

MP Split : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार हे दिल्लीत दाखल झाल्याचे बातमी समोर आली आहे. हे खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. त्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत समाविष्ट होणार आहेत, असे सांगितले जात आहे. भाजपकडे केंद्रात स्पष्ट बहुमत असताना टीएमसीनंतर ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फोडण्या मागची रणनीती काय आहे? हे समजून घेऊया.
2022 मधील पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे हे लोकसभेला पुन्हा उभे राहिले. त्यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व केले. त्यांचे 9 खासदार विजयी झाले तर महाविकास आघाडीचे तब्बल 31 खासदार विजयी झाले. विधानसभेला महाविकास आघाडीतील समन्वय कमी झाला आणि लाडकी बहीणमुळे त्यांना फटका बसला. मात्र, लोकसभेत उद्धव ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली होती.
या परिस्थितीमध्ये 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे पुन्हा कमबॅक करतील, हा धोका एकनाथ शिंदे आणि भाजपने ओळखला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडे उरलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे लोकसभेतील खासदारांना फोडून त्यांना कमकूवत करण्याची रणनीती दिसून येत आहे.
उद्धव ठाकरेंचे खासदार हे मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातून विजयी झाले आहेत. त्यामुळे या भागात पक्षाची संघटनात्मक ताकद कायम आहे. ही संघटनात्मक ताकद संपवायची असेल तर येथील खासदार फोडणे हे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या फायद्याचे ठरणार आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे येथील खासदार देखील खासदारांना आपल्या भविष्याची चिंता होती. त्यामुळे या खासदारांना सुरक्षित भविष्यासह चांगला निधी देण्याचे आश्वासन देत त्यांना फोडून ठाकरेंचे संघटनात्मक ताकद कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभेत एप्रिल महिन्यात महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन बील) आणले होते. मात्र, या बीलांसाठी थेट घटनादुरुस्ती करावी लागणार असल्याची दोन तृतीयांश मताची आवश्यकता होती. ती मतं एनडीएला मिळू शकली नाहीत आणि ही बीलं फेटाळली गेली. त्यामुळे एनडीएचे संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपने टाकलेला हा डाव आहे.
टीएमसीचे 20 खासदारांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंचे सहा ते सात खासदारांची ताकद एनडीएला मिळाली तर ते दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ जात आहेत. या खासदारांच्या मदतीने लोकसभेतील ताकद वाढणार आहे. त्यामुळे काही महत्त्वाची विधेयके, परिसीमन, महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसारख्या विषयांवर सरकारला अधिक संख्याबळ मिळू शकते.
खासदारांना फोडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हे एकनाथ शिंदेंचा मुख्य उद्देश दिसून येत आहे. 2022 मधील फूटीनंतर देखील ठाकरे ब्रँड कायम आहे. मुंबई महापालिकेत ठाकरेंना सत्ता मिळाली नसली तरी त्यांचे अस्तित्व दिसून आले आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदेंची शिवेसना हीच मूळ शिवसेना आहे हा दावा आणखी मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या खासदारांना पुन्हा फोडण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
2029 च्या निवडणुकीसाठी आता अडीच वर्षांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. मात्र, भाजपने आत्तापासूनच लोकसभेच्या तयारी सुरू केली आहे. भाजपला फक्त आपले बहुमत नको आहे तर एकहाती वर्चस्व हवे आहे. या वर्चस्वाच्या लढाईत त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसला होता. ते स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून दूर राहिले मात्र मित्र पक्षांच्या मदतीने त्यांनी सत्ता मिळवली. या सर्व परिस्थितीमध्ये 2029 एकहाती वर्चस्वसाठी त्यांनी विरोधकांचे मनोबल खच्चीकरण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी टीएमसीनंतर ठाकरेंचे खासदार फोडणे हा मोठ्या रणनीतीचा भाग असल्याचे दिसून येते.
राजकारणात प्रत्यक्ष संख्येसोबत मानसिक प्रभाव देखील महत्वाचा ठरतो. जर उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटले तर कार्यकर्त्यांमध्ये पक्ष संपत चालला आहे, असा संदेश जाईल. त्यामुळे हरएक प्रकारे ठाकरेंचे खासदार फोडण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.