Thane Municipal Election 2025: ठाण्यात जुन्या खेळपट्टीवरच नवा डाव

Thane Municipal Election 2025: Mahayuti struggles with internal challenges:सत्ताधारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला अनुकूल अशी ही प्रभाग रचना असल्याचे दिसते. त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीच नव्हे तर महायुतीच्या घटक पक्षातही चलबिचल वाढली आहे.
Thane Municipal Election 2025
Thane Municipal Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

एक-तीन करत अखेर २०१७ च्या पॅटर्ननुसार चार सदस्य पॅनेलपद्धतीनेच ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध केला आहे. पूर्वीप्रमाणचे ३३ प्रभाग, चार पॅनेलचे ३२ तर तीन पॅनेलचा एक प्रभाग आणि नगरसेवक संख्याही १४१ ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा म्हणजे जुन्या खेळपट्टीवर नवीन डाव असा ठरणार आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला अनुकूल अशी ही प्रभाग रचना असल्याचे दिसते. त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीच नव्हे तर महायुतीच्या घटक पक्षातही चलबिचल वाढली आहे.

तीन वर्षांपासून प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपणार असून लवकरच निवडणुकीचा बार उडणार आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार ठाणे महापालिकेने चार सदस्य पॅनेलप्रमाणे प्रभाग रचना तयार केली असून त्याचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध केला आहे.

२०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे महापालिकेची निवडणूक आधी एक सदस्य पद्धतीने त्यानंतर त्रि-सदस्य पद्धतीने जाहिर झाली होती. एक सदस्य पद्धतीने निवडणूक झाल्यास ती भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळामध्ये ती त्रि-सदस्य पॅनेल पद्धतीने घेण्याचे ठरले. त्यावेळी प्रभाग रचना करताना एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपल्या सोयीनुसार प्रभाग रचनेत बदल केल्याचा वाद रंगला होता.

त्रि-सदस्य पॅनेलमुळे नगरसेवकांची संख्या १० ते १२ ने वाढणार होती. विशेष म्हणजे वागळे आणि कळवा, मुंब्य्रात नगरसेवक संख्या वाढणार होती. पुढे सत्तांतराप्रमाणे पॅनेलची सदस्य संख्याही बदलत गेली. अखेर महापालिकेची सर्वसाधारण सभा विसर्जित होण्याआधी झालेल्या २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे चार सदस्य पॅनेलवर शिक्कामोर्तब झाले.

Thane Municipal Election 2025
PMC Election 2025: पुण्यात अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चा भाजपशी संघर्ष

ठाणे महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता पालिकेवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. प्रशासकीय कारभार सुरू असतानाही येथे शिवसेना शिंदे गटाची अदृश्य सत्ता कायम आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करताना त्यावर शिवसेना शिंदे गटाची गडद छाप दिसत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

प्रारुप आराखडा तयार करताना २०११ ची १८ लाख इतकी जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे चार सदस्य पॅनेल तयार करताना किमान ४५ ते ५५ हजार लोकसंख्या असलेला एक पॅनेल तयार होणे अपेक्षित होते. पण हे पॅनल तयार करताना नगरसेवकांची संख्या वाढू नये याची खबरदारी घेत अनेक ठिकाणी लोकसंख्या ५५ हजारांच्या पुढे सरकली आहे.

विशेषता घोडबंदर पट्ट्याची लोकसंख्या वाढली असतानाही येथे भाजपचे प्राबल्य वाढल्याने नगरसेवकांची संख्या आहे तितकीच ठेवण्यात आली आहे. तर कळव्यातील पॅनेलची संख्या ही ६० हजारांच्या पार पोहचली आहे. इथेच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना करताना सीमांकनामध्ये किंचित बदल सोडले तर काहीच नवीन नसल्याचे दिसते. अगदी प्रभाग क्रमांकापासून ते पॅनेलपर्यंत सर्वकाही आहे तसेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने गुगल मॅपच्या आधारे तयार केलेली प्रभाग रचना २०१७ ची कॉपी पेस्ट मानली जात आहे.

Thane Municipal Election 2025
Uddhav Thackeray: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई! BMC निवडणूक राज्यातील वातावरणावर मोठा परिणाम करणारी ठरणार

शिंदे गटाची ताकद

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाण्याच्या राजकारणात ठाकरेंचा प्रभाव कमी झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन-तीन अपवाद वगळता सर्वच माजी नगरसेवकांची कुमक आहे. त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. सत्तेसाठी ६६ नगसेवकांचे बळ आवश्यक आहे. गेल्या निवडणुकीत हा जादुई आकडा गाठण्यात शिवसेनेला यश आल्यामुळे एकहाती सत्ता मिळवता आली हाती.

त्याच पद्धतीने एकहाती सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने रणनिती आखली आहे. त्यांच्याकडे ६३ माजी नगरसेवकांची संख्या आहे. याशिवाय मिशन कळवाअंतर्गत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक फोडून आपले बळ आणखी वाढवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवण्याचा आत्मविश्वास शिवसेना शिंदे गटाकडे आहे.

