरडत होती, रडत होती, मात्र आरोपींना तिची दया आली नाही. पोलिसांनी आरोपींवर हे आरोप निश्चित केले, मात्र त्यांनी ते कबूल केले नव्हते.

ही आणि अन्य काही प्रकाशझोतात आलेली हिट अँड रनची प्रकरणे आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर अशी प्रकरणे सातत्याने घडत असतात. रात्रीच्या अंधारात अवडज वाहने छोट्या वाहनांना ठोकरतात, निघून जातात. अनेक प्रकरणांचा छडा लागत नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या लगत अनेक बार आणि रेस्टॉरंट आहेत, रात्रीच्या वेळी अशा बारसमोर अवजड वाहनेही थांबलेली दिसतात. सर्वच जण दारू पीत असतील असे नाही आणि पीत नसतील असेही नाही. यावर नियंत्रण कोण ठेवणार? हिट अँड रन झाले की त्यासाठी कायदा आहे. अपघातानंतर वाहनचालक फरारी झाला आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद सुधारित कायद्यात करण्यात आली आहे. या तरतुदीला ट्रकचालकांनी कडाडून विरोध केला होता. जनजागृतीसह कायद्याची कठोर अंमलबजावणी केली तरच अशा प्रकरणांना आळा बसू शकतो.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com