Rohit Pawar Ed Case :
सात ते आठ वर्षांपूर्वी राजकारणात आलेले शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रसचे कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी अल्पावधीत आपली छाप पाडली. समंजस, धीरगंभीर तरुण राजकारणी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. या प्रतिमेवर शिक्कामोर्तब करण्यात ईडी या तपास यंत्रणेने मोलाची कामगिरी बजावली आहे. शरद पवार यांनी 2019 मध्ये ईडीला घाम फोडला होता. तसाच काहीसा प्रकार रोहित पवार यांच्याबाबत घडला आहे.
आमदार रोहित पवार हे बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचे वडील राजेंद्र पवार या कंपनीचे संचालक आहेत. बारामती अॅग्रोमार्फत पशुखाद्य निर्मिती, दुग्धव्यवयास, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसाय केला जातो. बारामती अॅग्रोचे साखर कारखानेही आहेत. 2017 मधे बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी गटातून रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 2018 ते 2019 दरम्यान ते इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अध्यक्ष होते. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे यांचा पराभव केला. त्यांची राजकीय जडणघडण Sharad Pawar यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
रोहित पवार हे ईडीच्या चौकशीला जाताना त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते होते. कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती. जवळपास 12 तास चौकशीला सामोरे जाऊन बाहेर आल्यानंतर बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला. रोहित पवार यांनाही दादा या टोपणनावाने ओळखले जाते. चौकशीच्या ससेमिऱ्याला घाबरून पळून जाणारा हा दादा नाही, असा संदेश रोहित पवार यांनी संवादातून दिला. हा संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. रोहित पवार यांची कार्यकर्ते, पत्रकारांशी संवाद साधण्याची पद्धत त्यांची राजकीय परिपक्वता दाखवून देणारी होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे होत्या.
रोहित पवार बाहेर आले आणि तिकडे अजितदादा पवार गटात असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मात्र आपल्या अपरिपक्वतेचे दर्शन घडवले. चाकणकर यांनी केलेल्या ट्विटची मोठी चर्चा झाली. रोहित पवारांच्या सोबत सावलीप्रमाणे वावरणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या अजितदादा पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला असताना मात्र त्यांच्यासोबत नव्हत्या, असा चाकणकर यांच्या ट्विटचा आशय होता. सुप्रिया सुळे यांचा उल्लेख त्यांनी काळाजीवाहू ताई असा केला. अजितदादांच्या चौकशा सुरू असताना काळजावाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाहीत, असा प्रश्न चाकणकर यांनी उपस्थित तर केला, यासोबतच या चौकशांना घाबरून अजितदादा भाजपसोबत गेले, असेही अप्रत्यक्षपणे अनवधानाने का होईना त्या सांगून गेल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, असा सुप्त संघर्ष गेली अनेक वर्षे पवार कुटुंबीयांत सुरू होता. राष्ट्रवादीत झालेल्या फाटाफुटीला तेही एक कारण होते. रोहित पवार यांच्या परिपक्वतेमुळे राष्ट्रवादीतील काही नेते अस्वस्थ झाले होते, हे रूपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे केलेल्या टीकेमुळे सिद्ध झाले आहे. शरद पवार यांनी किंवा अन्य कुणी आता नेतृत्व रोहित पवार करणार, असे कधीही सांगितले नव्हते. रोहित पवार यांच्या पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, हे दाखवून देण्याची संधी काल ईडीने उपलब्ध करून दिली. चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आणि त्यांच्यासोबत असलेली नेते, कार्यकर्त्यांची गर्दी बरेच काही सांगून केली.
गैरव्यवहार, घोटाळे फक्त विरोधी पक्षांचे नेतेच करतात, अशी ईडीची म्हणजेच सत्ताधारी भाजपची धारणा झाली आहे. ईडीचा पक्षपात आता सामान्य लोकांच्याही लक्षात आला आहे. समाजमाध्यमांवर एखाद्याने सरकारच्या विरोधात मत व्यक्त केले की आता संबंधिताच्या मागे ईडी लागणार, अशा उपरोधिक कमेन्ट्सचा पाऊस पडतो. आमच्यासोबत या किंवा मग चौकशीच्या ससेमिऱ्यासाठी तयार राहा, प्रसंगी कारागृहात जाण्यासाठीही तयार राहा, असा संदेश सत्ताधाऱ्यांनी स्पष्टपणे दिला आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. चौकशीला घाबरून पळून जाणारा 'दादा' मी नाही, असे त्यांनी भाजप आणि अजितदादा पवार यांना थेट सुनावले आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.