
सोलापूर भाजपमध्ये गटबाजी तीव्र: जयकुमार गोरे यांना पालकमंत्री केल्यामुळे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख नाराज; नवखे आमदार कोठे आणि कल्याणशेट्टी यांना पक्षाचा वाढता पाठिंबा.
विरोधी पक्षांची परिस्थिती कमकुवत: काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव, राष्ट्रवादी (शरद गट) शांत, शिवसेनेत कारभाऱ्यांची गर्दी; एकत्रित विश्वासार्ह नेतृत्वाचा अभाव भाजपच्या फायद्यात.
शक्तिपीठ महामार्ग आंदोलन आणि वारीचा राजकारणात वापर: भाजपने वारीसाठी आध्यात्मिक जोड साधली, तर विरोधकांनी याच काळात पंढरपूरात महामार्गाविरोधात आंदोलन केलं.
मराठीच्या मुद्द्यावर एक झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. त्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस हे पंढरपूरकडे निघाले होते. मुख्यमंत्री असताना सात वर्षांनंतर २०२५ मध्ये महापूजेचा पुन्हा मिळालेला मान या आठवणीत पंढरीतील वैष्णवांच्या मेळ्यात ते रमल्याचे दिसले. राज्याला आध्यात्मिकदृष्ट्या जोडण्याची ताकद पंढरपुरात आहे. हेच ओळखत यंदाच्या आषाढी वारीकडे भाजपने विशेष लक्ष दिले. विरोधकांनीही हेच ओळखून आषाढीच्या मुहूर्तावर शक्तिपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन केले.
सोलापूर जिल्ह्यात ११ पैकी ५ आमदार भाजपचे आहेत. वाढलेल्या आमदारांसोबत जिल्ह्याच्या भाजपममध्ये गटबाजीही वाढली आहे. आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरुद्ध आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे असे चित्र आहे. भाजपने या दोन दिग्गज आमदार देशमुखांना डावलून सोलापुरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर दिली आहे.
नवख्या गोरेंवर ही जबाबदारी आल्यापासून दोन दिग्गज देशमुख आमदार फटकून वागत आहेत. पालकमंत्री गोरेंजवळ आमदार कल्याणशेट्टी व कोठे दिसत आहेत. माढा (जि. सोलापूर) लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माणमधून (जि. सातारा) पालकमंत्री गोरे चौथ्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना निम्मा जिल्हा चांगलाच माहिती आहे. फारसे माहिती नसलेल्या सोलापूर शहरासाठी पालकमंत्री गोरे हे महापालिका आयुक्त म्हणून डॉ. सचिन ओम्बासे यांच्यावर अवलंबून दिसतात. पालकमंत्री गोरे आणि आयुक्त ओम्बासे हे माण तालुक्यातील असल्याने सोलापुरात त्यांचे सध्या मस्त चालल्याचे दिसत आहे.
सोलापूर भाजपमधील गटबाजी दोन विरुद्ध दोन आमदार अशीच आहे. माजी मंत्री अन् सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांचे विरोधक काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मोठी मदत झाली. भाजपमुळे माने यांना बाजार समितीच्या सभापतिपदाची लॉटरी लागली. आषाढी वारी संपवून जाताना आमदार कल्याणशेट्टी व सभापती माने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्याचे फलित लवकरच दिसण्याची शक्यता आहे. विरोधकांना आपल्याच पक्षाची माणसे मदत करू लागल्याने आमदार देशमुख अस्वस्थ दिसत आहेत.
सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षपदी रोहिणी तडवळकर यांची वर्णी लागल्याने भाजपचे दुसरे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख हेही अस्वस्थ दिसत आहेत. आमदार देशमुखांची अस्वस्थता त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शहराध्यक्षा तडवळकर यांना आमदार देशमुखांच्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात लहान-लहान गोष्टींसाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहे. एके काळी काँग्रेस व ‘एमआयएम’चा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर शहर उत्तरमधून भाजपचे देवेंद्र कोठे हे युवा आमदार आहेत.
सोलापूरच्या राजकारणात प्रभावशाली असलेल्या पद्मशाली समाजाची मतपेढी आणि कट्टर हिंदुत्वाचे कार्ड सध्या त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शहर भाजपच्या नव्या चमूला दोन दिग्गज आमदार देशमुखांपेक्षा आमदार कोठे जवळचे वाटतात. सोलापूर महापालिकेच्या सत्तेची वाट भाजपसाठी यंदा आमदार देशमुखांसोबतच आमदार कोठेंच्याही मतदारसंघातून जाण्याची शक्यता आहे.
दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जनाधार असलेल्या नेतृत्वाची मोठी पोकळी झाली आहे. प्रणिती शिंदे यांच्या रुपाने काँग्रेसकडे सोलापूरची खासदारकी आहे. परंतु खासदार शिंदे ठराविक कंपूच्या बाहेर पडण्यास तयार नाहीत. सोलापूर शहर असो वा जिल्हा दोन्ही ठिकाणी संघटनात्मक पातळीवर काँग्रेस खिळखिळी झाली आहे.
सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेही जनाधार असलेले नेतृत्व नाही. महायुतीतील शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’कडेही राज्याच्या सत्तेत आहे, एवढाच जमेचा मुद्दा आहे. भाजपच्या विरोधात सर्वांची मोट बांधू शकेल, असे सर्वव्यापी व विश्वासार्ह नेतृत्व सध्या सोलापुरात नसल्याने महापालिका निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व राहील, असे सध्याचे वातावरण आहे. त्यामुळे नाराजांच्या मनधरणीत भाजप अडकताना दिसत नाही.
