Devendra Fadnavis : भ्रमाचा भोपळा फुटल्यामुळेच फडणवीसांकडून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

Devendra Fadnavis In BJP state conclave : लोकसभेला अपयश मिळाल्यामुळे फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का बसला. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची त्यांनी दाखवलेली तयारी आपली प्रतिमा सुधारण्याचा एक भाग होता. पुण्यातील अधिवेशनात त्यांनी केलेले आक्रमक भाषण, त्याचाच एक भाग होता.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत राजकीय उतारच अधिक पाहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना शह देणारा नेता, अशी स्वतःची ओळख निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यात त्यांना यश मिळाले, असे वाटत असतानाच तो काही काळापुरता निव्वळ भ्रम होता, हे समोर आले.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ( Bjp ) म्हणजे पर्यायाने फडणवीस यांच्या वाट्याला दारूण अपयश आले. राजकारणातील 'चाणक्य' अशी त्यांची प्रतिमा तयार करण्यात आली होती, त्याला मोठा तडा गेला.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) माध्यमांना सामोरे गेले. मला उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे, असे त्यांना सांगावे लागले. अर्थात, ही मागणी मान्य होणार नव्हती. विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांना बाजूला सारेल, याची शक्यता नव्हती, हे त्यांनाही माहीत होते. केवळ 'डॅमेज कंट्रोल'चा भाग म्हणून फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. पुण्याच्या 21 जुलैच्या पक्षाच्या अधिवेशनातही फडणवीस यांनी आक्रमक भाषणाद्वारे आपल्या 'प्रतिमावृद्धी'चा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांकडून टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला.

'विरोधकांनी, म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक खोटे 'नॅरेटिव्ह' पसरवले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे सातत्याने सांगत आहेत. फडणवीस यांनी पुण्यातील अधिवेशनातही त्याचा पुनरुच्चार केला. भाजप सत्तेत आला तर राज्यघटना बदलणार, आरक्षण संपवणार, अशा अफवा विरोधकांनी पसरवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्यघटना बदलायची असेल, तर भाजपला लोकसभेच्या चारशेपेक्षा अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, असे वक्तव्य भाजपच्या नेत्यानेच केले होते, याचा विसर या तिघांनाही पडला आहे. राज्यघटना बदलण्याची भाषा भाजप नेत्याने केली होती, त्याचा दोष शिंदे, फडणवीस, पवारांकडून महाविकास आघाडीला दिला जात आहे.

devendra fadnavis
Amit Shah On Fadnavis : अमित शाह भाकरी फिरवणार, फडणवीसांना बाजूला सारून महाराष्ट्राचे नेतृत्व मराठा नेत्याकडे देणार?

'खोटे 'नॅरेटिव्ह' खोडून काढण्यासाठी आता आदेश विचारू नका, मैदानात उतरा अन् ठोकून काढा,' असा आदेश फडणवीस यांनी अधिवेशनात कार्यकर्त्यांना दिला. यासोबतच 'हिट विकेट होऊ नका, सेल्फ गोल करू नका,' असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कोणत्या दिशेने जाणार, हे यापूर्वी भाजपकडून ठरवले जायचे. 2024 च्या निवडणुकीत मात्र नेमके उलटे चित्र दिसले. भाजपचे बडे नेतेही आपल्या वक्तव्यांनी हिट विकेट झाले. राज्यघटना बदलण्याची भाषा कर्नाटकातील भाजप नेते अनंत हेडगे यांनी केली होती. भाजपसाठी तो सेल्फ गोल ठरला. त्यामुळे फडणवीस यांना हिट विकेट आणि सेल्फ गोलची भीती सतावत आहे, हे स्पष्ट आहे.

गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडी फडणवीस यांच्या चांगल्याच अंगलट आल्या, महाविकास आघाडी स्थापन करून शरद पवार यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेबाहेर बसवले होते. त्याचा सूड घेण्यासाठी म्हणून फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार अगदी सुरुवातीपासून अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. कोविडच्या काळातही त्यांनी राजकारण सुरूच ठेवले होते. दुसरीकडे, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख अशी प्रतिमा निर्माण झाली. फडणवीस यांनी अखेर महाविकास आघाडीचे सरकार पाडल, मात्र त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ही कृती त्यांच्यासाठी हिट विकेट ठरली. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यांची प्रतिमा खराब झाली. पक्ष फोडणारा नेता, भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालणारा नेता, असे त्यांच्याबद्दल बोलले जाऊ लागले.

devendra fadnavis
Solapur Bazar Samiti : लोकसभा निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या अंगी हत्तीचे बळ, भाजपची शिफारस बाजूला ठेवली...

अजितदादा पवार, अशोक चव्हाण यांच्यावर फडणवीस यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तिखट प्रहार केले होते. तेच अजितदादा आज फडणवीस यांच्यासोबत आहेत आणि अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला, तेच नेते आपल्या पक्षात, पक्षासोबत येऊन सत्तेचा मलिदा लाटू लागले आणि आपल्या पदरात काहीही पडले नाही, अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. अजितदादा, अशोक चव्हाण यांना सोबत घेतल्याबद्दल लोक कार्यकर्त्यांना टोमणे मारू लागले, त्यांना जाब विचारू लागले. निष्ठावंत मतदारही भाजपवर नाराज झाले. या सगळ्याचा वचपा लोकसभा निवडणुकीत निघाला. फडणवीसांचा आलेख घसरला. आता करायचे काय, या विवंचनेतूनच उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी करण्यापासून आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरून ठोकून काढा, असे म्हणण्यापर्यंतचा प्रवास फडणवीस यांना करावा लागला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com