Dhananjay Munde News : सोडताही येईना, धरताही येईना...! कार्यकर्त्यांसाठी कराड हिरो हीच मुंडेंची सर्वात मोठी अडचण!

Walmik Karad News Santosh Deshmukh Muder Case Beed Crime Beed Politics : वाल्मिक कराडच्या कारवायांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे आता कराडला सोडावे की धरावे, अशी द्विधा अवस्था मुंडेची झाली असल्याचे दिसते. कार्यकर्त्यांसाठी कराड हा हीरो आहे, ही मुंडेंची सर्वात मोठी अडचण आहे.
Walmik Karad | Dhananjay Munde
Walmik Karad | Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

असे सांगितले जाते, की पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. नको त्या उद्योगांमुळे अनेक राजकीय नेते अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत. सत्ता लोकांनी दिलेली असते, त्याचा वापर लोकांच्या भल्यासाठी, त्यांचे जगणे सुकर करण्यासाठी करायचा असतो, याचा विसर पडला की नेते वाट चुकतात, त्यांचे समर्थकही वाट चुकतात. नेते आणि समर्थकांचीही वाट चुकली की काय होते, हे महाराष्ट्र सध्या अनुभवतो आहे, तो धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यामुळे.

सध्या बीड जिल्हा राज्यभरात गाजत आहे, मात्र वाईट अर्थाने. सत्ता आपली आहे म्हणून काहीही केले तरी चालू शकते, या समजाला लोकरेट्याने तडा दिला आहे. मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांना करण्यात आलेली अमानुष मारहाण आणि त्यात त्यांचा झालेला मृत्यू यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचे साम्राज्य खालसा करणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. धनंजय मुंडे यांची गोची झाली आहे, ते अडकले आहेत. पुढेही जाता येत नाही आणि मागेही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

Walmik Karad | Dhananjay Munde
Kolhapur Politics : कुणी पालकमंत्री देता का पालकमंत्री! कोट्यवधींची कामे ठप्प, कुणाचंच काही चालेना...

सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावर परळीचा माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड याच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मोक्का कायदा लावण्यात आला. पवनऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या कराडवरही मोक्का लावण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात त्यालाही आरोपी करण्यात आले आहे. परळीसह बीड जिल्ह्यावर वाल्मिक कराड याची एकहाती सत्ता होती. मंत्रिपदावर धनंजय मुंडे असले तरी हुकूमत मात्र कराड याचीच चालत असे. त्यामुळे कराडला सोडले तर मुंडे यांचा मतदारसंघातील राजकीय खेळ संपुष्टात येणार आहे.

धनंजय मुंडे यांचे परळी आणि जिल्ह्यातील सर्व कामे वाल्मिक कराड पाहत असे. त्यामुळे बहुतांश कार्यकर्ते कराड याच्याच संपर्कात राहत असत. जे काही लाभार्थी कार्यकर्ते आहेत, ते सर्वच्या सर्व कराड याच्याशी एकनिष्ठ आहेत. अशा कार्यकर्त्यांसाठी कराड हा हिरो आहे, धनंजय मुंडे नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यासाठी ही सर्वात मोठी अडचणीची बाब आहे. त्यामुळे मुंडे हे कराडला सहजसहजी सोडू शकत नाहीत. कराडशी संबंध तोडला तर मुंडे यांच्या परळीतील, बीड जिल्ह्यातील राजकीय अस्तित्वाला नक्कीच मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे मुंडे यांना पुढे जाता येईना आणि मागेही येता येईना झाले आहे. मुंडे यांना कराडला धरताही येत नाही सोडताही येत नाही, अशी सध्याची अवस्था आहे.

Walmik Karad | Dhananjay Munde
Saif Ali Khan Attacked : सैफच्या घरात आरोपी कसा शिरला, काय होता उद्देश? पोलिसांना लागला सुगावा...

कराडची कार्यपद्धती वादग्रस्त होती, हे एव्हाना समोर आलेले आहे. त्याला धनंजय मुंडे यांची मान्यता होती का, कराड कशा पद्धतीने काम करत होता, हे मुंडे यांना माहित नव्हते का, याची उत्तरेही समाजाला मिळालेली आहेत. कराड याच्या वागण्याला, त्याच्या कार्यपद्धतीला धनंजय मुंडे यांची मान्यता नव्हती, असे जर कोणाला वाटत असेल तर तो भाबडेपणा ठरेल. मुंडे यांना ही जबाबदारी झटकताच येणार नाही. कराड याच्या जवळ सध्या तरी त्यांना जाता येत नाही. या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड याच्या पत्नी मंजिली यांचे एक वक्तव्य धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवणारे ठरणार आहे.

कराड याला मोक्का लावल्यानंतर मंजिली कराड या आक्रमक झाल्या आहेत. राजकारणासाठी आणि केवळ निवडून येण्यासाठी माझ्या पतीचा वापर करून घेतला आणि आमच्यावर वेळ आल्यानंतर काहींनी आमची साथ सोडली, असे कोणाचेही नाव न घेता त्या पत्रकार परिषदेत बोलल्या आहेत. कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख धनंजय मुंडे यांच्याकडेच होता, हे स्पष्ट आहे. कराडची साथ सोडली तर मुंडे यांचे साम्राज्य खालसा होईल, याचे संकेत देणारे मंजिली कराड यांचे हे विधान आहे. सोबत राहिले तरी मुंडे यांची अडचण ठरलेलीच आहे.

Walmik Karad | Dhananjay Munde
MLA Rohit Pawar On Beed : राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन् गुंड असा आहे 'बीड पॅटर्न'

राजीनामा द्यावा, यासाठी धनंजय मुंडे यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून मोठा दबाव असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन केले. धनंजय मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही किंवा त्यांना उपस्थित राहू दिले गेले नाही. पंकजा मुंडे यांचाही मंत्रिमडळात समावेश झालेला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर पंकजा यांचे महत्व वाढणार आहे. अशा परिस्थितीत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

पंकजा आणि धनंजय मुंडे हे बहिण-भाऊ सध्या एकत्र असले तरी काही वर्षांपूर्वी त्यांच्यातून आडवा विस्तव जात नव्हता, हे लक्षात घेतले पाहिजे. काका गोपीनाथ मुंडे यांच्याशी बंड करून धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून पंकजा यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडीचे सरकार कोसळून महायुतीचे सरकार आल्यानंतर बहिण-भाऊ एकत्र आले आहेत. सतेच्या नशेत बेलगाम झाल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. ज्याच्यावर विसंबून राहिले, त्या कराडला आता सोडणार की धरणार, राजीनामा देणार की नाही... काहीही झाले तरी धनंजय मुंडेंची अडचण होणे निश्चित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com