MNS News: नवा भिडू मनसे अन् बोगस मतदार मोहिमेने ठाकरेसेनेत चैतन्य

Mumbai Bogus Voter Shivsena Campaign: 'बोगस सरकारचे बोगस मतदार’ असा एल्गार करत शिवसेना ठाकरे पक्ष स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत मोट बांधली आहे.
Mumbai Bogus Voter Shivsena Campaign news
Mumbai Bogus Voter Shivsena Campaign news
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टीने मुंबई महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे. मनसेसोबत या पक्षाची होत असलेल्या संभाव्य युतीने चांगले यश मिळेल, असा अंदाज आहे. मुंबईत बोगस मतदार मोहीमही सुरू करीत एक आयता व लोकप्रिय कार्यक्रम ठाकरे यांच्या शिवसेनेने हाती घेतला आहे. एका बाजूला महाविकास आघाडीतील कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांनाही प्रसंगी सोबत ठेवत मनसे हा नवा भिडू शिवसेना जोडू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत या घडामोडींनी चैतन्य पसरले आहे.

'बोगस सरकारचे बोगस मतदार’ असा एल्गार करत शिवसेना ठाकरे पक्ष स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत मोट बांधली आहे. विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी मंत्रालयात सलग दोन दिवस जावून निवडणूक मुख्य अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा केली.

पहिल्या दिवशी तर ज्येष्ठ नेते शरद पवारांचा देखील या शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांचा समावेश होता. मतदार याद्यांमधील घोळ सुधारत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी मागणी या विरोधी पक्षाने केली आहे. मात्र या मागण्यांना निवडणूक आयोगाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने अखेरीस १ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर महाविकास आघाडी, मनसे मोर्चा काढणार आला.

राष्ट्रीय पातळीवर मतदार याद्यांमधील घोळाबाबत काँग्रेसने आवाज उठवला आहे. तर राज्यात शिवसेना ठाकरे पक्षाने यामध्ये आघाडी घेतली आहे. काँग्रेस आणि मनसेनेही मतदारयाद्यांवर काम सुरब केले आहे. त्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाने त्यांचे गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांना मतदार यादी वाचावी कशी इथपासून मतदार यादीतील बोगस मतदार कसे शोधायचे याचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वरळी मतदार संघात १९ हजार ३३३ मतांमध्ये गोंधळ असल्याचे नावानिशी दाखवून दिले आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदारयाद्यांमधील चुका, बोगस मतदार अशा अनेक खोट्या व चुकीच्या नोंदी असलेल्या यादीचा सखोल अभ्यासच त्यांनी केला आहे. यापुढच्या काळात मतदारयाद्यांचे वाचन करताना बोगस (डुप्लिकेट) मतदारांची नावे, मयत मतदार, मतदाराचा फोटो, ईपीक नंबर नसलेले मतदार, एकाच पत्त्यावर अनेक मतदार या पाच महत्त्वांच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी केली आहे. गटप्रमुखांपासून बूथवर बसणाऱ्या राजकीय प्रतिनिधींच्या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष केले गेले होते. नव्याने शिवसेना ठाकरे पक्षाने हे सुरू केल्याने त्याचा फायदा शिवसेना ठाकरे पक्षाच्या बांधणीलाही होणार आहे. शिवाय मतदारयाद्यांबाबत कार्यकर्ते सजग राहण्यासही सुरुवात होणार आहे.

Mumbai Bogus Voter Shivsena Campaign news
NCP News: रुपाली ठोंबरेंकडून चाकणकरांना संपवण्याची भाषा! नेमका काय आहे वाद

ठाकरे कुटुंबातील भावबंध कायम राहतील का?

उद्धव ठाकरेंसोबत या काळात राज ठाकरे कायम सोबत असल्याचे दिसून आले. यंदाची दिवाळी ठाकरे कुटुंबासाठी संस्मरणीय ठरली. मनसे शिवाजी पार्क येथे दरवर्षी दीपोत्सव हा कार्यक्रम आयोजित करते. मागील दोन वर्षे अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या दीपोत्सवाचे उद्घाटन केले होते. यंदा मात्र उद्धव ठाकरे यांनी दीपोत्सवाचे उद्धघाटन केले. दोन्ही ठाकरे बंधूंमधील कडवटपणा धिम्यागतीने मात्र सहजपणे कमी होण्यास सुरवात झाली आहे. यंदा या भावंडांनी भाऊबीजही बहिणीच्या घरी एकत्र जाऊन साजरी केली हे विशेष. दोन्ही कुटुंबातील मुलेही यामुळे एकमेकांच्या जवळ आली आहेत. मात्र राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असेल याविषयी या दोघांनीही जाहीरपणे वाच्यता केलेली नाही. राजकीय चर्चा आणि जागावाटप होतील, तेव्हाही नात्यातील हे भावबंध कायम राहतील का यावर शिवसेना ठाकरे आणि मनसेमधील न झालेल्या युतीचे भवितव्य टिकून असेल.

मुंबईसाठी ठाकरेंचा प्लॅन

भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या धोरणांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मनसेला आपल्या बाजूने वळवले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरूद्ध शिवसेना अशी काट्याची टक्कर झाली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाखालील आघाड्यांतही काट्याची टक्कर झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र विजय व पराजय अधिक स्पष्टपणे अधोरिखित होत असतात. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा डाव तूर्तास तरी यशस्वी केला आहे. मात्र त्यापुढे महाविकास आघाडीचे अस्तित्व व प्रत्यक्ष जागावाटपात यांच्यातील पेच कसा सोडवला जातो, यावर शिवसेनेचे यश अवलंबून असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com