
PM Narendra Modi’s Kerala Strategy Explained : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जम बसवत आपली विचारधारा तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी हा तरूण जोमानं काम करत होता. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण एका वळणावर या संघर्षापायी त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले. वयाच्या 30 व्या वर्षीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, त्यांचे दोन्ही पाय तोडण्यात आले. पण तरीही हार मानली नाही, लढत राहिले. त्यांच्या या संघर्षाची दखल आज राष्ट्रपतींनी घेतली अन् राज्यसभेचे सदस्य बनले.
सदानंदन मास्टर असे त्यांचे नाव आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार व्यक्तींची राज्यसभेसाठी निवड केली आहे. त्यामध्ये मास्टर यांच्याही नावाचा समावेश आहे. केरळमधील प्रसिध्द शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. केरळातील त्रिशूर जिल्ह्यातील पैरमंगलममधील श्री दुर्गा विलासम उच्च माध्यमिक शाळेत ते 1999 पासून सामाजिक विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत.
मास्टर यांनी गुवाहाटी विद्यापीठात बी.कॉम आणि कालीकत विद्यापीठातून बी.एड. या पदव्या प्राप्त केला आहे. केरळमधील राष्ट्रीय अध्यापक संघाचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या ‘देशीय अध्यापक वार्ता’ या नियतकालिकाचे संपादक आहेत. ता. 25 जानेवारी 1994 रोजी ते 30 वर्षांचे असताना कन्नूर जिल्ह्यातील त्यांच्या घराजवळ त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.
कन्नूर हा जिल्हा केरळमधील राजकीय हिंसेचा गड मानला जातो. मास्टर यांच्यावरील राजकीय वादातूनच हल्ला झाला होता. त्यांचे दोन पाय तोडण्यात आले होते. सीपीआय (एम) च्या कार्यकर्त्यांना हे कृत्य केल्याचा आरोप होता. डाव्या विचारसरणीला त्यांचा विरोध असल्याने हा हल्ला झाल्याचे मानले जाते. पण या हल्ल्यानंतरही मास्टर सार्वजनिक जीवनात सक्रीय राहिले.
मास्टर यांनी कन्नूरमधील कूथुपरम्बा विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. ते भारतीय विचार केंद्रमसारख्या वैचारिक संघटनेतही सक्रीय आहे. राजकीय हिंसेविरोधात ते सतत आवाज उठवत असतात. तसेच शिक्षणामध्ये सुधारणांबाबत ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांची पत्नी वनिता राणी याही शिक्षिका आहेत.
केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर मास्टर यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्याने विधानसभेसाठी भाजपचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा आहे. केरळमधील भाजप कार्यकर्त्यांसाठी मास्टर हे प्रेरणास्थान आहेत. मागील काही वर्षांमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा हत्या झाल्या आहेत. यामागे डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. मास्टर यांनाही त्याची झळ पोहचली आहे. त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांचा आवाज मास्टर यांच्या रुपाने राज्यसभेत पोहचला आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांना बळ देण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
सी. सदानंदन मास्टर यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सी. सदानंदन मास्टर यांचे जीवन साहस आणि अन्यायसमोर न झुकणारी प्रेरणा आहे. हिंसा आणि धमकी त्यांच्या राष्ट्रीय विकासासाठीच्या ध्येयाला हरवू शकली नाही. एक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. युवा सशक्तीकरणाप्रती ते कटिबध्द आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.