Ashok Chavan Resign: पिता-पुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन् तेही दोनदा!

Shankarrao Chavan - Ashok Chavan Political News : इतके सारे मिळूनही काँग्रेस सोडून ते आता भाजपच्या वाटेवर निघाले आहेत.
ashok Chavan, shnakarrao chavan
ashok Chavan, shnakarrao chavan Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan News : वडील आणि मुलगा मुख्यमंत्री होण्याचा योग महाराष्ट्रात आतापर्यंत एकदाच आला आहे, तो शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या रूपाने. शंकरराव चव्हाण केंद्रात गृहमंत्रीही होते. अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री झाले, नंतर मंत्री झाले, लोकसभेवर गेले... इतके सारे मिळूनही काँग्रेस सोडून आता भाजपच्या वाटेवर निघाले आहेत. एखाद्या नेत्याला आणखी काय द्यायला हवे, असा प्रश्न आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेसलाही पडला आहे.

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री बनले. त्यांनी केंद्रात अनेकवेळा महत्वाची खाती सांभाळली. अशोक चव्हाण यांनाही मुख्यमंत्रिपदाची संधी दोनदा मिळाली. ते मंत्री, खासदारही झाले. अत्यंत कठीण प्रसंगी काँग्रेसने विश्वास दाखवत दिग्गजांना डावलून अशोक चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांना मिळाले. आता त्याच अशोक चव्हाणांनी अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. एखाद्या नेत्याला त्याच्या राजकीय कारकीर्दीत आणखी काय हवे असते? राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या समोर अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते कोणता आदर्श ठेवत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ashok Chavan, shnakarrao chavan
Vidarbha Congress Politics : नाना पटोलेंची होमपिच; विदर्भ ठरू शकतो काँग्रेससाठी 'मोहब्बत की दुकान'

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात नाव आल्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. लोकसभेत दोन दिवसांपूर्वीच भाजपने काँग्रेस सरकारांच्या कार्यकाळाबाबत श्वेतपत्रिका मांडली होती. त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. त्यानंतर दोनच दिवसांनी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, हा निव्वळ योगायोग आहे, असे समजणे हा भाबडेपणा ठरेल.

अशोक चव्हाण हे लोकनेते आहेत. 2014 ला मोदी लाट असतानाही ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी त्यांच्या जाण्याने काँग्रेसला (Congress) फटका बसणार आहे. नांदेड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आता महाविकास आघाडीला उमेदवार मिळेल का, अशी परिस्थिती आहे. कदाचित ही जागा महाविकास आघाडीकडून आता वंचित बहुजन आघाडीला सोडली जाण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. नंतर ते राजीव गांधी यांचे विश्वासू म्हणूनही ओळखले जाऊ लागले. शंकरराव चव्हाण एकेकाळी राज्यातील सर्वात शक्तिशाली काँग्रेस नेते होते. त्यांच्या निधनांनंतर त्यांच्यावर टपाल तिकीटही जारी करण्यात आले होते. अशोक चव्हाण यांनी 1987 मध्ये पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदरासंघातून विजय मिळवला. 1992 मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य बनले. 1993 मध्ये राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 2003 मध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले. त्यापूर्वी 1995 ते 1999 पर्यंत ते काँग्रसेचे प्रदेश सरचिटणीस होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ अशोक चव्हाण यांच्या गळ्यात पडली. 2009 मध्ये अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हेही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते, मात्र पक्षश्रेष्ठींना चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली होती. चव्हाण मुख्यमंत्री झाले, मात्र ते खुर्ची जास्त काळ टिकवू शकले नाहीत. आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात त्यांचे नाव आले आणि राजीनामा देण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता.

भाजपने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत या घोटाळ्याचा उल्लेख झाला आणि त्यांच्या काही दिवसांनंतर 12 फेब्रुवारीला चव्हाण यांना काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारमध्येही अशोक चव्हाण यांनी मंत्रिपद भूषवले होते. एखाद्या नेत्याला पक्षाने आणखी किती द्यायचे असते? शिवसेना, राष्ट्रवादीपाठोपाठ आज काँग्रेसलाही हा प्रश्न पडला असेल. सध्या भाजपची चलती आहे. कोणत्याही पक्षाची चलती कायमस्वरूपी राहत नसते. त्यामुळे काही वर्षांनी भाजपलाही हा असा प्रश्न पडला तर नवल वाटू नये.

(Edited By Deepak Kulkarni)

ashok Chavan, shnakarrao chavan
Ashok Chavhan Resignation: नाशिकच्या 'त्या' महाराजांचा सल्ला अशोकरावांनी मानला अन् ..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com