Sharad Pawar : 'भटकती आत्मा' मोदींच्या अंगलट...! 'एनडीए'सह महाराष्ट्रात महायुतीला 'अस्वस्थ' ठेवणार

Sharad Pawar And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. ती मोदींच्या अंगलट आली. विषय संपलेला नाही. हा विषय यापुढेही मोदींसह महाराष्ट्रात भाजपला अस्वस्थ ठेवणार आहे. तसे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama

Sharad Pawar On Narendra Modi : असे म्हणतात की, आत्मा म्हणजे शुद्ध, स्वयंभू जाणीव. त्यालाच ब्रह्म किंवा शुद्ध चैतन्य असेही म्हटले जाते. भटकती आत्मा शब्दाचा अर्थ नेमका याच्या उलट आहे. जी शुद्ध नाही, इच्छा-आकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे ती अतृप्त आहे आणि त्यामुळे भटकते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक प्रचारात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल हा शब्दप्रयोग केला होता. तो मोदींच्या चांगलाच अंगलट आला आहे. भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा पवार यांनी मोदींना दिला आहे.

केंद्रात भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता आली, मोदी पंतप्रधान (Narendra Modi) झाले, मात्र त्यांना स्बवळावर बहुमत मिळू शकले नाही. महाराष्ट्राने गेल्यावेळी भाजपला 23 जागा दिल्या होत्या, यावेळी ती संख्या 9 वर आली. गेल्यावेळी म्हणजे 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. यावेळी महायुतीच्या खासदारांची संख्या 17 वर आली.

भाजपला स्पष्ट बहुमत न मिळण्यामागे महाराष्ट्रात बसलेला फटकाही कारणीभूत ठरला. लोकसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक प्रचार केला होता. पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात 18 सभा आणि एक रोडशो झाला होता. यापैकी 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.

भाजपने मागील पाच वर्षांत केलेले पक्ष फोडाफोडीचे राजकारण, विरोधकांवर तपास यंत्रणांचा गैरवापर, काही नेत्यांचा वाचाळपणा लोकांना आवडला नव्हता. भाजपला याची जाणीव होती, मात्र निवडणूक प्रचारात त्याचा परिणाम जाणवला नाही. पहिले पाढे पंचावन्न अशी गत महायुतीची झाली होती.

मोदींच्या प्रचारसभांचा धडाका सुरू होता. पंतप्रधान आपल्या सभांमधून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत होते. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकणे हा उद्देश होता. फोडाफोडीमुळे महाविकास आघाडी कमकुमत झाली आहे, असे समजून महायुतीला एकप्रकारचा कैफ चढला होता. त्यातूनच मोदी यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना अप्रत्यक्षपणे भटकती आत्मा असे म्हटले. त्याचा परिणाम समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापनदिन सोमवारी साजरा झाला. यानिमित्त शरद पवार गटाच्या वतीने अहिल्यानगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, आत्मा हा कायम असतो. ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही. राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतात.

आम्हीही टीका करतो, मात्र नरेंद्र मोदी यांनी टीका करताना मर्यादा पाळली नाही. सत्ता जाण्याच्या अस्वस्थतेतून तारतम्य बाळगले नाही. शिवसेनेने मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढवला. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या त्याच शिवसेनेचा उल्लेख मोदी यांनी नकली शिवसेना असा केला. हे त्यांना शोभते का? असा प्रश्नही शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Sharad Pawar, Narendra Modi
Sudhir Mungantiwar on Sharad Pawar : भटकती आत्मा शांत करण्याचे काम अमित शाहांना माहिती आहे; मुनगंटीवारांचा पवारांवर पलटवार

भटकती आत्मा तुन्हाला सोडणार नाही

शरद पवार यांच्या या इशाऱ्यामागे खूप काही दडलेले आहे. शरद पवार यांची देशभरातील महत्वाच्या राजकीय नेत्यांमध्ये उठबस आहे. भाजपला सत्तेत येण्यासाठी चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत. या दोन्ही नेत्यांशीही शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. गेली दहा वर्षे मोदींनी भाजपला स्पष्ट बहुमत असलेले सरकार चालवले आहे.

मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. अन्य पक्षांच्या पाठिंब्यावरचे सरकार मोदी पहिल्यांदाच चालवत आहेत. गेल्या दहा वर्षांत आणि आधी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात जशी मोकळीत होती, तशी त्यांना आता मिळणार नाही. केंद्र सरकारची ही परिस्थिती पाहता पंतप्रधान मोदींना कायम अस्वस्थ ठेवणे, भीतीच्या छायेखाली ठेवणे हा शरद पवार यांचा हेतू असावा. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी, भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला असावा.

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपली राजकीय हुकूमत सिद्ध केली आहे. पवार संपले, असा प्रचार मुद्दाम सुरू करणाऱ्या भाजपला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मर्यादा सोडून केलेल्या प्रचाराला मतदारांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे भाजपची गणिते बिघडली आहेत. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे.

ती भाजपसाठी सोपी राहणार नाही, याचे संकेत मिळाले आहेत. शरद पवार यांनी माढा मतदारसंघात आखले तसे डावपेच विधानसभा निवडणुकीतही आखले जाऊ शकतात. भटकती आत्मा मोदींनाच नव्हे, तर राज्यातील भाजपलाही स्वस्थ बसू देणार नाही, असे संकेत पवार यांनी दिले आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com