धक्कादायक : एकाच तरुणीला दोन मिनिटात कोरोना लशीचे दोन डोस

देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट सुरू असली तरी सरकारने लसीकरणावरील भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत.
two covid vaccine doses given to woman at same time in madhya pradesh
two covid vaccine doses given to woman at same time in madhya pradesh
Published on: 
Updated on: 

विदिशा : देशातील कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत घट सुरू असली तरी सरकारने लसीकरणावरील (Covid Vaccination) भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. मध्य प्रदेशात एकाच तरुणीला दोन मिनिटांच्या अंतराने कोरोना लशीचे दोन्ही डोस (Covid vaccine doses) देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. 

मध्य प्रदेशातील विदिशा येथील गंज बसोदा भागातील एक तरुणी कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेली होती. तिथे लसीकरण केंद्रावरील महिला आरोग्य कर्मचाऱ्याने तिला लशीचा पहिला डोस दिला. त्यावेळी आरोग्य कर्मचारी दुसऱ्या व्यक्तीशी बोलण्यात गुंतली होती. त्यानंतर बोलताबोलता आरोग्य कर्मचाऱ्याने त्या तरुणीला दुसराही डोस दिला. ती तरुणी दुसरा डोस देत असताना ओरडू लागली होती. परंतु, आरोग्य कर्मचाऱ्याच्या लक्षात संपूर्ण प्रकार येईपर्यंत तरुणीला दुसरा डोस देण्यात आला होता. 

यानंतर त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या गोंधळाची माहिती जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांपर्यंत पोचली. ते तातडीने त्या तरुणीच्या घरी गेले आणि तिच्या प्रकृतीची तपासणी केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन आरोग्य विभागाने दिले आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कोरोना लशीचे दोन्ही डोस एकाच वेळी घेतल्यामुळे त्या तरुणीला अद्याप तरी कोणतेही दुष्परिणाम जाणवलेले नाहीत. 

मागील 24 तासांत भारतात कोरोनाचे 46 हजार 148 रुग्ण सापडले असून, 979 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 3 कोटी 2 लाख 79 हजार 331 वर पोचली आहे. याचबरोबर एकूण कोरोना मृत्यू 3.96 लाखांवर गेले आहेत. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्या कमी होत आहे. देशातील एकूण 5.6 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

Edited by Sanjay Jadhav 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com