
Maharashtra Political News : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा प्रकरणावरून अर्थसंकल्पी अधिवेशन चांगलेच गाजले. राज्यात एक नवा वाद उभा राहिला. मुख्यमंत्रीपद गेल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. नव्या भूमिकेत अजूनही ते समरस झाले नसल्याचे देहबोलीतून स्पष्ट दिसते. राजकीय अस्वस्थतेच्या या काळात कामरा प्रकरणाचे निमित्त साधून शिवसैनिक अचानक आक्रमक झाले. शिवसेनेत उभी फूट पडून आता तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, मात्र हिंदुत्ववादाची स्पेस व्यापण्यासाठी तसेच मूळ शिवसेना कोणती यावरुन दोन्ही शिवसेनेत स्पर्धा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईत अजूनही आपली राजकीय छाप न पाडू शकलेल्या शिंदे सेनेने या वादातून नेमके काय साध्य केले? हा प्रश्न अजूनही कायम आहे.
स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा (Kunal Kamara) याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक कवितेनंतर एक मोठे राजकीय वादळ उभे राहिले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत कुणाल कामराने जिथे ही कॉमेडी सादर केली होती, त्या हॅबिटाट स्टुडिओची तोडफोड केली. पूर्वाश्रमीचा आदित्य ठाकरेंचा व आता शिंदे यांचा समर्थक राहुल कनाल याने या आंदोलनाचे नेतृत्व केले.
दुसऱ्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामरा याच्याविरोधात स्पष्ट भूमिका घेण्याबरोबरच पालिका आणि पोलिस प्रशासन लागलीच कामाला लागले. पालिकेचा बुलडोजर स्टुडिओच्या अनधिकृत बांधकामावर फिरला. कामरा याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात पाच ते सहा विविध गुन्हे दाखल करण्यात आले.
सत्ताधारी पक्षानेच आक्रमक भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षासह विरोधी पक्षांनी कामरा याची बाजू घेतली. उभा देश जो बोलतोय तोच कामरा बोलला, त्यामुळे यात चुकीचे काय आहे, असा सूर या विरोधी पक्षाचा होता आणि आहे. पालिकेपाठोपाठ पोलिस प्रशासनाने कामरा याला नोटीस धाडून तातडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले.
या सर्व गदारोळात राज्य चालवण्याची, कायदा व सुव्यवस्था राखण्याची ज्याची जबाबदारी आहे, त्या सत्ताधारी पक्षाचे नेते हिंसाचाराला चालना देतात, तोडफोडीचे समर्थन करतात, हा नवाच ट्रेंड महाराष्ट्रात सुरु झाला आहे. दुसरे म्हणजे आपल्यावरची टीका, व्यंग्य, विनोद सहन करण्याची क्षमता अलिकडे राजकारण्यांनी पूर्णपणे गमावली आहे. याला कुठलाही पक्ष अपवाद राहिलेला नाही. हे देखील अधोरेखित झाले.
शिवसेनेकडून तोडफोडीचे समर्थन
दुसरीकडे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते, मंत्री या हल्याचे खुले व जाहीर समर्थन करत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणी काहीही बोलून जावे, क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली आम्ही ते कुठपर्यंत खपवून घ्यावे, असा सवाल या नेत्यांचा आहे. स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली लोकांचा, आमच्या नेत्यांचा अपमान करण्याचे काम सुरु आहे. यावेळी आम्ही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कामरा अजूनपर्यत राज्यात परतला नाही. हा शिवसेनेचा दणका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जॉनी वॉकर, मेहमूद, जॉनी लिव्हर यांनी कॉमेडी केली तर कपिल शर्माही स्टँडअप कॉमेडी करतात. मात्र ते या लेवलवर कॉमेडी करत नाहीत. अमेरिकेत रोस्टिंग करतात, इंग्लडमध्ये हाईड पार्कमध्ये ओपन कॉमेडी होते. मात्र, तिथेही या पध्दतीची टीका होत नसल्याचा त्यांचा दावा आहे. विधानसभेत आम्हीच खरी शिवसेना असल्याचे जनतेने सिद्ध केलंय. मात्र त्यानंतरही आमची बदनामी केली जाते. हे सुपारी घेऊन केलेले काम असल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत.
