
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २२७ प्रभागांची नवी रचना जाहीर झाली असून, ही लढाई सत्ताधारी शिंदे-भाजप महायुती आणि उद्धव ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
शिवसेनेतील फुट, कामगार वर्गावरील पकड ढिली होणे आणि पतपेढी निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गट अडचणीत आहे.
या निवडणुकीचा निकाल मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणार असून, काँग्रेस-राष्ट्रवादीला नव्या संधी मिळू शकतात.
राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत असून, सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेतील घडामोडींकडे लागले आहे. मुंबई महापालिकेत २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, तर दहा वर्षांमध्ये भाजपची ताकदही वाढली आहे. आता शिवसेनेतील फुटीनंतर, उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. आता प्रभागरचनेमध्ये सोयीनुसार बदल केल्याचा आरोप होत असून, त्यामध्येच महापालिका निवडणुकीतील संघर्षाची बीजे रुजली आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरणार आहे. विशेष म्हणजे, नव्या प्रभागरचनेमुळे निवडणुकीचे गणितच बदलले आहे.
कुठे प्रभागांची सीमा बदलली आहे, कुठे मतदारसंख्या हलवली, तर कुठे नवे प्रभाग तयार झाले आहेत. या सर्व बदलामागे राजकीय स्वार्थाचे मोठे गणित दडले आहे. मराठी मतदारांच्या भागांचे तुकडे करणे, अल्पसंख्याकांचा प्रभाव वाढवणे, काही प्रभाग विशिष्ट पक्षांसाठी राखून ठेवणे यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक तब्बल तीन वर्षे रखडलेली होती. महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे व न्यायालयीन वादामुळे हा प्रश्न दीर्घकाळ लांबला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या हालचालींना वेग दिला आहे.
महापालिकेच्या कारभारावर सध्या प्रशासक म्हणून आयुक्त कार्यरत आहेत; पण मुंबईकरांना निवडून आलेल्या प्रतिनिधींची उणीव तीव्रतेने जाणवते आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक नसून, महाराष्ट्रातील राजकीय वातावरणावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे.
मुंबई महापालिकेची प्रभागरचना महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १८८८ व त्यावरील न्यायालयीन आदेशांनुसार केली जाते. प्रभाग निश्चित करताना लोकसंख्या समानता, भौगोलिक सलगता, वॉर्डांची नैसर्गिक सीमा, उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम असा क्रम आदी मुद्दे विचारात घेतले जातात. या चौकटीत राहूनच २२७ प्रभागांचे नवे सीमांकन जाहीर होत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये साधारणतः ४५ ते ६५ हजार लोकसंख्या ठेवण्याचा निकष पाळला आहे.
२०१७मध्ये मुंबईतील प्रभाग संख्या २२७ होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२१मध्ये ती वाढवून २३६ केली. या निर्णयामागे शिवसेनेचा राजकीय फायदा आहे, असा आरोप भाजपने केला होता. नव्याने तयार झालेले प्रभाग मुख्यत्वे शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात होते, असा हा आरोप होता.
मात्र २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि प्रभाग संख्या पुन्हा २२७ करण्यात आली. ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली, पण अखेरीस न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला.
महापालिकेने २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे. नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पालिकेच्या २६ विभागीय कार्यालयांत यासाठी विशेष निवडणूक कक्ष उघडले आहेत. नागरिक जुन्या व नव्या नकाशांचा तुलनात्मक अभ्यास करून आपले मुद्दे नोंदवू शकतात. यामुळे पारदर्शकता व लोकसहभाग या दोन्ही बाबींची जपणूक होणार आहे.
