Pune, 29 Jan 2025: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद सध्या अडचणीत सापडले आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
कराड यांचे निकटवर्तीय असल्याने मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा, अशी मागणी करुन विरोधकांनी रान उठवले आहे. गेल्या महिन्यापासून याच मुद्यावर राज्यातील राजकारण पेटलं आहे. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पक्षाची बैठक झाली. यात मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा झाली. बैठकीनंतर मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले आहेत.
आज दिल्लीत ते भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहे. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीश्वरांच्या हातात असल्याचे बोलत जाते. 'मला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे, अजित पवारांनी सांगितले तर राजीनामा देईल,' अशी भूमिका मुंडे यांनी घेतली आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंनीच राजीनामा द्यावा, असा आग्रह आमदारांचा असल्याची माहिती समोर येत आहे.
सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पोलिस आयुक्त, अजित पवार यांची भेट घेऊन मुंडे यांचा राजीनामा घ्या, असे सांगितले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणचा तपास सीआयडी आणि एसआयटी करीत आहे. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर कराड हत्या प्रकरणात मुंडे यांचे नाव आल्याने महायुती सरकारवर दररोज आरोपांच्या फैरी झडत आहेत.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री असलेले मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे फडणवीसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी यावर लक्ष ठेवून आहेत. देशमुख हत्या प्रकरण, मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी यावर काय निर्णय होणार? हे प्रकरण फडणवीसाठी पहिली लिटमस टेस्ट असल्याचे बोलले जाते.
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली. याप्रकरणी अद्यापपर्यंत 8 जणांना सीआयडीने अटक केली आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे आमदार सुरेश धस सर्वात पुढे आहेत. मुंडेंच्या मागणीसाठी सुरेश धस यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचीही भेट घेतली आहे.
देशमुख हत्या प्रकरणात जर मुंडे यांनी राजीनामा दिला तर महायुतीची प्रतिमा खराब असल्याचे संकेत जनतेत जाईल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते. मुंडेंच्या सहभागाबाबत पुरावे असतील तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असे त्याचे म्हणणं आहे. पण पुराव्याशिवाय महायुती मुंडे यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही, असे स्पष्ट आहे.
तपास पूर्ण झाल्याशिवाय मुंडे राजीनामा देणार नाही, किंवा त्यांच्या विरोधात थेट पुरावे असतील, तर ते राजीनामा देतील, असे सांगण्यात येते. देशमुख हत्या प्रकरण खटला हा फॉस्टट्रक कोर्टाकडून चालविण्यात जावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे, याबाबत फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.