Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरेंपुढे खासदारांची फूट रोखणे, महापालिका निवडणुकांचे आव्हान

Uddhav Thackeray Faces Challenge : संसदेमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हक्काची जागा मिळाली आहे. तब्बल वर्षभरानंतर संसदेत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांना हक्काचे कार्यालय मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

दीपा कदम

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी मागच्या आठवड्यात काही सुखद धक्के देणारे, तसेच ते धाकधुकीचेही होते. ठाकरे गटाच्या मागच्या आठवड्यात दोन पत्रकार परिषदाही दिल्लीत झाल्या. त्यापैकी एक काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह झाली, त्यावेळी संजय राऊत उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुखावणाऱ्या दोन घटना म्हणजे दिल्लीत संसदेमध्ये त्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून कार्यालय मिळाले आहे. दुसरे असे की, कोविड काळात कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपाखाली गेली १३ महिने तुरुंगात असलेले युवा सेनेचे नेते सूरज चव्हाण यांना जामीन मिळाला आहे. सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंचे खंदे समर्थक मानले जातात.

जुन्या संसदेत कार्यालय शिवसेना शिंदे गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्य-बाण हे चिन्ह शिवसेना ठाकरे गटाला नाकारण्यात आले होते. तसेच संसदेतील पक्ष कार्यालयाला ठाकरे गटाला मुकावे लागले होते. जुन्या संसद भवनात पक्षाचे माजी आणि विद्यमान खासदार एकत्र भेटू शकत होते. खासदारांना ती हक्काची जागा होती. नवीन संसद भवनात मध्यवर्ती सभागृहातही व्यवस्था नव्हती. शिवसेना ठाकरे गटाच्या ११ खासदारांना एकत्रित भेटण्यासाठी किंवा बैठकीसाठी कोणतीही सोय सत्ताधाऱ्यांनी ठेवली नव्हती. खासदारांना एकत्र भेटायचे झाल्यास थेट खासदार संजय राऊतांच्याच निवासस्थानी जावे लागत होते. ‘शिवसेना शिंदे गट हीच खरी शिवसेना’ असा दावा भाजपकडून केला जातो.

आणि त्याच ‘नॅरेटिव्ह’च्या आधारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचारही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत नामुष्की पत्करल्यानंतरही ठाकरे गटाची विरोधाची धार कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला जुन्या संसद भवनात कार्यालय मिळाले आहे, ज्या ठिकाणी इतर सर्व पक्षांची कार्यालये आहेत. संसदेमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हक्काची जागा मिळाली आहे. तब्बल वर्षभरानंतर संसदेत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांना हक्काचे कार्यालय मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.

Uddhav Thackeray
Operation Tiger : विदर्भात 'ऑपरेशन टायगर', एकनाथ शिंदे नागपूरात दाखल; मोठा नेता लागला गळाला

खासदार फुटण्याची भीती

या कार्यालयाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे सर्व खासदार एकत्र आल्यानंतरही ‘शिवसेनेचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात’ अशा बातम्या येतच राहिल्या. त्यातच दोनच दिवसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने शिंदे गटाकडून मोठा धमाका केला जाण्याची धास्तीही होती. त्यामुळे ‘दुधाने तोंड पोळल्याने ताकही फुंकण्या’ची वेळ ठाकरे गटावर आली. खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाईंच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेत लोकसभेतील नऊपैकी आठ खासदारांच्या उपस्थितीत ‘हम ठाकरे के साथ साथ है’ अशी सांगण्याची वेळ आली.

उपस्थितीत नसलेल्या खासदारांपैकी खासदार संजय दिना पाटील हे त्याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यामुळे संजय दिना पाटील उपस्थित नसल्याचा खुलासा अरविंद सावंत यांनी जरी केला असला तरी ते अलीकडच्या काळात ठाकरे गटाच्या सार्वजनिक कार्यक्रमांना टाळत असल्याची चर्चा आहे. खासदार पाटील यांच्याकडून पत्रकारांना येणाऱ्या ‘प्रेसनोट’मध्ये आवर्जून ‘ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे’ खासदार असा उल्लेख असतो. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार असा उल्लेख ते टाळत असल्याचे लपून राहिलेले नाही.

‘महापालिका’ परीक्षाच!

राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी प्रयागराजला गेल्याने अनुपस्थित होत्या. त्यामुळे अगदी ठरवूनही विविध कारणांमुळे शिवसेना ठाकरे गटाचे ११ खासदार काही एका व्यासपीठावर येऊ शकले नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अलीकडे मात्र मुंबईतल्या गल्लीबोळातही उपस्थित राहू लागले आहेत याची नोंद घ्यावी लागेल. पक्षाला पुन्हा जीवदान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनाच आगामी काळात पायपीट करावी लागणार आहे हे त्यांनी ओळखले आहे. मुलुंड येथे नुकतेच शिक्षक सेनेचे संमेलन पार पडले. या संमेलनास उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हलकेफुलके भाषण केले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यात शिक्षकाने काय किमया केली, तो किस्सा सांगितला.

तो असा, मी दहावीच्या वर्गात शिकत होतो. तेव्हा ही वर्गात चाचणी परीक्षा होत असत. तसा बीजगणिताची चाचणी झाली होती. दुसऱ्या दिवशी मास्तर उत्तरपत्रिका तपासून वर्गात आले. वर्गात आल्याबरोबरच त्यांनी विचारले ‘ठाकरे कोण आहे?’ मी त्यांच्यासमोर जाऊन त्यांच्या टेबलवरचा माझा पेपर पाहिला, तो माझाच होता. १५० गुणांपैकी मला केवळ ११ गुण मिळाले होते. त्यानंतर घरच्यांनी दिवाळीपासून मला फक्त गणितासाठी चितळे मास्तरांची शिकवणी लावली. त्यांनी माझं गणित असं काही पक्कं करून घेतले की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मला १५० पैकी ११ च होते पण त्यापुढे अजून १ लागला होता, मला १११ गुण मिळाले होते...’ ठाकरेंची आताही परिस्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. ११ खासदार आणि २० आमदारच ठाकरेंसोबत आहे. बोर्डाच्या परीक्षेप्रमाणेच महापालिका निवडणुकीचा अभ्यास ठाकरेंना यापुढच्या काळात दिवस-रात्र एक करून करावा लागेल.

Uddhav Thackeray
Raj Thackeray Breaking : मोठी बातमी! राज ठाकरे धमाका करणार ? मनसैनिकांना येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर बोलावलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com