
Suresh Dhas Politics : एखाद्या प्रकरणात कुणावर तरी गंभीर आरोप करायचे आणि नंतर त्याचीच गुप्त भेट घ्यायची! समाजाला हे पटत नाही, रुचत नाही. अशा कोणत्याही नेत्याची वाढलेली उंची झपकन खाली येते, त्याच्यावर टीकेची झोड उठते. त्याच्या आरोप करण्याच्या हेतूबाबत शंका घेतली जाते. सध्या असेच एक प्रकरण गाजत आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांत राज्यभरात ज्यांचे नाव झाले, जे घराघरांत पोहोचले, त्या सुरेश धस यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी 'ट्रॅप' केले का, मराठा विरुद्ध ओबीसी वादात त्यांचा 'गेम' झाला का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
राजकीय नेत्यांच्या, विरोधकांच्या भेटी होत असतात. त्यात गहजब करण्यासारखे काहीही नसते. मात्र ज्यांच्यावर एखाद्या प्रकरणात गंभीर आरोप करायचे आणि त्यांचीच भेट घ्यायची, तीही गुप्त, मग संशय तर निर्माण होणारच. मस्साजोगचे (ता. केज., जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक व्हावी, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आष्टीचे (जि. बीड) भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्यभरात रान पेटवले. सत्ताधारी आमदार असूनही त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. या प्रकरणात धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष्य केले.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे मुंडे यांची अडचण झाली. धस रोज एक गंभीर आरोप पुराव्यांसह करू लागले. त्यामुळे धनंजय मुंडे यांची कोंडी झाली. परिणामी, त्यांना बीडचे पालकमंत्रिपद मिळाले नाही. मुंडे बॅकफूटवर गेले आणि केवळ आमदार असलेले सुरेश धस 'हिरो' झाले. सत्ताधारी महायुतीतील मंत्र्याच्या विरोधात धस हे भूमिका घेतात, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता असणारच, यावर लोकांचा विश्वास बसला. असे असतानाही धस यांचे कौतुक सुरूच होते, त्यांची भूमिका सत्याच्या बाजूने आहे, हे लोकांना पटले होते.
या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे सुरेश धस यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. या दोघांची भेट झाली, याची माहिती भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच यांनीच दिली आहे. त्यांच्या निवासस्थानी आम्ही तिघे साडेचार तास एकत्र होतो, असे बावनकुळे म्हणाले आहेत. त्यानंतर या प्रकरणात धस यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे. मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता, तुम्ही गद्दारांच्या यादीत जाऊन बसलात, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आता प्रश्न असा निर्माण होतो की बावनकुळे यांनी धस-मुंडे भेटीची माहिती सार्वजनिक का केली? मराठा आरक्षण आंदोलननामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मराठा समाजात बिघडली होती. फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अशी भावना निर्माण झाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी घेतलेली भूमिका आणि त्याला फडणवीस यांचा असलेला पाठिंबा, यामुळे गेल्या दीड- दोन महिन्यांत चित्र बदलले होते. मराठा समाजात फडणवीस यांची प्रतिमा सुधारू लागली होती.
भाजपमधील लोकांना हे पाहवले नाही आणि त्यातूनच धस-मुंडे भेटीची माहिती समोर आली का? धस हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळे ओबीसी समाजात भाजपची, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा बिघडत होती, असे तर नाही ना? त्यामुळेच जाणूनबुजून धस-मुंडे यांच्या भेटीची माहिती सार्वजिनक करण्यात आली नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. धस यांनी रान पेटवायला सुरुवात केल्यापासून मनोज जरांगे पाटील अडगळीत गेले होते, हेही लक्षात घ्यायला हवे. चंद्रशेखर बावनकुळे आणि धनंजय मुंडे हे दोघेही ओबीसी आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे.
सुरेश धस हे केवळ आमदार आहेत. असे असतानाही संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे ते राज्यभरात पोहोचले. त्यांच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. धस यांच्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बॅकफूटवर जावे लागले होते. पक्षातही त्यांची उंची वाढली होती. धस यांची वाढलेली उंची, लोकप्रियता त्यांच्याच पक्षातील काही लोकांसाठी अडचणीची ठरत होती का? फडणवीस यांच्या परवानगीशिवायच बावनकुळे यांनी धस-मुंडे भेटीची माहिती सार्वजनिक केली असेल का? असेही काही कळीचे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
मराठा-ओबीसी वाद, धस यांनी मोकळीक दिल्याने ओबीसी समाजात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी, वाढती लोकप्रियता आदी कारणांतून आमदार धस यांच्यावर स्वपक्षीयांनी 'ट्रॅप' लावल्याचे दिसत आहे. मराठा समाजात फडणवीस यांची प्रतिमा सुधारत होती, तरीही धस यांना अडचणीत आणण्यात आले, असे गृहित धरले तरी मुळातच धस यांचे नाणे खोटे तर नव्हते ना, अशी शंकाही निर्माण झाली आहे. जरांगे पाटील यांचा प्रभाव कमी करण्यासाठीच धस यांचा व्यवस्थित वापर करण्यात आला, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. धस यांच्यामुळे मस्साजोगवासियांचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.