शिवसेनेवर बुमरॅँग झाल्याचा दावा
शिवसेनेचा नेम चुकला असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सांगतात. विधानसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे एकनाथ शिंदे यांच्यावरचा गद्दारी डाग बऱ्यापैकी पुसला गेला होता. मात्र, कुणाल कामरा वादामुळे गद्दार प्रतिमा अधिक अधोरेखीत झाल्याचे ठाकरे यांच्या पक्षाचे नेते सांगतात. दुसरी गोष्ट ज्यावेळी शिवसैनिकांनी तिकडे तोडफोड केली तेव्हा कामरा तिकडे नव्हता. तो कार्यक्रम वेगळा होता, तिथे उपस्थित लोकांवर राग काढण्याची गरज काय होती, असा सवाल ठाकरे गटाचे नेते करतात. पोलिसांनी जे जे प्रेक्षक उपस्थित होते, त्यांनाही नोटीस धाडली आहे. त्यातून सामान्य जनतेचा प्रशासनाविरोधातील रोष अधिक वाढणार आहे.
शिवसेनेने आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांच्यावर बुमरँग झाल्याचा ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. आपली प्रतिमा उजळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर’सारखे दोन सिनेमे काढले, मात्र, कुमाल कामरा याच्या एका गाण्याने हे सर्व धुळीस मिळवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व्हीजे मल्लिकाने पालिकेवर टिपण्णी केली होती. किशोरी पेडणेकर यांनी एक कविता गाऊन त्याला उत्तर दिले होते. त्यानंतर शिवसेनेने तिला नोटीस दिली, मात्र ते संपूर्ण प्रकरण पक्षाच्या अंगलट आले होते, याची आठवणही ठाकरे यांच्या नेत्याने करुन दिली.
यापूर्वी ‘अरे ला कारे’ ने उत्तर दिले जायचे. मात्र, आता तो जमाना राहिला नाही. तरुण पिढीला अशा गोष्टी आवडत नाहीत. उलट त्यातून पुढच्या व्यक्तीला सहानूभूती मिळते. कुणाल कामरा याला या प्रकरणात उलट सहानूभूती मिळाली आहे, त्याचे फॅन्स, फॉलोअर्स वाढले आहेत. कामराच्या कॉमेडीतून राहुल गांधी, उद्धव ठाकरेंसह कुणीही सुटले नाही. आता शिवसेनेने दबाव टाकून ‘बुक माय शो’ला कामराच्या शोची माहिती थांबवली. मात्र दुसरीकडे अलिकडे फारसा चर्चेत नसलेला कुमाल कामरा त्यामुळे अधिक चर्चेत आला. सदर व्हिडिओचे व्ह्यूज अडीच कोटींवर पोहोचले आहेत. त्याला क्राऊंड फंडिंगद्वारे दोन ते चार कोटी रुपये मिळाले आहे.
कामराने यापूर्वीही नरेंद्र मोदींवर अनेकदा टीका केली आहे. विमान प्रवासावर सहा महिने बंदी वगळता अजून कामरावर फारशी मोठी कारवाई करण्याचे केंद्र सरकारने टाळले. दुसरी बाब म्हणजे या हल्ल्याचा सूत्रधार असणारा राहुल कनाल हा शिवसैनिक केव्हापासून झाला असा सवाल अनेक जण करत आहेत. यापूर्वी तो काँग्रेस, आदित्य ठाकरेंसोबत होता. त्यावेळी त्याने बॉलीवूड कनेक्शन वापरुन त्या त्या पक्षाच्या नेत्यांशी जवळीक साधली आणि पुढे जावून त्या पक्षाची वाट लावली असल्याची आठवण ठाकरे यांच्या पक्षनेत्यांनी करून दिली आहे.
व्यापक मेसेज
कुणाल कामरा प्रकरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या या कार्यकाळात फडणवीस हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. कामरा प्रकरणातील फडणवीस यांची भूमिका शिंदे यांच्या प्रेमापोटी किंवा राजकीय विवशतेपोटी घेतलेली नसून यामध्ये एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. तो म्हणजे आम्ही उजव्या विचारधारेला होणारा टीका, विरोध आता सहन करणार नाही. यापुढे या पद्धतीने विरोध करण्याचा प्रयत्न करु नका, असे स्पष्ट सांगितले आहे.
कुणाल कामरा याने यापूर्वी मोदींसह संघावर वांरवार निशाना साधला आहे. यातून इतर सर्व लोकांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. मात्र लोकशाहीसाठी हे धोकादायक असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे भाजपने या मुद्यावरून तातडीने आक्रमक भूमिका घेऊन शिवसेनेच्या हातून तसा मुद्दा शिल्लक ठेवला नाही.
