
कल्याणी शंकर
(ज्येष्ठ राजकीय विश्लेषक)
भाजपकडून ममतांवर सतत होत असलेल्या ‘मुस्लिमांचे लांगूलचालन करणाऱ्या नेत्या’ या आरोपांना उत्तरासाठी ममतांनी पश्चिम बंगालमधील दिघा येथील जगन्नाथ मंदिराच्या माध्यमातून खेळलेला हा राजकीय डाव उपयुक्त ठरू शकतो. हिंदू मतदारांचा पाठिंबा वाढण्याची शक्यता या मंदिर राजकारणातून निर्माण झाली आहे. २०२६ मध्ये प. बंगाल विधानसभा निवडणूक ममतांसाठी सत्ता टिकवण्याचेच नव्हे, तर जनमतावर आपली पकड कायम राखण्याचेही मोठे आव्हान ठरणार आहे. ही सत्तास्पर्धा तीव्र असेल.
दिघा येथील जगन्नाथ मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून पश्चिम बंगालमध्ये वाद उत्पन्न झाला आहे. हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असून, त्याला मंदिर युद्धाचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्याचा हा सोहळा अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ३० एप्रिल रोजी सुरू झाला. बंगालमधील हे जगन्नाथ धाम ही ओडिशातील पुरी येथील जगन्नाथाच्या मंदिराची प्रतिकृतीच आहे. ममता बॅनर्जी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन हे ममतांच्या राजकीय डावपेचातील एक महत्त्वाची चाल ठरणार आहे. याद्वारे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतःला हिंदू हितसंरक्षक, हिंदू श्रद्धा जपणाऱ्या तारणहार ही आपली प्रतिमा अधोरेखित करून भाजपवर राजकीय कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत आहेत. एकीकडे भाजपचा ‘जय श्रीराम’या लोकप्रिय नाऱ्याला ‘जय जगन्नाथ’ हा नारा देऊन शह देण्याचाही ममता यांचा प्रयत्न आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात हा एक नवाच प्रवाह दिसून येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंदिरावर आधारित रणनीती अवलंबून कलाटणी देण्यास सुरुवात केली आहे. २०११ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सत्तेवरून हटवून मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम समुदायाचा-मतदारांचा पाठिंबा टिकवून ठेवला आहे. राजकीय डावपेचात निष्णात, धुरंधर, चतुर नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममतांनी आता स्वतःची हिंदू ओळख अधोरेखित करण्यासाठी आणि स्वतःच्या ब्राह्मण (उच्चवर्णीय) जातीच्या पार्श्वभूमीचा वापर करण्याची रणनीती आखली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेत दिघा येथे भव्य मंदिराची उभारणी केली असून, त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षालाही गाफील ठेवले आहे.
हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून, ममता बॅनर्जींच्या सौम्य हिंदुत्वाच्या (सॉफ्ट हिंदुत्व) व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. हा प्रयत्न त्यांच्या हिंदू मतदारांच्या मतपेढीत वाढ करण्यासाठी असू शकतो किंवा मुस्लिम मतदारांचा पाठिंबा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तोडगा म्हणून ममतांनी हा मार्ग अवलंबलेला असू शकतो. मुर्शिदाबाद येथील दुर्दैवी घटनेनंतर भारतीय जनता पक्षावर ‘हिंदू विरोधी’ असा शिक्का बसला असून, अशा पार्श्वभूमीवर ममतांची हे डावपेच अधिक प्रभावी ठरू शकतील.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अल्पसंख्याकांसह बहुसंख्याक समुदायालाही खूश करण्याचा प्रयत्न सुरू केल्याबद्दल विरोधी पक्ष भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हिंदू मतदारांचा घटलेला आधार वाढविण्याच्या ममतांच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचा भाजपचा आऱोप आहे. दरम्यान, डावे पक्ष आणि काँग्रेस यांनी ममता आणि भाजप या दोन्ही पक्षांवर या संदर्भात टीका केली आहे. या राज्यातील राजकारण अधिकाधिक धर्माभोवती केंद्रित करण्याचा आरोप केला आहे. धर्मावर आधारित राजकारणात दोन्ही पक्ष परस्परांवर कुरघोड्या करत असून, त्यातून धर्माधिष्ठित राजकीय रंग अधिक गडद होत चालल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. ‘सौम्य हिंदुत्वा’कडे झुकण्याची ममतांनी घेतलेली भूमिका ही त्यांची राजकीय गरज बनली आहे. त्यांचे राजकीय मित्र आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडूनही काही काळ ‘सौम्य हिंदुत्वा’चे राजकारण पाहायला मिळाले होते. मात्र, त्यांना त्यात अपेक्षित यश लाभलं नव्हतं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घालून दिलेल्या या हिंदुत्वाच्या प्रवाहाबाहेर राहणे आता अन्य राजकीय पक्षांसाठीही कठीण होत चालले आहे. मंदिरे आणि समान नागरी कायद्यासारख्या विषयांवर राजकारणात भर दिला जात आहे. मात्र, त्यामुळे या राज्यात २६ टक्के असलेल्या मुस्लिमांमध्ये एकटे पडल्याची भावना निर्माण होऊन ते दुरावले जाण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास २०२६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ती निर्णायक ठरू शकते, कारण या निवडणुकांमध्ये १२० पेक्षा अधिक जागांवर मुस्लिम मतदार प्रभावी ठरणार आहेत. त्यामुळे या बदलांचा निवडणुकांवरील परिणाम दुर्लक्षित करून चालणार नाही.
भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी या प्रकल्पाच्या व्यवस्थापन आणि स्वरुपाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी विचारले की, नुकतीच उद्घाटन करण्यात आलेली रचना मंदिर आहे, की सांस्कृतिक केंद्र. कारण या संदर्भातील अधिकृत कागदपत्रांमध्ये याला ‘जगन्नाथधाम संस्कृती केंद्र’ असे संबोधले गेले आहे. भाजपने या मंदिर प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्यांनी राज्याच्या सरकारी निधीचा या मंदिरासाठी केला गेलेला वापर अन् त्याचा मूळ आराखडा सांस्कृतिक केंद्राचा असल्याचे सांगत टीका केली. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या हिंदुत्वावरील निष्ठेबाबतही प्रश्न उपस्थित केले, कारण ममतांनी याआधी मुस्लिम समाजाला आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेकदा विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्यावर मतपेढीचे राजकारण करतात, असा आरोप करून विरोधक टीका करत असतात.
ममता बॅनर्जी यांनी २०१८ मध्ये या प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा केला होता. राज्य सरकारने या मंदिराच्या बांधकामावर २५० कोटी रुपये खर्च केले असून, हे संकुल २० एकर परिसरात उभारण्यात आले आहे. हे मंदिर दिघामधील पर्यटन वाढवण्यास हातभार लावेल. तसेच सांस्कृतिक केंद्र म्हणूनही कार्य करेल. दिघा मंदिर संकुलाची रचना कलिंग शैलीत करण्यात आली आहे. हे संकुल राजस्थानमधील सुंदर गुलाबी वालुकामय खडकांद्वारे (सँड स्टोन) बांधले गेले आहे. यात भोग मंडप, नटमंदिर, जगमोहन आणि गर्भगृहाचा (मंदिराचा मुख्य भाग) समावेश आहे. प्रवेशद्वारावर ३४ फूट उंच, १८ बाजूंनी नक्षी असलेला काळ्या दगडाचा अरूणस्तंभ आहे, ज्यावर अरुणाची मूर्ती बसवण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी मंदिराला एक सोन्याचा झाडू अर्पण केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी विविध गटांचा पाठिंबा मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले होते. तसेच डावे पक्ष आणि काँग्रेसला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यातूनच बंगालमधील आजचे राजकीय चित्र व्यापक प्रमाणात दिसत आहे. हे सर्व संकेत असे दर्शवतात, की हिंदुत्व हे २०२६ च्या विधानसभा निवडणुकांत एक प्रमुख अन् निर्णायक मुद्दा ठरू शकतो. अशा परिस्थितीत बॅनर्जी यांचा थेट सामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होईल, कारण भाजप मोदींनी केलेल्या कामगिरीचा प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा निश्चित प्रयत्न करेल.
सुवेंदू अधिकारी यांच्या ‘मुस्लिम लीगची बाहुली’ असल्याच्या आरोपाला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी राज्य विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. याद्वारे ममता आपली ही प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नांत असल्याचे दिसते. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सहा पोटनिवडणुकांत तृणमूल काँग्रेसने आपला मतांचा वाटा वाढवला आहे. राज्यातील सुमारे निम्मी लोकसंख्या अजूनही तृणमूल काँग्रेसच्या बाजूने आहे. भाजपचा मतांचा वाटा ३८ टक्क्यांवरून घसरला आहे. २०२१ नंतर अनेक खासदार आणि आमदारांनी भाजपला रामराम केला आहे.
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी २०२६ ची निवडणूक ही ममतांनी आधीपासून जमा केलेल्या राजकीय भांडवलात आणखी भर घालण्याची एक मोठी संधी आहे. पश्चिम बंगालमध्ये सलग चौथ्यांदा सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या ममता बॅनर्जी हे चांगलेच जाणून आहेत, की दीर्घ काळ सत्तेत राहिल्यानंतर प्रस्थापितविरोधी (सत्ताविरोधी-अँटी इन्कबन्सी) लाट टाळणे अवघड असते. विशेषतः जे मतदार ममता् सरकारच्या अपयशाविरोधात रस्त्यावर उतरून स्वतःहून निषेध नोंदवत आले आहेत, त्यांचे मतपरिवर्तन हे कठीण आव्हान असते. या पार्श्वभूमीवर, २०२६ ची निवडणूक ममतांसाठी केवळ सत्ता टिकवण्याचेच नव्हे, तर जनमतावर आपली पकड कायम राखण्याचेही मोठे आव्हान ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.