मुंबईत सुरू असलेले सागरी किनारा मार्ग, मेट्रोच्या विविध लाइन्स, अटल सेतूचा विस्तार यांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांचा विचार नवीन रचनेत झाला आहे. काही प्रभागांत लोकसंख्या स्थलांतरित झाल्याने नकाशात किरकोळ बदल झाले आहेत. किनाऱ्यालगतच्या प्रभागांत सागरी किनारा मार्गामुळे भौगोलिक सीमा थोडी बदलली आहे. त्यामुळे मतदारसंख्या संतुलित करण्यासाठी काही वॉर्डांची नव्याने मांडणी करावी लागली.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, या रचनेचा फायदा शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या महायुतीला होत आहे. शिंदे गटाने गेल्या दोन वर्षांत १०३हून अधिक माजी नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत. भाजपकडे संघटनशक्ती, पैसा व सत्ता यंत्रणेचा आधार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना बहुतेक प्रभागांमध्ये आपले समीकरण घट्ट करण्याची संधी मिळणार आहे. याउलट उद्धव ठाकरेंची शिवसेना अडचणीत आली आहे.
२३६ प्रभागांची संख्या वाढली असती, तर काही नव्या प्रभागांत त्यांना पारंपरिक मतदार लाभला असता. पण आता जुन्याच रचनेत त्यांना नव्याने उमेदवार उभे करावे लागतील. अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाकडे गेल्याने संघटनशक्तीही कमकुवत झाली आहे.
त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी हेच त्यांच्यासाठी मोठे अस्त्र ठरणार आहे. काँग्रेसचे मतदार आधार प्रामुख्याने मुस्लिम, दलित व अल्पसंख्याक समाजात आहे. काही प्रभागांत त्यांचा प्रभाव दिसून येतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आपापल्या गडांमध्ये प्रभावी आहेत. त्यामुळे निवडणुकीत हे दोन्ही पक्ष ठाकरे गटाला हातभार लावतील, अशी शक्यता आहे, मात्र ‘महाआघाडी’ किती मजबूत राहते, यावर बरेच काही अवलंबून आहे.आर्थिक समीकरणे महत्त्वाची.
मुंबई महापालिका म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नव्हे, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे हृदय आहे. तब्बल ७५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, हजारो कोटींची विकासकामे, शेकडो कंत्राटे अशी ही गणिते आहेत.
या सर्वांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष झटतो. ठाकरेंच्या शिवसेनेने गेली २५ वर्षे मुंबईवर सत्ता गाजवली. परंतु गेल्या दशकात भाजपने आपली ताकद झपाट्याने वाढवली. शिंदे गट आता महायुतीसोबत राहून या गडावर चढाई करण्याच्या तयारीत आहे. प्रभागरचनेवरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे.
भाजपने ठाकरे सरकारवर ‘पक्षपाती रचना’ केल्याचा आरोप केला होता. आता विरोधक शिंदे-भाजप सरकारवर ‘सत्तेचा फायदा घेऊन आपल्या सोयीनुसार प्रभागरचना केली,’ असे आरोप करत आहेत. मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र हे सण महत्त्वाचे आहेत.
या सणांमध्ये राजकीय पक्ष सक्रियपणे सहभाग घेतात. मंडळांना मदत, उत्सवांमधून जनसंपर्क, प्रभाग पातळीवर थेट लोकांशी संवाद, या पद्धतीने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीचा उत्सवी काळ राजकीय रंगात न्हाऊन निघणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. डिसेंबर २०२५ अखेर किंवा जानेवारी २०२६मध्ये निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. एकसदस्यीय २२७ प्रभागांतून २२७ नगरसेवक निवडले जातील. प्रत्येक प्रभागाचा निकाल मुंबईच्या राजकारणाचे भविष्य ठरवेल. मुंबई महापालिकेतील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर थेट परिणाम करतात.
शिंदे-भाजप महायुतीने बहुमत मिळवले, तर २०२९च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. उलट ठाकरेंच्या शिवसेनेने चांगली कामगिरी केली तर ते पुन्हा महाराष्ट्रात आपले वर्चस्व सिद्ध करू शकतील. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने निर्णायक भूमिका बजावली तर राज्यातील सत्ता समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या राजकीय घडामोडींपेक्षा सामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शाळा आदी प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. नवे नगरसेवक निवडून आल्यावर त्यांचे दैनंदिन प्रश्न सुटतील, अशी मतदारांना आशा आहे. मात्र, इतिहास पाहता राजकीय संघर्षात हे प्रश्न मागे पडतात आणि निवडणूक प्रचार भावनिक मुद्द्यांवरच रंगतो.
