Shivsena UBT News : आगामी निवडणुकीत उद्धव यांना किमान पन्नास आमदार तरी निवडून आणावे लागतील. जर का हा आकडा दहा-पंधरावर आला तर शिवसेना ही ‘मनसे’ होईल, असे तज्ज्ञांना वाटते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोर कधी नव्हे, इतके मोठे आव्हान उभे राहिले आहे.
लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ल्यांचे बुरूज ढासळले आहेत. उद्धव यांच्यासमोर पक्षबांधणीचे मोठे आव्हान होते. त्यात कितपत यश आले हे त्यांनाच माहीत. निवडणुकीला सामोरे जाताना आघाडी असली, तरी पक्षाच्या उमेदवाराची काळजी आपणच घ्यावी लागते. ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षालाही करावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (Shivsena) पक्षात बंडखोरी झाली. पक्षांचे दोन तुकडे पडले. पक्षाचे चिन्हही गेले. दोन्ही पक्षातील बहुसंख्य वजनदार नेते राहिले नाहीत. काँग्रेसपेक्षा या दोन्ही पक्षांना पुन्हा उभे राहण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागले. नव्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागले. तसेच ज्यांनी पक्ष फोडले किंवा जे पक्षापासून दूर गेले अशांना शिंगावर घेण्याचे काम अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करावे लागले.
सत्ताधारी महायुतीविरोधात हे काँग्रेससह दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरले. सरकारला सळो की पळो करून सोडले. त्याचा फायदा गेल्या लोकसभा निवडणुकीत झालाही. या दोन पक्षापेक्षा काँग्रेसला चांगले यश मिळाले.
राष्ट्रवादी आणि शिवसेनाही चांगली कामगिरी केली हे आलेच. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा शिवसेनेचे जे बाल्लेकिल्ले होते तेथे पक्षाला यश मिळाले नाही. त्यांना मराठवाड्याने आणि मुंबईने तारले.
लोकसभेनंतर आता लगेचच विधानसभेला सामोरे जाताना सर्वच पक्षांची कसोटी आहे. महाविकास आघाडीचा आज विचार केला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात सर्वाधिक इनकमिंग होताना दिसत आहे. ज्यांनी पक्ष सोडला होता. जे भाजपात गेले होते, त्यापैकी अनेक नेत्यांना पुन्हा साहेबांच्या पक्षात यायचे आहे.
आमदार व्हायचे आहे. कोण एक परदेशी सोडता एखाद्या पक्षाचा बडा नेता शिवसेनेत (उद्धव गट) गेला आहे असे चित्र नाही. नगर जिल्ह्यातील दोन साखरसम्राटांपैकी एकजण पुन्हा कॉंग्रेस आणि एकजण शिंदेच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांना 2019 मध्ये जिंकलेल्या 63 जागा पुन्हा जिंकून दाखवाव्या लागतील. पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा जिंकाव्या लागतील आणि इतक्या जागा जिंकणे सोपे काम नाही. नवे मावळे मैदानात उतरवून त्यांना जिंकून आणावे लागणार आहे.
उमेदवारांना जी रसद पोचवावी लागते त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आघाडीवर आहेत. त्यांची बरोबरी उद्धव आणि त्यांची शिवसेना करू शकेल का? पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाली. ही सहानुभूती ‘कॅश’ करण्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही.
याउलट शरद पवार यांनी राज्य पुन्हा पिंजून काढले. याउलट उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या नेत्यांचे दौरे तुलनेने कमी झालेले दिसतात. सहानुभूती आहे पण, त्यावर स्वार होण्यात उद्धव ठाकरेंना अपयश येताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेपेक्षा केंद्रातील मोदी-शहा यांच्यावरच टीकेचे प्रहार करताना दिसत आहेत.
आगामी निवडणुकीत उद्धव यांना किमान पन्नास आमदार तरी निवडून आणावे लागतील.आज शिवसेनेचे जे नेते आहेत. आमदार आणि खासदार आहेत त्यांनी जर खऱ्या अर्थाने मशाल पेटविली. विरोधकांच्या विशेषतः शिंदेंच्या पक्षाला चारीमुंड्या चित केले तरच या पक्षाचे भविष्य उज्ज्वल आहे.
एकीकडे महायुती आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही डोकेदुखी शिवसेनेसमोर असणार आहे. मराठी माणसाच्या मतात फूट पडली तर त्याचा फायदा अर्थात महायुतीला होऊ शकतो. लोकसभेचा विचार करता उद्धव यांच्या शिवसेनेपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेनेही चांगली कामगिरी केली होती हे नाकारून चालणार नाही.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांची टीम तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेसच्या सहकार्याने विजयश्री खेचून आणताही येऊ शकते. शेवटी मुद्दा येतो तोच तुमच्या पक्षाची तयारी किती आणि प्रत्येक उमेदवाराला किती रसद पुरविली जाते यावरच निवडणुकीतील यशापयश अवलंबून असते.
2014 निवडणुकीत ज्या पद्धतीने उद्धव लढले होते त्याप्रमाणेच पुन्हा त्यांना मैदानात उतरावे लागणार आहे. त्यावेळी शिवसेना अखंड होती ती आज नाही. हे ही महत्त्वाचे आहे.राज्यात ठाकरे नावाला ग्लॅमर आहे. या ग्लॅमरला फायदा उद्धव कसा उचलतात ते कळेलच.
अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : 9881598815
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.