Tamil actor Vijay
Tamil actor VijaySarkarnama

TVK Chief Vijay: अभिनेते विजय इतिहास घडवतील का? आव्हानात्मक लढाई

TVK Chief Actor Politician Vijay : अभिनेता विजय अजूनही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे आणि त्याचा शेवटचा चित्रपट ‘जननायगन’ (डेमोक्रॅट) प्रदर्शित झाल्यानंतर आपली यशस्वी चित्रपट कारकीर्द संपवण्याचा त्याचा मानस आहे. त्यामुळे त्याच्यासमोर कठीण आणि आव्हानात्मक अशी लढाई असणार आहे.
Published on

तमिळनाडूच्या राजकारणात १९६७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई आणि १९७७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी जो इतिहास घडविला त्याप्रमाणे अभिनेते विजय यांना घडविता येईल का? हे आव्हान सध्या नेते झालेल्या अभिनेते विजय यांच्यासमोर आहे.

कारण २०२६ मध्ये तमिळनाडू निवडणुकीसाठी ते तयारी करत आहेत. याच महिन्याच्या उत्तरार्धात कोइमतूर येथे पक्षाच्या तिसऱ्या प्रदेश अधिवेशनाला ते संबोधित करणार आहेत. या विषयाचा ऊहापोह करताना या द्रविड दिग्गज नेत्यांचा इतिहास आपल्याला पाहावा लागेल.

विजय यांच्या ‘तमिळगा व्हेत्री कळघम’च्या (टीव्हीके) मदुराईत अलीकडे झालेल्या दुसऱ्या प्रदेश अधिवेशनात सी. एन. अण्णादुराई (ज्यांना प्रेमाने ‘अण्णा’ म्हटलं जातं) आणि एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांचे ‘कटआउट’ ठळकपणे झळकले. त्याद्वारे कार्यकर्त्यांना हा स्पष्ट संदेश देण्यात आला, की २०२६ मध्ये पुन्हा इतिहास घडणार आहे.

या अधिवेशनाचे घोषवाक्य होते, ‘विजयी इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे; तमिळनाडू ‘विजय’ अवतरणार’. या घोषणेतून कार्यकर्त्यांना असा संदेश देण्यात आला की, विजयदेखील अण्णा आणि ‘एमजीआर’प्रमाणे २०२६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये इतिहास रचेल आणि सरकार स्थापन करून द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) युगाचा अंत घडवून आणेल. कारण या पक्षातील कार्यकर्ते आणि विजयच्या समर्थकांचा ठाम विश्वास असा आहे, की जसे अण्णा आणि ‘एमजीआर’ यांनी काँग्रेस युगाचा शेवट केला, तसेच विजय द्रमुक युगाचा अखेर करेल.

मात्र, अभिनेता विजय अजूनही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे आणि त्याचा शेवटचा चित्रपट ‘जननायगन’ (डेमोक्रॅट) प्रदर्शित झाल्यानंतर आपली यशस्वी चित्रपट कारकीर्द संपवण्याचा त्याचा मानस आहे. त्यामुळे त्याच्यासमोर कठीण आणि आव्हानात्मक अशी लढाई असणार आहे. अण्णा आणि ‘एमजीआर’ यांनी विचारसरणीच्या प्रसारासाठी आणि जनतेशी बांधिलकी दृढ करण्यासाठी अनेक वर्षे अथक परिश्रम घेतले. त्यांनी राज्यातील प्रत्येक गावामध्ये भेट दिली, असंख्य सार्वजनिक सभांमध्ये भाषणे केली आणि त्यानंतरच त्यांना यशाचा गोडवा चाखता आला.

