BJP Preparation For Loksabha Election : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघावर गेली सहा टर्म भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व आहे. पक्षाची या दोन्ही मतदार संघावर मजबूत पकड आहे. पक्षातर्फे लोकसभा मतदार संघाचे विजयी उमेदवार सहसा बदलले जात नाहीत. त्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाते हे मागील निवडणुकीवरून दिसून येते. अपवाद काही एक दोन राजकीय प्रसंग आणि डावपेच असल्याचा आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे दोन्ही खासदार आपल्याला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, राजकारणाचा पोत बराच बदलला आहे. भाजपचे जुने मित्र ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षासोबत आहे. त्यामुळे पक्ष या दोन्ही उमेदवारांना पुन्हा संधी देवून भाकरी तीच ठेवणार कि नवीन उमेदवारांना संधी देऊन फिरवणार याकडेच आता जिल्ह्यासह राज्याचे लक्ष आहे. (Latest Marathi News)
जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ होते. पूर्वी जळगाव व एरंडोल मतदारसंघ होते. सन १९९१ पासून भारतीय जनता पक्षाने दोन्ही मतदार संघावर आपली पकड मजबूत केली. अपवाद दोन निवडणुकांचा आहे. त्यानंतर मात्र विरोधकांना भाजपने विजयाची संधी दिली नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे उन्मेश पाटील तर रावेरमधून रक्षा खडसे खासदार आहेत. दोन्ही खासदारांनी आपापल्या मतदारसंघात काम करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. खासदार उन्मेश पाटील यांना पक्षाने उमेदवार दिल्यास त्यांची लढण्याची दुसरी वेळ असेल. तर रावेरमधून खासदार रक्षा खडसे उमेदवारी मिळाल्यास 'हॅट्रीक' करणार का? याकडे लक्ष असणार आहे.
पक्षातर्फे विद्यमान खासदाराची उमेदवारी बदलली जात नाही हे इतिहासावरून दिसून येत आहे. जळगाव मतदारसंघात गुणवंतराव सरोदे यांना १९९१ व १९९६ अशी दोन वेळा संधी मिळाली. वाय. जी. महाजन यांना १९९९ व २००४ मध्ये पुन्हा संधी मिळाली आहे. एका प्रकरणामुळे त्यांना उमेदवारीची संधी मिळाली नाही. हरिभाऊ जावळे यांना जळगाव लोकसभेत २००७, २००९ मध्ये संधी मिळाली. तर ए.टी.नाना पाटील यांना सन २००९, २०१४ अशी दोनदा संधी मिळाली आहे. मात्र त्यांची हॅट्रीकची संधी हुकली. एका वादाच्या प्रकरणावरून त्यांची उमेवारीही कापली गेली.
जळगाव यापूर्वी एरंडोल मतदारसंघ होता. त्यावेळी अण्णासाहेब एम.के.पाटील यांना सन १९९१ पासून तर २००७ पर्यंत सलग भाजपतर्फे संधी मिळाली. मात्र एका प्रकरणात त्यांचीही उमेदवारी पक्षाने रद्द केली. रावेर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून भाजपने हरिभाऊ जावळे यांना २००९ मध्ये संधी दिली. पूर्वी हा मतदारसंघ जळगाव लोकसभेत होता. त्यावेळीही त्यांनाच संधी मिळाली होती. मात्र तिसऱ्या वेळी २०१४ मध्ये त्यांना रावेर लोकसभेतून पक्षाने उमेदवारी नाकारली.
भाजपची या मतदारसंघावर मजबूत पकड असली तरी त्यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भक्कम होती. आता मात्र ठाकरे यांची शिवसेना भाजपच्या विरोधात आहे. परंतु एकनाथ शिंदे याची शिवसेना भाजपसोबत आहे. त्यांच्यासमवेत कोणत्याही निवडणुका झालेल्या नसल्याने या नव्या युतीचा कल कळलेला नाही. याशिवाय भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याशिवाय पक्ष प्रथमच लोकसभा निवडणुका लढवावी लागणार आहे. भाजपला मात्र केंद्रात सत्तेची हॅट्रीक करायची आहे. त्यामुळे विजयी होणारा उमेदवार हाच त्यांनी निकष ठेवलेला आहे. यातूनच भाजप प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर बारीक लक्ष ठेऊन आहे.
जळगावमधून खासदार उन्मेश पाटील यांनी कामाच्या जोरावर पुन्हा भाजपकडून उमेदवारीची मिळण्याचा दावा केला आहे. मात्र पक्षातर्गंत काही नेत्यांशी असलेला वाद त्यांची वजाबाकीची बाजू ठरू शकते. त्यामुळे पक्ष नवीन उमेदवार देणार की त्यांच्यावरच विश्वास ठेवणार हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा जनतेशी संपर्क चांगला आहे. त्यांनी मतदारसंघात विकासासाठी कामही केले आहे. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपतून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही रक्षा खडसे यांनी भाजपचे काम कट्टरतेने केले.
पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे कोणतेही पक्षातर्गंत वाद दिसून आलेले नाहीत. मात्र ज्या नावामुळे त्यांना दोन वेळा संधी मिळाली त्याच ‘खडसे’नावामुळे तिसऱ्यांदा भाजप त्यांची संधी नाकारणार काय? याबाबत चर्चा आहे. मात्र पक्षाने केवळ त्यांचे काम लक्षात घेवून उमेदवारी दिल्यास रावेर लोकसभेची निवडणूक राज्यातील वेगळ्या वळणावरची असणार, यात काही शंका नाही.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.