Nitesh Rane : शांत राहण्याची मुदत संपली का? देवाभाऊंचे लाडके मंत्री नितेश राणे पुन्हा गरळ ओकताहेत

Nitesh Rane latest news : सामाजिक सलोख्याला नख लागेल, अशी विधाने खुद्द मंत्रीच करत आहेत. विशिष्ट धर्मीयांना सातत्याने लक्ष्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुर्लक्ष झाले आहे. राणे यांना फडणवीस यांचा पाठिंबा आहे का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

मंत्री नितेश राणे यांचा तोल ढासळण्यावर, त्यांच्या बेताल वक्तव्यांवर लावण्यात आलेली तात्पुरती स्थगिती आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे ते पुन्हा बरळत सुटले आहेत. मंत्रिपदावर असूनही विशिष्ट धर्मींयांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेत आहेत. त्या धर्मीयांचा एखादा सण आला की राणे यांचा तोल हमखास सुटतो. मध्यंतरी शिवरायांच्या इतिहासाचीही त्यांनी मोडतोड केली होती. असे सांगितले जाते की, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी तूर्त शांत राहण्याचा सल्ला दिला होता. त्या सल्ल्याची मुदत आता संपल्याचे दिसत आहे.

बकरी ईद व्हर्चुअल साजरी करा, असा मंत्री राणे यांचा हट्ट आहे. हिरव्या सापांची वळवळ आता चालू देणार नाही, असे त्यांचे सोलापुरातील ताजे वादग्रस्त विधान आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी यावरून राणे यांना सुनावले होते, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही यावरून वाचाळांना सुनावले आहे. प्रत्येकाला आपला धर्म आणि रितीरिवाजानुसार पूजापाठ करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला त्याच्या रितीरिवाजानुसार त्यांचे सणवार साजरे करण्याचा अधिकार आहे, असे भागवत म्हणाले आहेत.

सोलापुराचील वक्तव्याच्या आधीही मंत्री राणे (Nitesh Rane) असेच बरळले होते. त्या पार्श्वभूमीवर भागवत यांच्या विधानाला मोठे महत्व आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री हे कोण्या एका समाजाचे नसतात, ते सर्वांचे असतात. त्यांना मत न दिलेल्यांचेही असतात. देशात लोकशाही आहे, राज्यघटना आहे. राज्यघटनेनुसार देश चालत असतो. राणे किंवा एखादा मंत्री काय म्हणतो, त्यावर देश चालत नसतो. राणे यांना असे वाटत नसेल तर त्यांना राज्यघटना मान्य नाही, असे म्हणावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमती असल्याशिवाय मंत्री राणे अशी बेताल वक्तव्ये करू शकत नाहीत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मंत्री राणे असे का बोलतात, धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न का करतात आणि त्यांना फडणवीस पाठिशी का घालतात, या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरेजेचे आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचे मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुतीला ही दोन्ही आश्वासने पूर्ण करता आलेली नाहीत. यासह अन्य समस्या, प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये, यासाठी धार्मिक ध्रुवीकरण करण्याची मुभा मंत्री राणे यांना देण्यात आलेली असावी.

Nitesh Rane
RBI Repo Rate : गृहखरेदीचं स्वप्न आता होणार साकार! आरबीआयचा मोठा निर्णय, रेपो रेटमध्ये पुन्हा कपात

शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असे वादग्रस्त विधान मंत्री राणे यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. इतिहासाची मोडतोड केल्यामुळे त्यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. भाजपला बॅकफूटवर जावे लागले होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे यांना बोलावून घेऊन समज दिला होती, तूर्त शांत राहा, असे सांगितले होते. राणे यांनी मात्र त्याचा इन्कार केला होता. फडणवीस यांच्या आवडत्या मंत्र्यांच्या यादीत मीही आहे, अशी मखलाशी करत, मुख्यमंत्री माझ्यावर नाराज असण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले होते.

मंत्री नितेश राणे सातत्याने गरळ ओकत असतात, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना जाहीरपणे एकदाही समज दिलेली नाही. मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे, हे राणे यांचे म्हणणे त्यामुळे पटण्यासारखे आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खासगीत समज दिली असती तर मंत्री राणे यांना तोंड बंद ठेवावे लागले असते. त्यांची बेताल बडबड पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांना खासगीतही समज दिलेली नसावी. देवेंद्र फडणवीस हे शक्तिशाली नेते म्हणूनव उदयाला येत आहेत. त्यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणूनही पाहिले जात आहे, मात्र राणे यांच्यासारख्या उथळ मंत्र्याला पाठिशी घालत असल्याने फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का बसणार आहे.

Nitesh Rane
Shivrajyabhishek Raigad : अन् आमचा राजा सिंहासनावर बसला... 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दिमाखदार फोटो!

मंत्र्यांच्या असा प्रक्षोभक विधानांची काही राज्यांत न्यायालयांनी स्वतःहून दखल घेतली आहे. कोणाशीही भेदभाव करणार नाही, अशी शपथ मंत्र्यांना दिली जाते. नितेश राणे यांनाही अशी शपथ देण्यात आली आहे. या शपथेच्या एकदम उलट भाषा ते वापरत आहे. न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली तर भाजपची नाचक्की होणार आहे, 'सबका साथ सबका विकास' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला मंत्री नितेश राणे यांनी हरताळ फासला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेला हरताळ फासण्यासाठी मंत्री राणे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा पाठिंबा आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्य, देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक सलोख गरजेचा असतो. नेत्यांच्या मनात एखाद्या समाजाच्या विरोधात द्वेष नसेलही, मात्र ध्रुवीकरण करण्यासाठी, मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, सत्ता कायम राखण्यासाठी अशी बेताल विधाने केली जातात. त्यामुळे सामाजिक सलोख्याला नख लागते, हे फडणवीस यांना कळत नाही, असे म्हणता येणार नाही. अपयश झाकण्यासाठी सरकारे अशा पद्धतींचा अवलंब करत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आश्वासनांची पूर्तता करण्यात त्यांना आलेले अपयश झाकण्यासाठी राणे यांच्यासारख्या उथळ मंत्र्याचा वापर करत आहेत का, असाही प्रश्न आहेच. माजी मुख्यमंत्र्यांची अशी पुढची पाहिली नव्हती, असे विधान शरद पवार यांनी नितेश राणे यांना उद्देशून केले होते. पवारांचे ते विधान नितेश राणे हे वारंवार खरे करून दाखवत आहेत.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com