अण्णांनी घडविलेला इतिहास

अण्णा आपल्या अप्रतिम वक्तृत्व कौशल्यामुळे ओळखले जात होते, तसेच ते एक प्रख्यात लेखकही होते. १९३४ मध्ये त्यांनी चेन्नईतील पचयप्पा महाविद्यालयातून पदवी संपादन केली आणि त्याच महाविद्यालयातून अर्थशास्त्र व राजकारण या विषयांत एमए पूर्ण केले. काही काळ ते शिक्षक म्हणून कार्यरत राहिले; पण नंतर नोकरी सोडून पत्रकारितेकडे वळले. काही साप्ताहिक, मासिकांचे संपादक म्हणून काम केल्यानंतर अखेरीस त्यांनी राजकारणात उडी घेतली. १९३५ मध्ये ‘अण्णा जस्टिस पार्टी’मध्ये सामील झाले.

ही पक्षरचना मुख्यतः शिक्षण आणि अन्य क्षेत्रांवरील ब्राह्मण वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी काही ब्राह्मणेतर नेत्यांनी केली होती. नंतर हा गट राजकीय पक्षात परिवर्तित झाला आणि त्याला ‘साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन’ (एसआयएलएफ) असे अधिकृत नाव देण्यात आले तरीही हा पक्ष ‘जस्टिस पार्टी’ या नावानेच प्रसिद्ध झाला. ब्रिटिशकालीन भारतात १९२० मध्ये स्वशासनाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तत्कालीन मद्रास प्रांतात या ‘जस्टिस पार्टी’चा सत्ताकाळ सुरू झाला. मात्र, १९३७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांचा पराभव केला आणि त्यांची सत्ता संपुष्टात आली.

Tamil actor Vijay
शेतकऱ्याचा मुलगा कसा बनला फास्टॅगचा जनक; अशिम पाटील यांची सक्सेस स्टोरी

‘द्रमुक’ची स्थापना

अण्णा जेव्हा ‘जस्टिस पार्टी’मध्ये सामील झाले, तेव्हा तिचे अध्यक्ष होते बुद्धिवादी अन् तर्कनिष्ठ नेते ‘थंथई पेरियार’. १९४४ मध्ये पेरियारांनी ‘जस्टिस पार्टी’चे नाव बदलून ‘द्रविड कळघम’ (डीके) असे ठेवले आणि निवडणुकीच्या राजकारणातून पूर्णपणे माघार घेतली. अण्णा पेरियारांच्या निकट सहवासात होते. त्यांनी तमिळनाडूमध्ये व्यापक दौरे केले, तर्कवादी विचारसरणीचा प्रसार केला आणि जनतेमध्ये सामाजिक सुधारणा राबवल्या.

राजकारणाबाबत पेरियारांशी अण्णांचे मतभेद होते. त्यांचा निवडणूक अन् राजकारणावर ठाम विश्वास होता. त्यांचे ठाम मत असे होते, की खरी जनसेवा ही निवडणूक प्रक्रियेतून आणि सत्तेत सहभागी होऊनच करता येईल. पेरियारांशी मतभेद झाल्यानंतर अण्णा आपले सहकारी ई. व्ही. के. संपत (पेरियारांचे पुतणे) यांच्यासह अन्य सहकाऱ्यांसमवेत ‘द्रविड कळघम’मधून (डीके) बाहेर पडले आणि १९४९ मध्ये त्यांनी ‘द्रविड मुनेत्र कळघम’ची (द्रमुक) स्थापना केली.

अण्णांनी आपला पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांचे एक मोठे बलस्थान होते. ही जमेची बाजू म्हणजे त्यांच्याबत किमान अर्धा डझन दिग्गज नेते होते. त्यात संपत, नेदुंचेझीयन, मथियाझगन आणि करुणानिधी यांचा समावेश होता. हे सर्वजण अण्णांच्या वक्तृत्व आणि लेखनकौशल्याला तोडीस तोड होते.

