
थोडक्यात महत्वाचे :
अकोल्यातील काँग्रेसचे नेते डॉ. अभय पाटील यांना शिवसेनेने थेट पक्षात सामील होण्याची ऑफर दिली असून, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी राजकीय हालचाल ठरू शकते.
काँग्रेसमध्ये दुर्लक्ष झाल्याने नाराज झालेल्या पाटलांनी राजीनामा दिला असून, शिवसेनेने त्यांचे महत्त्व ओळखून संपर्क साधला आहे.
पाटील यांनी निर्णय घेतल्यास अकोल्यातील भाजप-काँग्रेस संघर्षात शिवसेना नवा प्रभावी खेळाडू बनू शकते.
Akola News : अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ आणि लोकसभेची निवडणूक जिंकता आली नसली तरी भाजपला हादरवणारे डॉ. अभय पाटील यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने डाव टाकला आहे. त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली असल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी धक्का ठरू शकतो. अभय पाटील यांनी नुकताच सोशल मीडियातून काँग्रेसच्या सर्व पदांचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केेले होते.
डॉ. अभय पाटील हे अकोल्यातील एक प्रतिष्ठित व वैचारिक नेतृत्व म्हणून परिचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते वैद्यकीय, सामाजिक न्याय, युवकांसाठीचे उपक्रम आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेची दखल घेऊनच शिवसेनेने त्यांच्याशी संवाद साधल्याचे समजते. पक्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी स्वतः पुढाकार घेत पाटील यांच्याशी थेट संपर्क साधल्याचे समजते.
या घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनाक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने अभय पाटील यांना अकोला लोकसभेतून उमेदवादी दिली होती. त्यामुळे काँग्रेसची जोरदार हवा निर्माण झाली होती. भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजप आपला पारंपारिक मतदारसंघ गमावणार अशी अशी भीती व्यक्त केली होती.
काँग्रेसच्या नेत्यांच्या विजयाच्या यादीत अभय पाटलांचा समावेश होता. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला आम्ही जिंकलो, असा दावाही केला होता. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी शेवटच्याक्षणी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि सर्व राजकीय समीकरणे बदलली. दोघांच्या मतविभाजनाच भाजपचे अनुप धोत्रे निवडून आले. यानंतर अभय पाटील यांना काँग्रेस पक्षात मानाचे स्थान मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती.
प्रदेश कार्यकारिणीत अभय पाटलांचा समावेशच करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पाटलांनी सोशल मीडियावरून आपला राजीनामा दिला आहे. त्यांची कोणी समजूत काढण्याचा व नाराजी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरीकडे शिवसेनेने पाटलांचे महत्त्व ओळखले. थेट फोनद्वारे पाटील यांच्याशी संपर्क साधून पक्षात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे.
सध्या या प्रस्तावावर दोन्ही बाजूने मंथन सुरू असल्याची माहिती असून, पाटील यांचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोल्यातील राजकारणात यामुळे प्रचंड हालचाल सुरु झाली आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील पारंपरिक संघर्षात आता शिवसेना नवा पर्याय तयार करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
डॉ. अभय पाटील यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र ते जनतेच्या अपेक्षा, सामाजिक कार्याचा व्याप आणि भविष्यातील दिशा यांचा गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. डॉ. पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास अकोल्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: डॉ. अभय पाटील कोणत्या पक्षात आहेत सध्या?
A: ते सध्या काँग्रेसमध्ये होते, पण राजीनामा दिला आहे.
Q2: शिवसेनेने पाटील यांना का ऑफर दिली?
A: त्यांच्या स्वच्छ प्रतिमा, सामाजिक कार्य आणि स्थानिक लोकप्रियतेमुळे.
Q3: पाटील यांच्या प्रवेशाने कोणत्या पक्षांना फटका बसू शकतो?
A: काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना.
Q4: पाटील यांनी ऑफर स्वीकारली आहे का?
A: अद्याप त्यांनी अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.