महायुतीच्या घटकपक्षाची डोकेदुखी

केंद्रात आणि राज्यात महायुतीत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे. मुळात महापालिकेत महायुती नकोच अशी भुमिका शिवसेना शिंदे गट आणि भाजपची आहे. ही युती तुटली तर भाजपचे नगरसेवक वाढण्यापलिकडे काही हाती येईल, अशी परिस्थिती सध्यातरी दिसत नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटालाही यात आपले स्थान टिकवणे आव्हानात्मक असणार आहे.

विरोधकांसमोर आव्हान

पक्ष फुटीमुळे आणि पक्षांतरामुळे शिवसेना ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवीन चेहरे शोधावे लागणार आहे. काँग्रेसच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मनसेची साथ लाभली तर मतविभाजनाचा धोका कमी हाईल. पण खाते उघडण्याची कसब विरोधकांना साधावी लागणार आहे. सत्ता, मनी आणि मसल पॉवर पुढे ही धडपड कितपत टिकेल हे मतदारांच्या हाती आहे.

निम्मा प्रभाग महिलांसाठी राखीव

त्रि-सदस्यामध्ये निम्म्या प्रभागांमध्ये दोन महिला तर निम्म्या प्रभागामध्ये एक महिला सदस्य निवडून येणार होत्या. पण चार सदस्य पॅनेलनुसार आता प्रत्येक प्रभागात निम्मे आरक्षण महिलांसाठी असणार आहे.

जुन्या खेळाडूंना संधी

खेळपट्टी जुनी असल्यामुळे सत्ताधाऱ्याकडून जुन्याच खेळाडूंना म्हणजे माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षात काम करून संधीच्या शोधात असलेल्या इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. अशा नाराजांना हेरून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची रणनिती विरोधकांना साधणे सोपे जाणार आहे.

शिवसेना शिंदे गटासाठी अनुकूल रचना

२०१७ साली ठाणे महापालिकेची निवडणूक चार सदस्य पॅनेल पद्धतीने झाली. चार प्रभागांचा एक पॅनेल अशी रचना असल्याने प्रत्येक पॅनेलमध्ये एका मतदाराने चार उमेदवारांना मतदान केले. आपल्या प्रभागातील उमेदवाराचे चिन्ह डोक्यात ठेवून अनेक ठिकाणी मतदारांनी इतर पॅनेलमधील इतर तीन उमेदवारांनाही भरभरून मतदान केले. त्याचा सर्वाधिक लाभ सत्ताधारी शिवसेनेला झाला. २०१४ ला शिवसेना- भाजप युती तुटली होती. एकीकडे राज्यात भाजपचे सरकार तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असे आव्हान असतानाही केवळ पॅनेल पद्धतीमुळे २०१७ साली शिवसेनेला विजयाचा शिखर गाठता आले.

पॅनेल पद्धतीने झालेल्या त्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी शिवसेना - भाजप आमनेसामने होती. त्यातही अत्यंत कमी फरकाने शिवसेना किंवा भाजपचे उमेदवार निवडून आल्याचे दिसले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे, एमआयएम असा सामना पहायला मिळाला. काँग्रेस मात्र फार कमी ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर दिसून आली. विशेष म्हणजे पॅनेल पद्धतीमुळे अपक्ष उमेदवारांचा खूपच हिरमोड झाला. १३१ नगरसेवकांपैकी केवळ दोनच अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यावेळी या ३३ पॅनेलमधून १३१ जागांसाठी एक हजार १३४ उमेदवार रिंगणात उतरले. त्यात १३१ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ६७ जागांवर विजय मिळवला. ३४ नगरसेवकांसह राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. तर २३ नगरसेवक भाजपचे निवडून आले. काँग्रेसचे तीन तर इतर चार निवडून आले.

  • शिवसेनेने सर्वाधिक १२ पॅनेलवर एकहाती वर्चस्व मिळवले. या पॅनेलमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होता.

  • राष्ट्रवादीचे सहा पॅनेल बहुमताने निवडून आले. यामध्ये बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध मनसे, एमआएम अशी लढत होती.

  • भाजपला मात्र केवळ तीनच पॅनेलवर समाधान मानावे लागले. येथेही भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना झाला.

  • दोन पॅनेलमध्ये तीन सदस्य शिवसेनेचे तर एक सदस्य भाजपचा निवडून आला. तर दुसऱ्या दोन पॅनेलमध्ये तीन सदस्य भाजपचे तर एक शिवसेनेचा निवडून आला होता.

  • आधीच्या निवडणुकीचा निकाल पाहता आगामी निवडणूक जुन्याच प्रभाग रचनेनुसार झाल्यास शिवसेना शिंदे गटासाठी अधिक अनुकूल मानली जात आहे.

पॅनेलचा खेळ

  • २००२ - त्रि-सदस्य

  • २००७ - एक सदस्य

  • २०१२ - दोन सदस्य (५० टक्के महिला राखीव)

  • २०१७ - चार सदस्य (५० टक्के महिला राखीव)

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com