४० हून अधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जुनेच नाते आहे. महायुतीतून २०१४ मध्ये माढा लोकसभेची जागा ‘स्वाभिमानी’तर्फे सदाभाऊ खोत यांनी लढविली. या निवडणुकीत त्यांना ४ लाख ६४ हजार ६४५ मते मिळाली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तत्कालीन ‘राष्ट्रवादी’कडून अवघ्या २५ हजार ३४४ मतांनी खासदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून संजयमामा शिंदे व पंढरपुरातून प्रशांत परिचारक हे महायुतीतून ‘स्वाभिमानी’चे उमेदवार झाले. या दोघांचा पराभव झाला. परंतु त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.
सदाभाऊ खोत यांनी ‘स्वाभिमानी’ सोडल्यानंतर या जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’च्या फक्त उज्वल आठवणीच राहिल्या आहेत. साखर सहसंचालकांना ‘एफआरपी’चे निवेदन देण्यापुरतीच संघटना सध्या दिसत आहे. मोडलेली संघटना पुन्हा उभी करण्यासाठी नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनाचा पर्याय संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासमोर दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ‘शक्तिपीठ’च्या मुद्यांवर आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आंदोलन केल
यावेळी महापुजेची संधी नसल्याने उपमुख्यमंत्री शिंदे आषाढीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात आले होते. पंढरपुरात त्यांनी ‘बुलेट राईड’ करत पाहणी केली. शिवसेनेची वातावरणनिर्मिती केली. सोलापूरच्या शिवसेनेत सध्या कार्यकर्ते कमी अन् कारभारी जास्त अशीच स्थिती झाली आहे.
जिल्ह्यात पाच जिल्हाप्रमुख, एक सोलापूर शहरप्रमुख, माढा व सोलापूर लोकसभेचा एक संपर्कप्रमुख, या दोघांवर एक संपर्कप्रमुख, संपर्कमंत्री, महापालिका निवडणुकीसाठी आणखी वेगळे दोन मंत्री, अशी गोंधळ उडविणारी यंत्रणा सध्या शिवसेनेत आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील, काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे जिल्ह्याच्या पक्षसंघटनेत फारसे दिसत नाहीत. नगरसेवकही होऊ न शकणारे मात्र मंत्र्यांच्या पुढे पुढे करताना दिसत आहेत.
सोलापूर शहर मध्यमधून ‘एमआयएम’तर्फे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत फारुक शाब्दी यांनी दुसऱ्या क्रमांकाची ६१ हजार ४२८ मते घेतली. सोलापूर शहराध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष ही पदे असतानाच शाब्दी यांच्याकडे ‘एमआयएम’ने मुंबईच्या अध्यक्षाचीही जबाबदारी सोपविली आहे. मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथून तीस वर्षांपूर्वी शाब्दी कुटुंब मुंबईत गेले. मोहम्मद अली रोड परिसरात शाब्दी यांनी चांगला जम बसविला आहे. मुंबई परिसरात उद्योजक म्हणून ओळख असलेले शाब्दी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘एमआयएम’तर्फे प्रमुख निर्णय घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे हे करमाळ्यातून अपक्ष लढले व पराभूत झाले. माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे हेही माढ्यातून अपक्ष लढले व पराभूत झाले. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अन् राजन पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मोहोळमधून ‘राष्ट्रवादी’कडून यशवंत माने लढले अन् पराभूत झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी. माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे हे सध्या शांत दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी सोलापूर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांना संधी दिली आहे. ‘राष्ट्रवादी’त असलेली सध्याची शांतता ही वादळापूर्वीच शांतता तर नाही ना? या तिन्ही तालुक्यात भाजपकडेही ठोस नेतृत्व नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून करमाळ्यातून नारायण पाटील, मोहोळमधून राजू खरे, माढ्यातून अभिजित पाटील आणि माळशिरसमधून उत्तम जानकर आमदार झाले आहेत. या चारही आमदारांना महायुतीचा लळा लागल्याचे दिसत आहे. मोहोळचे खरे शिवसेनेच्या जवळ, तर माढ्याचे पाटील भाजप जवळ जाताना दिसत आहेत.
करमाळ्याचे पाटील व माळशिरसचे जानकर हे त्यांच्या सोयीनुसार कधी भाजपच्या तर कधी ‘राष्ट्रवादी’च्या जवळ जाताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माढ्यातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील अन् भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुकीसाठी काय भूमिका घेतात, यावर या आमदारांची दिशा ठरण्याची शक्यता आहे
Q1. सोलापुरात भाजपमध्ये कोणते गट पडले आहेत?
➡️ सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख विरुद्ध जयकुमार गोरे समर्थक आमदार कोठे व कल्याणशेट्टी.
Q2. काँग्रेसची सोलापुरात काय स्थिती आहे?
➡️ नेतृत्व अभाव, अंतर्गत कलह आणि जिल्हाध्यक्ष नसल्याने काँग्रेस कमकुवत.
Q3. 'स्वाभिमानी' संघटना सध्या कुठे उभी आहे?
➡️ ‘शक्तिपीठ महामार्ग’विरोधी आंदोलनापुरती मर्यादित असून, केवळ आठवणी उरल्या आहेत.
Q4. सोलापुरात महापालिकेवर कोणाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे?
➡️ सध्या सर्वात मजबूत स्थितीत भाजप असून, त्यांचं वर्चस्व दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.