Sanjay Shirsat : 'ती' एक चूक अन् मंत्री शिरसाट पुरते घेरले गेले, पक्षातही एकाकी पडले!

The Political Blunder That Isolated Sanjay Shirsat : लाडकी बहीण योजनेसाठी महिनाभरापूर्वी पहिल्यांदा सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवण्यात आला. त्यावर जाहीर नाराजी व्यक्त करणारे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे आता पुरते घेरले गेले आहेत. स्वपक्षातही शत्रू निर्माण केल्यामुळे ते आता एकाकी पडले आहेत.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Impact of the Controversy on Sanjay Shirsat’s Image : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा तोरा, रूबाब काही औरच होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांना त्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांची चिडचिड झाली. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका करण्यात ते कधीच मागे राहिले नाहीत. ज्या पक्षात त्यांची राजकीय कारकीर्द घडली, त्या पक्षाच्या पूर्वाश्रमीच्या नेतृत्वाविरुद्ध आक्रमक होणारे शिरसाट आता मात्र बॅकफूटवर गेले आहेत. एक चूक त्यांना भोवली आणि पक्षात ते एकाकी पडले. त्यांचा रूबाब, तोरा आता गायब झाला आहे.

यंदाच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संजय शिरसाट यांनी अजितदादा पवार यांच्या अर्थ खात्यावर सडकून टीका केली होती. शिरसाट हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी त्यांच्या खात्याचा निधी वळवण्यात आला होता. त्यामुळे शिरसाट यांनी अर्थ खात्यावर टीकेचे बाण सोडले होते. महायुतीत अजितदादांचा प्रवेश शिवसेनेला आवडला नव्हता. त्यामुळे धुसफूस सुरूच होती. निधी वळवण्याच्या निर्णयावर शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी अजितदादांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही रोष ओढवून घेतला.

त्याच्या काही दिवसांनंतरच शिरसाट यांच्या मुलाचे प्रकरण बाहेर आले. एका महिलेने त्यांच्या मुलाला कायदेशीर नोटीस बजावली होती. माध्यमांत त्याची चर्चा सुरू झाली आणि शिरसाट यांची कोंडी झाली. दोन -तीन दिवसांतच हे प्रकरण मिटवण्यात शिरसाट यांना यश आले. हे प्रकरण शांत होत असतानाचा आणखी एक प्रकरण चर्चेत आले. शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. शिरसाट यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आले, असे आरोप झाले. आता शिरसाट पुरते घेरले होते.

Sanjay Shirsat
State Commission for Woman : नीलमताई गोऱ्हे, आता आव्हान स्वीकारलंच आहे तर पूर्ण करूनच दाखवा... महिला आयोगाची कार्यक्षमता वाढवा!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्या आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांना प्रत्युत्तर देताना त्यांची जीभ घसरली. मी थोडा चक्रम आहे, घराला आग लावण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असे प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिले. त्यामुळे शिरसाट यांचीच नाचक्की झाली. राऊत आणि दानवे यांच्या जाळ्यात ते पूर्णपणे अडकले. हे प्रकरण शांत होत आहे, असे वाटत असतानाचा आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचे समोर आले आहे.

मंत्री शिरसाट यावर नाराजी व्यक्त करायच्या आधीच त्यांना आणखी एका प्रकरणात गोवण्यात आले आहे. शिरसाट यांनी एमआयडीसीतील आरक्षित जागा खरेदी केली, त्यासाठी आरक्षण उठवण्यात आले, असा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट आणखी बॅकफूटवर जाणार आहेत. या सर्व प्रकरणांत पक्ष किंवा पक्षाचे त्यांचे जिल्ह्यातील सहकारी त्यांच्या मदतीला आल्याचे दिसत नाही. शिरसाट हे छत्रपती संभीजनगरचे पालकमंत्री आहेत. ते पालकमंत्री असण्यातच त्यांच्या एकाकी पडण्याची बीजे रोवली गेली आहेत.

Sanjay Shirsat
Nitesh Rane : शांत राहण्याची मुदत संपली का? देवाभाऊंचे लाडके मंत्री नितेश राणे पुन्हा गरळ ओकताहेत

अब्दुल सत्तार हे पालकमंत्री असताना शिरसाट यांनी त्यांची अडचण केली होती. स्वतः पालकमंत्री बनल्यानंतर त्यांनी सत्तार यांच्या आधीच्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. अतुल सावे हे भाजपचे मंत्री आहेत. तेही पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. शिरसाट यांनी बाजी मारली. त्यामुळे दोघांत सख्य नाही. स्वपक्षाचे अब्दुल सत्तार यांच्याशी तर शिरसाट यांचे शत्रुत्व असल्यासारखेच आहे. प्रदीप जैस्वाल यांच्याशीही त्यांचे जमत नाही, सर्वकाही मलाच हवे, या हव्यासापोटी शिरसाट यांनी स्वपक्षातही शत्रू तयार केले आहेत. त्यामुळे आता ते एकाकी पडले आहेत.

शिरसाट हे सुरुवातीच्या काळात बजाज कंपनीत हेल्पर होते. त्यांनी रिक्षाचालक म्हणूनही काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी रस्त्यावरच्या सामान्य तरुणांना उचलून आमदार, खासदार केले. शिरसाट हे त्यातलेच. एकेकाळी रिक्षाचालक असलेल्या शिरसाट यांचे साम्राज्य आता डोळे दीपवून टाकणारे आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पाच एकरांत त्यांचे घर आहे म्हणे. जिल्ह्यातील सर्वात मोठी आसामी, अशी ओळख आता शिरसाट यांची निर्माण होऊ पाहत आहेत. ही ओळख त्यांच्यासाठी यापुढेही अडचणीची ठरणार आहे.

Sanjay Shirsat
Thackeray brother message update: सगळं ठरलंय! आता ठाकरेंचा संदेश नव्हे, थेट बातमीच बाहेर येणार...

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिरसाट विजयी झाले आहेत. मध्य मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेचे खच्चीकरण केल्याशिवाय भाजपचा मार्ग सोपा होणार नाही. शिरसाट यांची कोंडी करण्यामागे हेही एक कारण आहे. असे सांगितले जाते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही शिरसाट यांच्यावर नाराज आहे. शिंदे यांच्यासोबत आमदार गुवाहाटीला गेले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि विदर्भातील त्यावेळच्या काही घडामोडी त्यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने टीका करण्याची सवय शिरसाट यांना लागली होती. त्यांच्याकडे त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रवक्तेपदही होते. राजकारण फार जपून करावे, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कसलेले राजकारणी तुमच्यासमोर असतात. एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार यांनी किंवा या दोघांनीही भाजपची साथ सोडली तरीही सरकार धोक्यात येणार नाही, असे संख्याबळ भाजपकडे आहे. शिंदे आणि पवारही सत्तेला सोडू शकत नाहीत, हे फडणवीस यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे या दोन्ही मित्रपक्षांवर त्यांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.

ही परिस्थिती शिरसाट यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर केल्यासारखी टीका ते अजितदादांवर करायला गेले आणि अडकून बसले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची एकेक प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. यातून त्यांची लवकर सुटका होईल, असे चित्र दिसत नाही. शिरसाट यांची यातून सुटका होणारच नाही, असे काही राजकीय अभ्यासकांना वाटत आहे. सत्तेचा, पदांचा हव्यास कधी कधी अंगलट येतो. शिरसाट यांचे तसेच झाले आहे. हव्यासापोटी त्यांनी स्वपक्षातही शत्रू निर्माण केले. त्यामुळेच आता अडचणीच्या प्रसंगांत ते एकटे पडले आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com