
Dharashiv Political News: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. उमरगा-लोहारा वगळता तुळजापूर, धाराशिव-कळंब आणि भूम-परंडा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीतही बिघाडी झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. ही बिघाडी कायम राहील की बंडखोरांची मनधरणी होईल, हे 4 नोव्हेंबरच्या सायंकाळी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
भाजपचे राणाजगजितसिंह पाटील आमदार आणि उमेदवार असलेल्या तुळजापूर मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. काँग्रेसचे माजीमंत्री मधुकरराव चव्हाण हे या मतदारसंघातून इच्छुक होते. काँग्रेसने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे नाराज झालेल्या चव्हाण यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काहीही झाले तरी उमेदवारी मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केली आहे. गेल्या निवडणुकीत चव्हाण यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे ऋषी मगर यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
तुळजापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जीवनराव गोरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले अशोक जगदाळे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
गेल्या निवडणुकीत जगदाळे हे वंचित बहुजन आघाडीकडून लढले होते. त्यांना 35 हजार मते मिळाली होती. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. व्यंकट गुंड यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी समाजवादी पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे.
भूम-परंडा मतदारसंघातही महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एबी फॉर्म दिले आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे करत आहेत. तीनवेळा आमदार राहिलेले, गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही रणजित पाटील यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे सध्यातरी येथे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील चारपैकी धाराशिव - कळंब, उमरगा - लोहारा आणि भूम-परंडा मतदारसंघ या तीन मतदारसंघांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एबी फॉर्म दिला आहे.
भूम-परंडा मतदारसंघातून माजी आमदार राहुल मोटे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राहुल मोटे यांनाही एबी फॉर्म मिळाला आहे.
शिवसेनेचे प्रशांत चेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते डॉ. सावंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही मतदारसंघांत उमेदवार देणार, असे जाहीर केले आहे. जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा चेडे यांना असल्याची चर्चा आहे.
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघही चर्चेत आला आहे. तो महायुतीकडून अजित पिंगळे यांच्या उमेदवारी मिळाल्यामुळे. अजित पिंगळे हे भाजपचे कळंब तालुकाध्यक्ष आहेत. त्यांना उमेदवारी मात्र शिवसेनेकडून मिळाली आहे.
कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात होते. पालकमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली ते शिवसेनेत आले. उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. ती पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवार आयात केल्यामुळे ते नाराज झाले आहेत. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमधून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले सुधीर पाटील हेही या मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
धाराशिव-कळंब मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या पक्षाचे धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे तुळजापूर मतदारसंघातून इच्छुक होते, मात्र तो मतदारसंघ काँग्रेसला सुटला. त्यामुळे राजेनिंबाळकर यांनी धाराशिव-कळंब मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. मकरंद राजेनिंबाळकर हे खासदार राजेनिंबाळकर यांचे चुलतबंधू आहेत.
उमरगा-लोहारा मतदारसंघही चर्चेत आला आहे. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाने प्रवीण स्वामी या नव्या चेहऱ्याला रिंगणात उतरवले आहे. भाजपचे कैलास शिंदे, त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय शिंदे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.
शिंदे पिता-पुत्रांनी उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांची अनेकवेळेस भेट घेतली आहे. काँग्रेसचे विजय वाघमारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विलास व्हटकर यांनीही उमेदवारी जाहीर केली आहे. परिवर्तन आघाडीकडून सातलिंग स्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.