Tamil actor Vijay
Prakash Ambedkar: मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच आंबेडकरांनी डिवचलं; म्हणाले, 'मौत का सौदागर'

आता विजयच्या ‘टीव्हीके’पेक्षा अण्णांचा द्रमुक हा ‘वन-मॅन आर्मी’ नव्हता. अण्णांनी पक्ष पायाभूत पातळीवर मजबूत केला. त्यानंतर प्रथमच १९५७ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला अन् निवडणूक लढवली. त्या वेळी द्रमुकला फक्त १५ जागा मिळाल्या. मात्र, १९६२ च्या निवडणुकीत हा आकडा वाढून ५० वर पोहोचला. १९६७ च्या निवडणुकीसाठी पक्षाने सज्जता केली तेव्हा अण्णा आणि त्यांचे सहकारी ठामपणे आपला ठसा उमटवण्यास उत्सुक होते, तरी सत्तेवर ताबा मिळवता येईल याची खात्री त्यांना नव्हती. पण त्या काळातील परिस्थिती द्रमुकसाठी अनुकूल ठरली आणि काँग्रेसविरुद्ध तीव्र राजकीय हल्ला चढवण्याची संधी मिळाली.

काँग्रेस हा पक्ष १९३७ पासून राज्यावर सलग सत्तेत होता. १९६७ च्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस अनेक समस्यांनी वेढलेली होती आणि तीव्र सत्ताविरोधी लाटेला सामोरी जात होती. विशेषतः १९६३ मध्ये के. कामराज यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’चे अध्यक्षपद स्वीकारले आणि एम. भक्तवत्सलम मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ही अस्थिरता वाढली होती.

द्रमुकचे घवघवीत यश

‘हिंदी लादणे’, तमिळनाडूतील जनतेच्या मुख्य अन्न असलेल्या तांदळाचा तीव्र तुटवडा आणि आवश्यक वस्तूंच्या आकाशाला भिडलेल्या किमती, हे काही प्रमुख मुद्दे होते. हे मुद्दे या निवडणुकीवर प्रभावी ठरले. द्रमुकने या सर्वांचा कुशलतेने राजकीय फायदा करून घेतला. पक्षाने एका बाजूला हिंदीविरोधी आंदोलनांची मालिकाच उभी केली आणि दुसऱ्या बाजूला भाताच्या तुटवड्यासाठी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली.

द्रमुकला या पार्श्वभूमीवर स्पष्ट आघाडी मिळाल्यासारखी वाटत होती. तरीसुद्धा अण्णा जोखीम घ्यायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी महायुती घडवली. अनपेक्षितपणे पेरियारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. राजाजी यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र पक्षाला घेऊन ते द्रमुक युतीत सामील झाले. अण्णांनी या आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, तमिळनाडू टॉइलर्स पार्टी, भारतीय प्रजासत्ताक पक्ष आणि आययूएमएळ यांनाही सामील करून घेतले. याशिवाय ‘दिना थंथी’ या लोकप्रिय तमीळ दैनिकाचे मालक व माध्यमसम्राट शिवांती आदित्यन यांनीही द्रमुक आघाडीत प्रवेश केला आणि पक्षाला आवश्यक असलेला प्रबळ माध्यमांचा पाठिंबा दिला.

तांदळाच्या तुटवड्याचा प्रश्न आणि द्रमुकच्या युतीची ताकद या पलीकडे, द्रमुकचे सर्वांत मोठे बलस्थान बनले ते ‘एमजीआर’. निवडणुकांच्या आधी, ‘एमजीआर’ यांच्यावर त्यांच्या चित्रपटातील प्रतिस्पर्धी एम. आर. राधा यांनी गोळीबार केला आणि त्यांच्या मानेवर गोळी लागली, पण ‘एमजीआर’ मृत्यूच्या दारातून परत आले. ‘एमजीआर’ पक्षाला आर्थिक मदत करू इच्छित होते, पण अण्णांनी चलाखीने ‘एमजीआर’ यांच्या मानेवर पट्टी बांधलेला, खाटेवर बसलेला त्यांचे रुग्णालयातील छायाचित्र निवडणूक प्रचारासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी टोपी आणि काळे चष्मे घालणारे ‘मॅटिनी आयडॉल’ म्हणून ‘एमजीआर’ यांना पाहिलेल्या तमिळनाडूतील जनतेने पट्टी बांधलेल्या मानेसह आयुष्याशी झगडणारे ‘एमजीआर’ पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. द्रमुकने हे फलक संपूर्ण राज्यात लावले आणि जनतेची सहानुभूती तसेच पाठिंबा मिळवला.

