Third Front Politics : आंबेडकर, शेट्टी, कडू महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार! महायुतीच्या यशाची मदार तिसऱ्या आघाडीवर

Third Front Prakash Ambedkar Raju Shetti Bachchu Kadu : छोटे पक्ष, शेतकरी व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आगामी विधानसभेला राज्यात तिसरी आघाडी करणार असून, यातून राज्यात दबाव गट तयार करणार असल्याचे राजू शेट्टी जाहीर केले आहे.
Prakash Ambedkar Raju Shetti Bachchu Kadu
Prakash Ambedkar Raju Shetti Bachchu Kadu sarkarnama
Published on
Updated on

Third Front Politics : लोकसभेतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, दलित आणि मुस्लिम मतांच्या पाठींब्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळाल्याचे विश्लेषण महायुतीतील नेते करत आहेत. विधानसभेला दलित, मुस्लिम आणि शेतकऱ्यांची मतं महाविकास आघाडीसोबत राहिली तर त्यांना सत्ता सहज मिळेल. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, 'प्रहार'चे प्रमुख बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

छोटे पक्ष, शेतकरी व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आगामी विधानसभेला राज्यात तिसरी आघाडी करणार असून, यातून राज्यात दबाव गट तयार करणार असल्याचे राजू शेट्टी जाहीर केले आहे. राज्यात वंचित, प्रहार, शेतकरी संघटना यांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली, तर त्याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसणार हे निश्चित. त्यामुळे महायुती देखील तिसरी आघाडी स्थापन व्हावी, यासाठी पडद्यामागून प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

शेतकरी संघटनेची भूमिका महत्त्वाची

लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना महाविकास आघाडी MVA आणि महायुतीच्या मतांमध्ये फारसा फरक नसल्याचे दिसून येत आहे. भाजपचे 12 उमेदवार हे 3 टक्क्यांपेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत.

मात्र, ग्रामीण भागात भाजपला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट चित्र आहे. कारण महायुती आणि महाविकास आघाडीत ग्रामीण भागात मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक आहे. त्यामुळे शेतीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या शेतकरी संघटनांना विधानसभा निवडणुकीत महत्त्व प्राप्त होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांना साद घातली आहे.

Prakash Ambedkar Raju Shetti Bachchu Kadu
Devendra Fadnavis : भ्रमाचा भोपळा फुटल्यामुळेच फडणवीसांकडून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

प्रकाश आंबेडकर अ‍ॅक्टीव्ह मोडवर

लोकसभेच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar हे अ‍ॅक्टीव्ह मोडवर आले आहे. दलित समाजात आपली हक्काची मतपेढी त्यांनी गमल्याची आकडेवारी आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सात टक्के मतं होती. ती 2024 च्या निवडणुकीत साडेतीन टक्क्यांवर आली.

त्यामुळे प्रकाश आंबेडकर सातत्याने दलित मतदारांनी भाजपसोबत काँग्रेसपासून देखील सावध राहिले पाहिजे, असा प्रचार करत आहेत. दलितांच्या प्रश्नासाठी वंचितने भूमिका घेतली असल्याचा सूर देखील आंबेडकर लावत आहेत. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीसोबत गेले, तर त्यांच्या पक्षाला बळ मिळेल आणि त्याचा थेट फटका महाविकास आघाडीच्या मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे.

'प्रहार' स्वबळावर?

बच्चू कडू हे महायुतीमध्ये आहेत. मात्र, भाजपशी फटकून वागताना त्यांनी आपली जवळीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत संभाजीराजे छत्रपती यांच्या 'स्वराज' संघटना, आम आदमी पक्ष, रविकांत तुपकर यांची शेतकरी संघटना यांच्यासोबत तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढण्याची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. बच्चू कडू यांची ताकद विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोध प्रहारचा देखील उमेदवार रिंगणात असेल. त्यामुळे मतविभाजणी होत याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष

तिसऱ्या आघाडीसोबतच मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात, यावर मराठा मतदानाचा टक्का अवलंबून आहे. 288 मतदारसंघात उमेदवार उभे करू, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला होता. ते आत्ता आरक्षणसाठी उपोषण करत आहेत. तर जरांगे यांनी मतदानाच्या आखाड्यात उतरावे म्हणून भाजप आमदार परिणय फुके, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आवाहन करत आहेत.

जरांगे यांच्या भूमिकेमुळे भाजपला लोकसभेला मोठा फटका बसल्याचे भाजप नेत्यांचे मत आहे. मराठवाड्यात भाजपची जी पिछेहाट लोकसभा निवडणुकीत झाली, त्याला मनोज जरांगे पाटील हेच कारणीभूत असल्याची भाजप नेतृत्वाची खात्री आहे. त्यामुळे जरांगे यांनी निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरवले तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपला मोकळेपणाने बॅटिंग करता येईल.

छोट्या आघाड्यांना बळ

विधानसभा निवडणुकीत दुरंगी, तिरंगी लढती होणार आहेत. छोट्या आघाड्या, अपक्ष उमेदवार महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. विजयाचे मार्जीन देखील कमी असणार आहे. त्यामुळे विरोधीपक्षातील बंडखोरांना ताकद देण्याची रणनीती आखली जाऊ शकते. भाजप यासाठी जिल्हानिहाय छोट्या आघाड्यांना बळ देण्याची रणनीती आखू शकते. आता राज्यात कोणत्या उलथापालथ होणार, त्यातून कुणाला फटका बसणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Prakash Ambedkar Raju Shetti Bachchu Kadu
Maharashtra BJP : भाजप चक्रव्यूहात; 'धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतयं!' अशी अवस्था

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com