बेस्ट आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या पतपेढीत ठाकरे बंधूंचे युती पॅनेल पूर्ण पराभूत झाले. उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले होते, पण मतदारांनी त्यांना नाकारले. याचा अर्थ स्पष्ट आहे की आता मतं केवळ नावावर नाही, तर कामगिरीवर मिळणार. महापालिका निवडणूक ही मुंबईच्या राजकारणातील सर्वांत मोठी लढाई आहे. पतपेढीतील निकाल ही त्या लढाईची रंगीत तालीम ठरत आहे. ‘ठाकरे म्हणजे आपोआप विजय’ हे समीकरण आता सामान्यांच्या मनामध्ये उरलेले नाही.
मुंबईतील कामगार वर्गावर शिवसेनेचे वर्चस्व होते. आज त्याच ‘बेस्ट’मधील कर्मचाऱ्यांनी ठाकरे बंधूंपासून दुरावला आहे. हा निकाल केवळ पतपेढी निवडणुकीतील पराभव नाही, तर महापालिका निवडणुकीतील मराठी मतदारांचे समीकरण बदलण्याचा मोठा इशारा आहे.
उद्धव-राज ठाकरे एकत्र येऊनही पराभव झाला, हा मुद्दा भाजप-शिंदे गट जोरात मांडणार आहेत. त्यांना या निकालाने नवा आत्मविश्वास मिळाला आहे. पालिकेच्या निवडणुकीत ते कामकाज आणि पायाभूत विकासावर भर देऊन प्रचार करणार आहेत.
ठाकरे बंधूंचं समीकरण डळमळल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसलाही पालिकेत शिरकाव करण्याची संधी आहे. त्यांचा पारंपरिक मतदार वर्ग कायम आहेच, त्यावर काही नाराज मराठी मतदारांची भर पडू शकते. आजचा मतदार घोषणांपेक्षा ठोस मुद्द्यांकडे पाहतो.
रोजगार, रस्ते, शाळा, घरे हे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात. पतपेढीच्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला. महापालिकेतही हेच घडले, तर ठाकरे बंधूंसाठी परिस्थिती कठीण होईल. ठाकरे बंधूंनी संघटना मजबूत करून ठोस विकास आराखडा मांडला नाही, तर त्यांचा बालेकिल्ला ढासळणे टळणार नाही.
मुंबई महापालिकेची ही निवडणूक फक्त स्थानिक निवडणूक नसून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी असेल. महायुती सध्या आघाडीवर दिसते आहे, पण ठाकरे यांची शिवसेना अजूनही भावनिक मुद्द्यांवर अवलंबून असल्याचे दिसत आहे. मुंबईच्या गल्लीबोळांतून राजकीय रंगत वाढत चालली आहे. कोणाच्या पथ्यावर प्रभागरचनेचे गणित पडते, हे ठरवेलच; पण त्यासोबतच राज्याच्या सत्तेचा भविष्यातील आराखडाही ठरणार आहे.
प्र.१: मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या किती आहे?
उ. मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
प्र.२: ठाकरे गटासाठी मोठे आव्हान काय आहे?
उ. शिवसेनेतील फुट, संघटनशक्ती कमी होणे आणि पारंपरिक मतदार गमावणे ही त्यांची प्रमुख आव्हाने आहेत.
प्र.३: महायुतीला निवडणुकीत कोणते फायदे आहेत?
उ. शिंदे-भाजप महायुतीकडे संघटनशक्ती, सत्ता यंत्रणा आणि मोठा आर्थिक पाठिंबा आहे.
प्र.४: या निवडणुकीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?
उ. राज्यातील राजकीय समीकरणे आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दिशा ठरवतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.