आमदार माजलेत... असं फडणवीस म्हणाले ते खरंच! जनता त्यांना जागा दाखवेलच

विधिमंडळात कार्यकर्ते एकमेकांना भिडले यात नवल वाटायचे काहीच कारण नाही. कारण लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळ सभागृहात बसणाऱ्यांनीच त्याचे पावित्र्य घालवून टाकले आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

विधिमंडळात कार्यकर्ते एकमेकांना भिडले यात नवल वाटायचे काहीच कारण नाही. कारण लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळ सभागृहात बसणाऱ्यांनीच त्याचे पावित्र्य घालवून टाकले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला मोठी परंपरा आहे. अलिकडच्या काळात सभागृहात गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, नारायण राणे, आर. आर. पाटील, दिलीप वळसे-पाटील, गणपतराव देशमुख, नरसय्या आडम मास्तर, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे किती तरी नेते कधी विरोधी बाकांवरून तर कधी सत्ताधारी बाकांवर बसून एकमेकांविरोधात योग्य मुद्द्यांना धरुन अक्षरशः तुटून पडत असत. आपल्या मुद्द्यांबाबत कधीही मागे न हटता समोरच्याला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडत. सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे हे नेते बेल वाजताच सभागृहाबाहेर आल्यानंतर एकमेकांच्या ताटात जेवताना मी अधिवेशन काळात पाहिले आहेत. सभागृहाच्या बाहेर, आवारात एकमेकांशी आदरयुक्त बोलताना, गप्पा मारताना पाहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आमदार-मंत्री एकमेकांना शत्रू समजून वागताना दिसत आहेत.

Devendra Fadnavis
BJP Politics: भाजपला हवीत 80 टक्के बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मतं! कार्यकर्त्यांना दिलं नवं टार्गेट

एखाद्या विरोधी नेत्याला त्याच्या आवाजावरून 'मॅव मॅव' करणे, ' 'ये कोंबडी चोर', 'ये मंगळसूत्र चोर', 'ये गद्दार', 'खोके-बोके', 'बनियन-लुंगी गॅंग', अशा टिपण्णी आमदार एकमेकांवर अगदी बिनधास्तपणे (निर्लज्जपणे) करताना दिसतात. त्याचे रील बनवून सोशल मीडिया प्रसारित करतात. न्यूज चॅनलही त्याला फोडणी लावून प्रसिद्धी देतात. बरं हे सभागृहाबाहेर चालत होते, पण आता हे पठ्ठे सभागृहातही नळावर भांडल्या सारखे भांडतात. वरिष्ठ सभागृहात भाजपच्या महिला आमदार आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्यातील संवाद संपूर्ण राज्याने ऐकला आहे. सभागृहात मंत्र्यांना गद्दार म्हणणाऱ्या आमदाराला 'बाहेर ये तूला बघतो', असे धमकावणारे मंत्रीही याच अधिवेशनात आपण पाहिले. कॅमेऱ्यासमोर अर्वाच्य भाषेत एकमेकांची अब्रू काढणारे आमदार- मंत्रीही दररोज दिसतात. हे सर्व पाहिले की, लोकप्रतिनिधी, सभागृह यांचा एवढा दर्जा का घसरला असा प्रश्न पडतो‌. कालची मारामारी पाहता आमदार-मंत्री यांच्यासोबत हे 'ठेकेदार कार्यकर्ते' सभागृहाच्या आवारात घुसतातच कसे असा प्रश्न पडतो. नडलेल्या सर्वसामान्य नागरिकाला विधिमंडळ परिसरात प्रवेश करताना कितीतरी नियम लावलेले असतात, तो कधीच सहजपणे आत जाऊ शकत नाही, पण हे ठेकेदार-कार्यकर्ते आत येतातच कसे, हाही प्रश्न आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Minister Honey Trap: "सगळे मंत्री एकमेकांकडं पाहून राहिले..."; 'हनी ट्रॅप'च्या मुद्द्यावर फडणवीस सभागृहात नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जे बोलले ते खरेच आहे. 'लोकप्रतिनिधी माजलेत' अशीच सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना आहे. ही भावना लोकशाहीसाठी आणि एकूणच राजकीय व्यक्तींच्या प्रतिमेसाठी योग्य नाही. यावर तातडीने सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती यांनी एकत्रित येऊन आचारसंहिता लावणे आवश्यक आहे. एखादा मंत्री किंवा आमदार सभागृहात जाताना त्याच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करणे, शेरेबाजी करणे, घाणेरडे आवाज काढणे अशा प्रकारांना नियमाने बंदी घालायला हवी. सभागृहाबाहेर आमदार जे आंदोलन करतात, त्यासाठीही आचारसंहिता आणि नियमावली करायला हवी. जे विधिमंडळातील पक्ष नेते आहेत, त्यांनी सातत्याने आपल्याला आमदारांशी संवाद साधून त्यांना आमदार म्हणून कसे बोलावे, काय टाळावे, विधिमंडळ कामकाज या संदर्भात सातत्याने प्रशिक्षित करायला हवे.

Devendra Fadnavis
Non Grant Teachers: विनाअनुदानित शिक्षकांसाठी खूशखबर! येत्या 1 ऑगस्ट पासून खात्यात अनुदान होणार जमा; सरकारची घोषणा

केवळ प्रसिद्धीसाठी टीकाटिप्पणी करणाऱ्या आमदार-मंत्र्यांकडे प्रसिद्धी माध्यमांनीही दुर्लक्ष करायला हवे. ज्याच्या विरोधात तुमच्याकडे ठोस पुरावे आहेत, अशांना पाठीशी न घालवता सभागृहात आणि इतर कायदेशीर मार्गाने आवाज उठवायलाच हवा. पण सध्या राजकारणाची आणि एकूणच राजकीय व्यक्तींची जी काही शोभा झाली आहे, ती याच लोकांनी थांबवायला हवी. आजकाल स्वतः ला कार्यक्षम म्हणून घेणारे लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना अर्वाच्य भाषेत शिव्या घालत असतात. त्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ, ऑडिओ क्लिप हेच प्रसिद्ध करत असतात, हे ही प्रकार बंद व्हायला हवेत. प्रशासन हे नियमांनुसार चालायला हवे, लोकप्रतिनिधी यांनीही नियमांमध्ये राहून स्वतः ची आब राखत काम करणे अपेक्षित आहे. यासाठी पक्ष पातळीवर अभ्यासवर्ग, आमदारांना विधिमंडळाकडून प्रशिक्षण, मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्र्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन व्हायला हवे. राज्यात स्पष्ट बहुमत असणारे सरकार आहे. राज्यासमोरचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. असे असताना सभागृहात अत्यंत शिस्तीने नियमाने आणि दर्जेदार चर्चेतून कामकाज होणे अपेक्षित आहे. जनतेने तुम्हाला विधिमंडळात कायदे करण्यासाठी, जनतेचा आवाज बनून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवले आहे, याची जाणीव, भान प्रत्येक लोकप्रतिनिधीने ठेवलेच पाहिजे. अन्यथा जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com