दीपा कदम
Shivsena UBT Politics : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मला सूड उगवून पाहिजे. सूड सूड आणि सूड...होय सूड...’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ९९ व्या जयंतीनिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात ही सूड उगवण्याची भाषा करत शिवसैनिकांना चेतवण्याचा प्रयत्न केला.
२० जून २०२२ रोजी शिवसेनेच्या आमदार, खासदारांसह शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडले ही अगदी ताजी घटना आहे. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर असलेले उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडून पायी मातोश्रीकडे रवाना झाले. उद्धव ठाकरेंनी त्यानंतर फेसबुकवरून शिवसैनिकांसोबत संवाद साधला. नंतरच्या काळात आदित्य ठाकरेंनी राज्यात लहानमोठ्या सभा घेत वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरेंनी राज्यभरात जिल्हा पातळीवर सभा घेतल्या. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. या सर्व काळात शिवसेना फोडली गेली त्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून जाब विचारतील, सूड घेतील अशी चर्चा होती, पण ते काही घडले नाही. मतदार शांतपणे हे सर्व पाहतोय, मतदान पेटीतून तो व्यक्त होईल. निवडणुकीच्या माध्यमातून ते सूड घेतील असं वाटलं होतं पण थंड प्रतिसाद शिवसेना ठाकरेंच्या वाट्याला आला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्रित चांगले यश मिळाले असले तरी २२ जागा लढवून शिवसेनेने केवळ नऊ जागा जिंकल्या. शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीतही सूड घेण्याची संधी तेव्हाही सोडलीच. ठाकरेंचे शिवसैनिक विधानसभा निवडणुकीत तरी सूड उगवतील अशी आशा लावून ठाकरे पितापूत्र बसले होते. पण तेव्हाही शिवसैनिक तलवार म्यान करुन बसले. राज्यभरात जेमतेम २० जागा शिवसेना ठाकरेंच्या निवडून आल्या. विधानसभेतही ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी ही देखील सूड घेण्याची संधी सोडली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याची चर्चा सुरु होती, मात्र मतदानामध्ये त्याचे परिवर्तन झाले नाही. शिवसेना ठाकरे गटाला मिळत असलेल्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षालाही मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांनीही ठाकरेंच्या कलाने घेतले होते. पण शिवसैनिकांनी सूड घेण्यासाठी तलवार उपसलीच नाही. हे वारंवार का होत गेलं याचा विचार करण्याची वेळ शिवसेना ठाकरे गटावर आली आहे.
२०१४ पासून निवडणुका या भावना, सहानुभूती, लाट यावर फिरण्याच्या प्रमाणाची गती कमी झाली आहे, त्याचा एका मर्यादेतच फायदा होतो. मात्र मतदारसंघाच्या बांधणीला आणि निवडणूक व्यवस्थापनाला पर्याय नाही हे विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिले आहे. निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी शिवसेनेच्या शाखा याच एकेकाळी उत्तम नमुना होत्या. या शाखांच्या पायावरच शिवसेनेचा डोलारा उभारलेला होता. या शाखा विस्कळीत होण्यास केवळ शिवसेनेत पडलेली फूट हे एकमेव कारण नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी मागच्या आठवड्यातील याच वार्तापत्रावर, शिवसेनेचा पाया आता कोणत्या समाजघटकांमध्ये रुजला तर शिवसेनेला भविष्य असेल यावर नेत्यांनी चिंतन व विचार करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
चाळींमध्ये राहणारा मराठी माणूस अजूनही तिथेच राहिलेला नाही. तो मध्यमवर्गीय झाला आहे, उपनगरात फ्लॅटमध्ये राह्यला गेला आहे. गणपतीच्या मिरवणुकांसाठी तरुण तरुणींची गर्दी जमते, तो दहीहंडीच्या थराला देखील हाच तरुण दिसतो. पण आजुबाजूच्या प्रश्नांवर तो किती सजग आहे किंवा समाजाला तो किती जोडलेला आहे याचाही विचार करावा लागणार आहे. गिरण्यांच्या संपानंतर या शहरावर आलेली अवकळा, त्यातून स्थानिकांच्या रोजगाराचा उभा राहिलेला प्रश्न यामुळे शिवसेना मराठी माणसाने जवळ केली. हा रोजगाराचा प्रश्न आता व्यापक झाला आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत रोजगाराचे प्रश्न आजही कायम आहेत. मात्र त्यासाठी नव्याने कसे मैदानात उतरायचे यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना कस लावावा लागेल. धरसोडपणाची भूमिका सोडावी लागेल.
बाळासाहेबांच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत देखील,‘मी अर्ध्यात मैदान सोडणारा नाही. बाळासाहेब जसे लढले तसेच मी लढणार. मी निष्ठावंतांना सोबत घेवून पक्ष चालवेन’ असे विधान केले. उद्धव ठाकरेंच्या या चिकाटीचे कौतुकच करायला हवे. प्रत्येक पक्षाला एक सूर असतो जो निवडणुकांमध्ये कधी सापडतो किंवा कधी नाही. सापडत नाही त्यावेळचे चाचपडणे आणि आदळआपट नैसर्गिक आहे. काँग्रेसही कमी अधिक प्रमाणात त्याच संघर्षातून जात आहे. पण जो त्रागा शिवसेना ठाकरे गटाकडून केला जातोय त्या पध्दतीने शिवसेनेच्या मित्रपक्षांकडून होत नाही. शिवसेनेपेक्षाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धूळधाण या निवडणुकीत झाली आहे. मात्र काँग्रेसने तर निवडणुकीच्या निकालांना दोन महिने उलटून गेल्यानंतरही अंगावरचा आळस झटकलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हातपाय झटकणे सुरु झाले आहे. शिवसेनेच्या प्रयत्नांमध्ये आदळआपटच जास्त आहे. गद्दार, निष्ठावंत, धमन्यांमधले सळसळतं रक्त, मर्द हेच किती काळ गिरवंत राहणार? आता त्यापुढची लढाई लढण्याची तयारी करायला हवी. मतदारसंघाची बांधणी आणि निवडणुक व्यवस्थापन हे निवडणुका जिंकण्यासाठीचे आवश्यक तंत्र झालेले आहे हे आता मान्यच करावे लागेल. त्याला आधुनिकतेची जोड द्यावी लागेल. मतदारांचे डेटा मॅनेजमेंट करावे लागेल. हे जितक्या लवकर उद्धव ठाकरे मान्य करतील तितक्या लवकर ते सूड घेण्याच्या भावनिक कल्पनेतून बाहेर पडून प्रत्यक्षात कामाला लागतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.