मूळ शिवसेना कुणाची ?
मुंबईत शिवसेना ही कायम आक्रमक राहिली आहे. शिवसेनेच्या या आक्रमक रुपाचे आकर्षण आजही अनेक कट्टर शिवसैनिक तसेच मराठी माणसांना होते. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडण्यापासून दंगलीमधील शिवसेनेच्या आक्रमक भूमिका यामुळे शिवसेनेकडे मराठी माणूस तसेच तरुणाई मोठ्या प्रमाणात वळली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची आक्रमक भूमिका हळूहळू मवाळ होत गेली. मराठी लोकांचा मुद्दा राज ठाकरे याच्या हाती गेला. उद्धव ठाकरे पाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची भूमिका अधिक मवाळ होत गेली.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आक्रमक शिवसेना, हिंदुत्वाचे मुद्दे पळविण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा पक्ष सातत्याने करतो आहे. उद्धव ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची व्याख्या स्वीकारल्यानंतर मुस्लिम समुदायाने शिवसेनेला लोकसभा, विधानसभेत भरभरुन मतदान केले. त्यावरुन भाजप, शिवसेना सातत्याने ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून मूळ शिवसैनिक आपल्याकडे वळविण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. मुंबईत ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक, आमदार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आले. मात्र, ठाण्याच्या तुलनेत मुंबईत पक्षाला अजूनही नीट बस्तान बसवता आलेले नाही. पक्षाला एक चेहरा देता आला नाही.
लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मुंबईत शिंदे सेनेला भाजपच्या तुलनेत चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाया मजबूत आहे. विधानसभा निवडणुकीत इतर विभागात सडकून मार खाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत १० जागा मिळविल्या.
मुख्यमंत्री असताना, पालिकेचे प्रशासन हातात असूनही शिंदे यांच्या पक्षाला मुंबईत व्यापक जनाधार मिळवून देता आला नाही. आता तर हिंदुत्ववादाची स्पेस बऱ्यापैकी भाजपने व्यापली आहे. त्यामुळे शिवसेनेचा आक्रमक अवतार दाखवून मूळ शिवसैनिकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची ही खेळी असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यात शिंदे बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. या प्रकरणात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी विरोधी पक्षाने खास करुन ठाकरे गटाने सपशेल गमावली आहे.
खरे तर शिवसेना स्टाईलप्रमाणे कुणाल कामरा याला मातोश्रीवर बोलवून सत्कार करणे किंवा त्याच्या मागे शिवसैनिक उभे राहतील, असा विश्वास देता आला असता. मात्र शिवसेना, काँग्रेस पक्षाने कामरा याची बाजू आक्रमकपणे मांडली नाही. त्यातून व्यक्तिस्वातंत्र्यासाठी आम्ही लढतो, हा एक मोठा मेसेज देणे शक्य झाले असते. शिवाय ‘आरे’ला कारे’ तून उत्तरही मिळाले असते. मात्र ही रणनिती आखण्यात विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पालिका निवडणुकीचे गणित
या सर्व प्रकरणाचा शिवसेनेला पालिका निवडणुकीमध्ये विशेष फायदा होण्याची शक्यता फार कमी आहे. एकतर निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या दरम्यान असंख्य मुद्दे समोर येतील. उलट ऐन निवडणुकीत कुणाल कामराचा हा व्हिडीओ जास्त प्ले होण्याची शक्यता आहे. या सर्व गदारोळात व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा गंभीर आहे. व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे, तेच जर त्याची गळचेपी करत असतील तर काय करावे? हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
दुसरीकडे, कामरा प्रकरणात पोलिसांनी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस पाठवल्या आहेत. प्रेक्षकांनाही या वादामध्ये ओढून सरकारला नेमका काय संदेश द्यायचा आहे, हा देखील प्रश्न आहे. कुणाल कामराचा चेंडू न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या कवितेवरून सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यातून सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे या प्रकरणात जर न्यायालयाने राज्य सरकारला धक्का दिला, तर एकनाथ शिंदे याच्यासह भाजपची अडचण होऊ शकते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर असे मुद्दे येऊ शकतात. त्यासाठी मुंबईकरांनी सिद्ध राहावे लागेल.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.