Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्याचे मतदान होताच सबका साथ सबका विकास 'OUT'

PM Modi News : केंद्र सरकार दावा करते त्याप्रमाणे देशात विकासकामे झालेली नाहीत का, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. त्याला कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केले जात असलेले ध्रुवीकरण.
PM Modi
PM ModiSarkarnama

BJP and Loksabha Election 2024 : राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचारात विविध मुद्दे चर्चेत आणले जातात. आर्थिक, सामाजिक, राजकीय मुद्द्यांसह भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचाही यात समावेश असतो. धार्मिक मुद्देही असतातच. गेल्या काही वर्षांत धार्मिक मुद्दा हमखास निवडणूक जिंकून देणारा ठरला आहे. 2014 पासून या मुद्द्याचा राजकारणात उघडपणे वापर सुरू करण्यात आला आहे. केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाकडून म्हणजे भाजपकडून 2024 ची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर, सरकारने केलेल्या कामांच्या मुद्द्यांवर लढवली जाईल, असे वाटले होते. मात्र ते खोटे ठरू लागले आहे.

'सबका साथ सबका विकास', अशी भाजपची घोषणा होती. विरोधक टीका करायला लागले की भाजपचे नेते या घोषणेचा दाखला द्यायचे. या घोषणेनुसारच सरकारने काम केल्याचा दावा ते करायचे. त्यामुळे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर, केंद्र सरकारने केलेल्या कामांवर होईल, असे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आणि हे चित्र बदलू लागले. प्रचार धार्मिक ध्रुवीकरणावर आला. स्पष्टच सांगायचे तर प्रचार हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर आलाच आणि तो खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणला, हे विशेष म्हणावे लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi
Imran Pratapgarhi News: मोदीजी बाय बाय...शायरी म्हणून ठीक, पण जमिनीवर नियोजन काय?

माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका भाषणाच्या आधारावर मोदी यांनी ध्रुवीकरणाचा हा मुद्दा उचलला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या भाषणातील भागाचा चुकीचा अर्थ लावून हिंदू-मुस्लिम नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे देशातील दलित, अनुसूचित जाती-जमातीचे नागरिक, अल्पसंख्याक नागरिक म्हणजे मुस्लिम या सर्वांना सशक्त करणे, विकासाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचा सक्षम करण्याबाबत बोलले होते. देशाच्या संसाधनांवर सर्वात आधी या नागरिकांचा हक्क असल्याचे ते म्हणाले होते. देशाच्या संसाधनांवर सर्वात आधी मुस्लिमांचा हक्क आहे, असे डॉ. सिंग म्हणाले होते, असे मोदी यांचे म्हणणे आहे, ते त्यांनी राजस्थानातील जालोर आणि बांसवाडा येथील जाहीर प्रचार सभांमध्ये 21 एप्रिल रोजी बोलून दाखवले.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या भाषणात, ज्यांना सशक्त करायचे आहे त्या नामावलीत मुस्लिम शब्द सर्वात शेवटी आला होता. त्यानंतर त्यांचे वाक्य होते, देशाच्या संसाधनांवर सर्वात आधी यांचा हक्क आहे. याचा अर्थ, सर्वात आधी मुस्लिमांचा हक्क आहे, असा मोदी यांनी लावला. प्रचारगीतात जय भवानी असा शब्द आल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नोटीस बजावणाऱ्या निवडणूक आयोगाने मोदी यांच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नाकडे मात्र डोळेझाक केली. अर्थात निवडणूक आय़ोगाकडून हे अपेक्षितच होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली.

पहिल्या टप्प्याचे मतदान होईपर्यंत ध्रुवीकरणाचा मुद्दा प्रचारात आला नव्हता. पहिल्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. भाजपचा मतदार मतदानासाठी बाहेर पडला नाही, भाजपच्या मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह नाही, असे कयास त्यावरून बांधले जाऊ लागले. त्यामुळे मोदी यांनी ध्रुवीकरणाचा विषय प्रचारात आणला, अशी टीका आता विरोधी पक्षांकडून केली जाऊ लागली आहे. सुरुवात मोदी यांनी केली, त्यानंतर काही राष्ट्रीय नेत्यांनीही ध्रुवीकरणाचे मुद्दे प्रचारात आणायला सुरुवात केली.

काही दिवसांनी राज्य, जिल्हा पातळीवरील नेतेही ध्रुवीकरण करायला सुरुवात करतील, अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरूनही पंतप्रधान मोदी यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात ते फारसे यशस्वी झाल्याचे दिसले नाही.

PM Modi
Lok Sabha Election 2024 : आरोप-प्रत्यारोप दोन शिंद्यांमध्ये, मात्र नस दाबली जातेय भाजपची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या देशाची द्वेषाची बीजे पेरायची आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली आहे. देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक सलोखा आवश्यक असतो. लोकांनाही शांतता, सलोखा, रोजगार हवा आहे. लोकांना आरोग्याच्या सुविधा हव्या आहेत. इंधनाचे वाढलेले दर कधी कमी होतील, याची प्रतीक्षा लोकांना आहे. मुलांचे शिक्षण पूर्ण झाले की त्याला काम मिळावे, अशी अपेक्षा पालकांची असते. हे आपल्या देशासमोरील मूळ मुद्दे आहेत.

गेल्या दहा वर्षांत सरकारने प्रचंड काम केले आहे, देशाची मोठी प्रगती झाली, देशाचा डंका कधी नव्हे तो जगभरात वाजत आहे, असे म्हणणाऱ्या सरकारला मतदानाचा पहिला टप्पा संपल्यानंतर ध्रुवीकरण करावे, असे का वाटले असेल? पंतप्रधान हे एका पक्षाचे नसतात, ते सर्वांचे असतात आणि तेच पंतप्रधान हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करत असतील तर देशाचे कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com