Tamil actor Vijay
Maratha Reservation: दोन खासदार वगळता काँग्रेस नेत्यांनी मराठा आंदोलनाकडे फिरवली पाठ!

मतदानाआधीच हे स्पष्ट झाले होते की काँग्रेस बचावात्मक भूमिकेत आहे. फेब्रुवारी १९६७ मध्ये निकाल लागल्यावर द्रमुकच्या आनंदाला पारावार उरला नाही. २३४ सदस्यीय विधानसभेत द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने १७९ जागा जिंकल्या. द्रमुकने एकट्याने १३७ जागा मिळवून सरकार स्थापन केले. त्या वर्षी द्रमुक सत्तेत आल्याने काँग्रेसच्या युगाचा अंत झाला आणि राष्ट्रीय पक्ष पुन्हा तिथे सत्तेत परत येऊ शकलेला नाही. हा होता १९६७ मध्ये अण्णांनी सत्ता मिळविल्याचा इतिहास. या इतिहासाचा धडा विजय यांनी घ्यायला हवा.

‘एमजीआर’कडून इतिहास

विजयसारखेच मरुथूर गोपाळन रामचंद्रन (एमजीआर) हेही तमिळनाडूतील ‘ब्लॉकबस्टर’ आणि ‘बॉक्स-ऑफिस हिट’ देणारे ‘सुपरस्टार’ होते. एम.जी.आर. तमिळ चित्रपटसृष्टीत व्यग्र असतानाच त्यांनी चित्रपटाला रामराम करून राजकारणावर लक्ष केंद्रित केले. उपजीविकेसाठी मार्ग मिळावा म्हणून मोठ्या भावासह एका नाटक कंपनीत काम करताना, ‘एमजीआर’ यांनी १९३६ मध्ये तमिळ चित्रपटांत सहायक भूमिकेद्वारे पदार्पण केले.

१९४० च्या दशकात त्यांनी नायकाच्या भूमिका मिळवायला सुरुवात केली आणि लवकरच ते तमिळ चित्रपटसृष्टीतील तीन सर्वात मोठ्या नावांपैकी एक ठरले. उर्वरित दोन होते शिवाजी गणेशन (गंभीर नाट्यमय भूमिकांसाठी प्रसिद्ध) आणि जेमिनी गणेशन (‘रोमँटिक’ भूमिकांसाठी लोकप्रिय). मात्र,‘एमजीआर’ यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली अन् ते ‘ॲक्शन हिरो’ झाले अन् त्यांनी सर्वसामान्य आबालवृद्धांची मने जिंकली. अण्णांनी द्रमुकची स्थापना केली तेव्हा ‘एमजीआर’ प्रारंभी काँग्रेसमध्ये होते, परंतु त्यांनी ‘द्रमुक’मध्ये प्रवेश केला आणि पक्षात हळूहळू ते वरच्या पायऱ्या गाठत राहिले. त्यांचे मोठे ‘फॅन क्लब’ होते आणि द्रमुकमध्ये असतानाच त्यांनी मजबूत राजकीय पाया उभारला.

अण्णांचे १९६९ मध्ये निधन झाल्यानंतर ‘एमजीआर’ यांनी करुणानिधी यांना मुख्यमंत्री बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु लवकरच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. १९७२ मध्ये पक्षातून हकालपट्टी झाल्यावर ‘एमजीआर’ यांनी त्याच वर्षी अण्णा द्रमुकची स्थापना केली. त्यांच्या ‘फॅन क्लब’चे सदस्य लवकरच या नव्या पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि ‘एमजीआर’ यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com