Eknath Shinde On Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला आहे. महाविकास आघाडी असो वा महायुती अद्याप कोणत्या पक्षाच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. आघाडीचे नेते जागावाटपासाठी मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रभरात बैठका घेत आहेत, तर महायुतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाऊन आले आहेत. तरीही महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
महायुतीच्या याच वाढत्या दिल्लीवाऱ्यांवर विरोधीपक्षांनी खासकरुन ठाकरे गटाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांना दिल्लीश्वरांपुढे झुकावे लागते, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. याच टीकेला आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "तुमच्या मेहुण्याला नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीला (Delhi) कोण गेलं होतं?" असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. तसेच, "आपल्या कुटुंबावर संकट आलं की, इकडे-तिकडे पळणारे कधी कार्यकर्त्यांसाठी धावलेले दिसले नाहीत" असा टोलाही शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभेच्या (Lok Sabha) जागावाटपासाठी महायुतीने बैठकांचा धडाका लावला आहे. पण युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला कोणत्या आणि किती जागा येणार? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. अशातच लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत आज गुरुवार (२१ मार्च) रोजी महत्वाची बैठक घेतली होती.
या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आपल्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सवंगडी मानायचे. पण उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी असल्यासारखे वागवायचे. पण आता इथून पुढे हे खपवून घेतले जाणार नाही. अब राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा." आजच्या बैठकीसाठी शिवसेनेचे (Shivsena) खासदार, मंत्री, आमदार आणि इतर नेते उपस्थित होते.
या सगळ्यांसमोर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे सतत दिल्लीला जाऊन त्यांना जागांसाठी दिल्लीश्वरांपुढे झुकावे लागते, या ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, "तुमच्या मेहुण्याला नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीला कोण गेलं होतं? आपल्या कुटुंबावर संकट आलं की इकडे तिकडे पळणारे कधी कार्यकर्त्यांसाठी धावलेले दिसले नाहीत."
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभं राहा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका. शिवसैनिक फायरब्रँड आहेत. मुख्यमंत्री 24 तास काम करतो, त्याप्रमाणे तुम्हीही कामं करा. या निवडणुकीत आमदार म्हणून जेवढं लीड द्याल, तेच तुमचं प्रगतीपुस्तक असेल. यावरुनच तुम्हाला पुढचं तिकिट मिळेल की नाही हे ठरवलं जाईल. आमदार, जिल्हाप्रमुखांची आणि पदाधिकाऱ्यांची ही खरी टेस्ट आहे. सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. पक्षाची शिस्त कुणीही बिघडू नका, मी पण बिघडणार नाही. इथे राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. इथे कुणीही नोकर नाही, आपण सगळे मालक आहोत." एकंदरीत आजच्या बैठकीत शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये नव्याने प्राणफुंकण्याचे काम केले आहे. शिवाय काम करणाऱ्याला त्याचं फळ मिळेलच हा विश्वासदेखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत मिळत आहे.
(Edited By - Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.