Lok Sabha Election 2024 : आरोप-प्रत्यारोप दोन शिंद्यांमध्ये, मात्र नस दाबली जातेय भाजपची

BJP Politics : घोटाळे केले असतील तर भाजपमध्ये जा, तुम्हाला संरक्षण मिळेल, असे भाजपबाबत बोलले जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी याला बळ मिळेल, असे वक्तव्य नुकतेच केले आहे.
Mahesh Shinde, Devendra Fadnavis, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Devendra Fadnavis, Shashikant ShindeSarkarnama

Maharashtra Political News : घोटाळे, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि राजकीय नेत्यांना तुरुंगवास... अमक्याने घोटाळा केला म्हूणन तो आज तमक्या पक्षात गेला, अमुक नेते या किंवा त्या तारखेला जेलमध्ये जाणार... हे शब्द गेल्या काही वर्षांपासून नागरिकांच्या कानांवर सतत आदळत आहेत. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सर्वच नेत्यांकडून पुन्हा या शब्दांचा, वाक्यांचा पुनरुच्चार सुरू झाला आहे. घोटाळा केला असता तर आम्ही भाजपमध्ये गेलो असतो किंवा घोटाळा करा आणि भाजपमध्ये जा, म्हणजे तुमच्यावर कारवाई होणार नाही, असे विरोधी पक्षांतील नेते बोलत आहेत.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात ईडीसह (ED) अन्य तपास यंत्रणांनी नेत्यांना लक्ष्य केले. यात प्रामुख्याने विरोधी पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षांच्या किंवा त्यांच्याशी उघड, छुपी हातमिळवणी केलेल्या पक्षांच्या नेत्यांवर मात्र कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही, हे सर्वश्रुत आहेत. काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप झाले, मात्र पक्ष बदलून ते सत्ताधाऱ्यांकडे जाताच कारवाई थांबवण्यात आल्याचीही उदाहरणे आहेत, त्यात काहीही लपून राहिलेले नाही. यावरून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका झाली, मात्र लोकसभा निवडणूक जिंकणे हा एकमेव उद्देश असलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

Mahesh Shinde, Devendra Fadnavis, Shashikant Shinde
Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत जातीय समीकरणेच ठरणार 'गेमचेंजर'; आजी-माजी खासदार की नव्याला मिळणार संधी?

सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara constituency) या विषयावरूनच आता कलगीतुरा सुरू झाला आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे (BJP) उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे हे रिंगणात आहेत. शशिकांत शिंदे हे मुंबई बाजार समितीचे संचालक होते. त्या काळात म्हणजे 2014 मध्ये मुंबई बाजार समितीत चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्यात शशिकांत शिंदे सामील आहेत, असा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. महेश शिंदे हे आता शिवसेना शिंदे गटात आहेत. त्यांच्या आरोपाला शशिकांत शिंदे यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. घोटाळा केला असता तर मी भाजपमध्ये गेलो असतो, असे प्रत्युत्तर देत शशिकांत शिंदे यांनी भाजपची अडचण केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घोटाळे, भ्रष्टाचार करणाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांच्या कृत्यांवर पांघरून टाकले जाते, अशी लोकभावना तयार करण्यात महाविकास आघाडीतील पक्षांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. यामुळे निवडणुकीत यश मिळेल का, हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही. लोकांमध्ये असा संदेश गेला असला तरी निवडणुकीच्या राजकारणावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे भाजपला वाटत असावे. तसे वाटण्यालाही आधार आहे. अन्यथा, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करून भाजपने त्याच नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला नसता. एकंदरीत, भाजपने लोकांना गृहीत धरले असावे.  

भ्रष्टाचारी नेत्यांबद्दल लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, असे लोकांना मनोमन वाटत होते, अजूनही वाटतेच आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचे हे एक प्रमुख कारण होते. सुरुवातीला भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई झाली की सर्व थरांतील लोक त्याचे स्वागत करायचे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. फक्त विरोधकांवरच कशी कारवाई होते, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये लोकांची अशी भावना नव्हती. दुसऱ्या टर्ममध्ये ती बदलली आहे. वर्षानुवर्षे भाजपचे कार्यकर्ते ज्यांच्याविरोधात लढले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता भाजपमध्ये घेण्यात आले आणि कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत काम करावे लागत आहे. अशा नेत्यांची मोठी यादी तयार होऊ शकते.

Mahesh Shinde, Devendra Fadnavis, Shashikant Shinde
Nashik constituency 2024 : हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा ग्रीन सिग्नल ?

भ्रष्टाचाराच्या आरोपवरून झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे, असे काही नेते आहेत ज्यांच्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्याच्या काही दिवसांतच अशा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश तरी केला किंवा ते भाजपसोबत तरी आले. याच कारणामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारवाईबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

शशिकांत शिंदे यांनी लोकांच्या मनातील या शंकेला, भावनेला हवा देत योग्य संधी साधली आहे. घोटाळा केला असता तर मी भाजपमध्ये गेलो नसतो का, असा प्रश्न विचारून त्यांनी भाजपची कोंडी केली आहे. भाजपने आपली अशी प्रतिमा का तयार करून घेतली असेल? सत्ता मिळवण्याच्या आणि टिकवण्याच्या नादात जमिनीवरील कार्यकर्त्यांची किती अडचण झाली आहे, याची भाजपला कल्पना नसेल का? ज्यांच्यावर कायम आरोप केले त्यांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी करताना भाजपने काय विचार केला असावा..? अर्थातच सत्ता, असे या प्रश्नाचे उत्तर आहे.

सत्ता मिळाल्यानंतर नेत्यांचे भले होत असेल, मात्र जमिनीवरील कार्यकर्त्याला काय मिळत असेल? पक्षासाठी, पक्षाच्या विचारांसाठी खपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र निराशाच येत असणार. शशिकांत शिंदे यांनी जे प्रत्युत्तर दिले, त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना नक्कीच वेदना होत असतील. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हे सर्व करायला हवे, असा मंत्र भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे सध्यातरी सर्वकाही सुरळीत असल्याचे चित्र दिसत आहे.

R

Mahesh Shinde, Devendra Fadnavis, Shashikant Shinde
Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात दुरंगी, तर हातकणंगलेत चौरंगी लढत; हे उमेदवार असणार रिंगणात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com