Amit Shah, Eknath Shinde, Ravindra Chavhan Sarkarnama
ठाणे

Thane Politics : अमित शहांचे एकनाथभाईंकडे साफ दुर्लक्ष; भाजप ठाण्यातच पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत

Thane Politics : अमित शहा यांनी शिंदे यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत भाजपच्या मेगाभरतीला एकप्रकारे हिरवा कंदीलच दिला आहे. ठाण्यात भाजप मोठी फोड करणार असल्याचे बोलले जात आहे

सरकारनामा ब्यूरो

Thane News : भाजपमध्ये सुरु असलेल्या मेगाभरतीवरून शिवसेना प्रचंड नाराज आहे. यातही ठाणे जिल्ह्यात झालेल्या भाजप प्रवेशावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी चांगलाच त्रागा केला. कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि त्यानंतर शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील भाजप नेतृत्वाची तक्रार केली.

पण अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने पक्ष वाढवा असे आदेश देत एकप्रकारे अभयच दिले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षप्रवेश करणाऱ्यांची पुढची यादी तयार असल्याची माहिती आहे. यात भाजपने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच 'ऑपरेशन लोटस' च्या माध्यमातून शिवसेनेची (Shivsena) ताकद खिळखिळी करण्याचा चंग बांधला आहे.

काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांच्यासह महेश पाटील आणि सुनिता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे प्रवेश शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहेत. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांचे खंदे समर्थक असलेले महेश पाटील यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता, पण पक्षातील असहकार्यामुळे दुखावलेल्या पाटलांनी आता पुन्हा 'घरवापसी' केली आहे. त्यांच्या भगिनी डॉ. सुनिता पाटील यांनीही आपण भाजपपासून अलिप्त होते, आता परत आले, असे स्पष्ट केले.

माजी नगरसेवकांच्या रांगा :

शनिवारी (ता.२२ नोव्हेंबर) आणि रविवारी (ता.२३ नोव्हेंबर) कल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये मोठे 'इनकमिंग' होण्याची शक्यता असून, यात शिंदे गटातून कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक नवीन गवळी व मल्लेश शेट्टी, तर ठाकरे गटातून कल्याण पश्चिमचे माजी नगरसेवक सचिन बासरे व त्यांचे बंधू सुधीर बासरे नेत्यांचा पक्षप्रवेश अपेक्षित आहे, ज्यामुळे दोन्ही शिवसेनेला धक्का बसणार आहेत. शिवाय दिव्यातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

मनसेलाही फटका बसण्याची शक्यता :

मनसेतीलही काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत. यात माजी नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर, मंदा पाटील, कोमल पाटील, कस्तुरी देसाई हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मनसेचे आमदार राजू पाटील यांचे खंदे समर्थक आणि उद्योजक काशिनाथ पाटील हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेसोबत मनसेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT