तयारी विधानसभेची - साताऱ्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला अभेद्य राहणार?

गेल्या वेळी मोदी लाटेतही शाबूत राहिलेला सातारा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला. आगामी विधानसभा निवडणुकीत या किल्ल्याचे एक- दोन तरी तट कसे कोसळतील, याचे मनसुबे या लोकसभा निवडणुकीत शिजले आहेत...
तयारी विधानसभेची - साताऱ्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला अभेद्य राहणार?

"आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना विजयी करण्याची जबाबदारी माझी आहे. या आमदारांना मी निवडून आणणार म्हणजे आणणारच.''... 
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे लोकसभेच्या प्रचारातील हे जाहीर विधान. 
लोकसभेसाठी उदयनराजे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काही आमदारांचा विरोध सर्वश्रुत होता. तो डावलून पक्षश्रेष्ठींनी उदयनराजेंनाच उमेदवारी दिली. या पार्श्‍वभूमीवर विरोध करणाऱ्या या आमदारांना खूष करण्यासाठी, त्यांना आपल्या कामाला जुंपण्यासाठी उदयनराजेंनी हे विधान केले आणि खऱ्या अर्थाने येथूनच लोकसभेच्या निवडणुकीत आगामी विधानसभा डोकावू लागली. उदयनराजेंच्या राजकीय उपद्रव मूल्यांचा मागील काही निवडणुकांत अनुभव असलेले राष्ट्रवादीचे आमदार झपाटून उदयनराजेंसाठी कामाला लागले; पण उदयनराजेंच्या या विधानाचा उलटा परिणाम असा झाला, की आगामी विधानसभेतील या आमदारांच्या संभाव्य विरोधकांचेही राजकीय भान जागरूक झाले.

या सर्वांनी युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे धनुष्यबाण उचलून धरले. अलीकडेच भाजपवासी झालेले मदन भोसले, कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक मनोज घोरपडे, कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले, सातारा-जावळीतून दीपक पवार, कोरेगाव-खटावमधील महेश शिंदे या सर्व मंडळींना भाजपने पाच वर्षांत मोठी ताकद दिली आहे. भाजपचे हेच शिलेदार आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे विरोधक असणार आहेत. असे असले तरी गेल्या लोकसभा निवडणुकीत या सर्व शिलेदारांनी उदयनराजेंसाठीच काम केले होते.

या वेळी मात्र "राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडून आणणारच,' या उदयनराजेंच्या भीष्मप्रतिज्ञेमुळे या सर्वांना आगामी काळाचा अंदाज आला आणि त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे प्रामाणिकपणे काम केले. पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनीही आपले उदयनराजेंबरोबर असलेले सख्य बाजूला ठेवून नरेंद्र पाटलांसाठी का होईना; पण धनुष्यबाण घराघरांत पोचवून ठेवला. त्याचाच परिणाम म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातील लढत कधी नव्हे एवढी चुरशीची झाली. निकाल काय लागणार हे 23 मे रोजी जसे कळेल, तसेच या सहाही विधानसभा मतदारसंघांतील मतदानाचे आकडे आगामी विधानसभेला काय होऊ शकते, याची झलक दाखवणार आहेत, हेही तितकेच खरे. 

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. लोकसभा निवडणुकीतील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत हा बालेकिल्ला राहणार का, याची मोठी परीक्षा राष्ट्रवादीला द्यावी लागणार, हेही स्पष्ट आहे. कोणत्याही विधानसभा मतदारसंघाचा बारकाईने विचार केला, तर राष्ट्रवादीपुढील या अवघड परीक्षेचा अंदाज येतो. सातारा मतदारसंघात गेल्या वेळी जे काम एकदिलाने झाले, ते या वेळी दिसले नाही.

वाईत मदन भोसलेंसारखे बडे प्रस्थ भाजपच्या गोटात गेले आहे. पाटणमध्ये सत्यजितसिंह पाटणकर उदयनराजेंना मताधिक्‍य देणार, की ते कमी होणार यावर बरेच अवलंबून आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये उदयनराजेंच्या मताधिक्‍याच्या दृष्टीने आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे नजरा आहेत. कऱ्हाड दक्षिणमध्ये विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाने विरोधी उमेदवाराचे काम करून धोक्‍याची घंटा वाजवली आहे.

कोरेगावात महेश शिंदे आणि रणजितसिंह भोसले या युतीतील संभाव्य उमेदवारांनी आमदार शशिकांत शिंदेंच्या विरोधात केलेली वातावरणनिर्मिती राष्ट्रवादीला अडचणीची ठरू शकते. तात्पर्य काय, तर लोकसभा निवडणुकीतून मतांचे येणारे आकडे विधानसभा निवडणुकीसाठी दिशादर्शक असतील आणि त्यावरच सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहणार का हे ठरणार आहे. 

असा आहे राजकीय पट 
- युतीत जागावाटपावरून वाद होणार 
- लोकसभेतील मतांची गणिते राष्ट्रवादीला ठरू शकतात जाचक 
- गेल्या पाच वर्षांत भाजपची वाढलेली ताकद आघाडीसाठी डोकेदुखी 
- राष्ट्रवादीच्या काही आमदारांना अँटी इकम्बन्सीचा सामना करावा लागणार 
- उदयनराजेच राहणार जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com