Vidarbha Political News : महाराष्ट्रात प्रांतनिहाय विधानसभेच्या सर्वाधिक जागा विदर्भात आहे. ६२ जागांपैकी कोण किती जिंकू शकतो, या गणितावर राज्यातील सत्तेत कोण बसणार, हे निश्चित होऊ शकते, इतकी ताकद विदर्भाच्या मतदारसंघांत आहे.
विदर्भात २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १५ जागांचा तोटा झाला होता. तसाच त्याचा फायदा काँग्रेसच्या पदरात पडला. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये काँग्रेसच्या तब्बल सहा जागा वाढल्या. २०१४ च्या तुलनेत भाजपबद्दलची नाराजी २०१९ मध्ये अधिक तीव्र झाली होती.
कापूस उत्पादकांकडे दुर्लक्ष, संत्रा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय पाहता ही नाराजी वाढत आहे. शेतकरी आत्महत्येचा विषय कायम जिवंत असून, त्याबाबत असलेली राज्य सरकारची अनास्था आणि विदर्भात सिंचनाबरोबर अनेक क्षेत्रांतील वाढता अनुशेष, बंद पडलेली वैधानिक विकास मंडळे यांचा फटका विद्यमान सरकारला बसण्याची चिन्हे आहेतच.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे २०१९ मध्ये जसा भाजपला फटका बसला तसा तो २०२४ मध्ये निश्चितच बसू शकतो. त्यात भाजपअंतर्गत कुरघोडीचे राजकारण, संख्याबळ असताना टाळलेली मंत्रिपदे, महामंडळावर रखडलेल्या नियुक्त्या यामुळे पक्षांतर्गत रोष काही कमी झालेला नाही.
मतदारांच्या मनात जसा राग आणि रोष आहे तसाच तो पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. ही परिस्थिती पाहता काँग्रेसला सुगीचे दिवस येऊ शकतात.
काँग्रेसला काँग्रेसच पराभूत करते, असे म्हणणार्यांना यंदा लोकसभा आणि विधानसभेत नाना पटोले यांचा जलवा दिसण्याची शक्यता आहे. दोन तुकडे झालेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसचे विदर्भात अधिक वर्चस्व आहे.
त्यामुळे विदर्भात काँग्रेसची "मोहब्बत की दुकान" चालेल, असा विश्वास राजकीय विश्लेषकांना आहे. इतकेच नाही तर विदर्भात काँग्रेसने आघाडी घेतली तर राज्यातील इतर ठिकाणी काँग्रेसची हवा निर्माण करण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मोठे यश मिळेल.
पण, पुन्हा काँग्रेस काँग्रेसला पराभूत करेल हे समीकरण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, कोकणात समोर यायला नको, यासाठी थेट पक्षश्रेष्ठींना पुढाकार घ्यावा लागेल. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे यांचा नानाभाऊंना आशीर्वाद आहे.
त्याच आधारावर नानाभाऊ हे महाराष्ट्रात जादू दाखवण्यास तयार झाले आहेत. केंद्रातील ईडीची कोणतीही कारवाई होईल, इतके नानाभाऊ आर्थिकदृष्ट्या सक्षम (फिट केस) नसल्याने त्यांचे भाजपवर सुरू असलेले "राजकीय वार" पुढील काळात अधिक तीव्र होतील, हे मात्र नक्की.
२०१९ मध्ये २४ टक्के मते मिळवत काँग्रेसने ६२ पैकी १५ जागा जिंकल्या. २४ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला बुलडाणा जिल्ह्यात अधिक लक्ष घालावे लागेल. या ठिकाणी पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत.
त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्याची गरज आहे. यवतमाळ आणि बुलडाण्यात प्रत्येकी सातपैकी एक जागेवर काँग्रेस आहे. अमरावतीत आठपैकी तीन आमदार काँग्रेसचे आहेत. अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर या दिग्गज नेत्या विजयी झालेल्या आहेत.
वर्धेत चारपैकी एक ठिकाणी, नागपूर येथे १२ पैकी चार ठिकाणी काँग्रेस आहे. उत्तर नागपूर येथून नितीन राऊत, नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे यांचा विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयी होणे हेदेखील महत्त्वाचा संदेश देते.
भंडाऱ्यातील साकोली मतदारसंघात खुद्द नाना पटोले विजयी झाले आहेत. जिल्ह्यातील इतर दोन मतदारसंघ मात्र काँग्रेसच्या ताब्यात नाहीत. पाच विधानसभा मतदारसंघ असलेल्या अकोल्यात काँग्रेसचा म्हणावा तसा जोर नाही.
चंद्रपूर येथे ६ पैकी ३ जागांवर काँग्रेस आहे. वरोराच्या प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळते, की विधानसभेवर त्या कायम राहतात हे निश्चित नाही. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा उदय करावा लागेल.
नाना पटोले यांना विदर्भात ओबीसी नेता आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय विजय वडेट्टीवार यांना सोबत घेत निर्णय घ्यावे लागतील. त्याच बरोबर बुलडाणा, चंद्रपूर आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल.
काँग्रेससाठी विदर्भ हा कायम अनुकूल राहिला आहै. विदर्भातून प्रभा राव, माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम नेतृत्व दाखविण्याची संधी नाना पटोले यांच्याकडे चालून आली आहे.
केवळ संधीचे सोने आणि मतदारसंघनिहाय योग्य उमेदवाराची निवड हेच विजयाचे गणित निश्चित करेल. त्यासाठी नानाभाऊंना वंचित बहुजन आघाडीला टाळी द्यावी लागेल आणि लोकसभेला जास्त जागा जिंकल्यास विधानसभेचे गणित अवघड जाणार नाही.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.