Mahesh Gaikwad  Sarkarnama
ठाणे

Gaikwad Firing Update : महेश गायकवाड आज घरी परतणार, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागताची तयारी...

Bhagyashree Pradhan

Kalyan News : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिस ठाण्यातच वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर होती, त्यांना तत्काळ ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जवळपास 13 दिवसांनी ते आज रुग्णालयातून घरी येणार आहे. त्यानिमित्ताने शहरभर 'टायगर इज बॅक' असे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली असून ते गोळीबार प्रकरणानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी देखील बोलणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा द्वारली गावातील जाधव कुटुंबीयांसोबत जमिनीचा वाद होता. यावेळी जमिनीच्या मालकांनी आमदारांनी आमची जमीन हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. आमदारांनी आम्ही त्याचे रीतसर पैसे दिल्याचे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले होते. या सगळ्या प्रकारानंतर जाधव कुटुंबीय आणि महेश गायकवाड यांची भेट घेतली आणि हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेले.

त्यानंतर तेथे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील हजर झाला होता. यावेळी वैभवची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवून घेत नसल्याचे पाहताच त्यांनी घडलेल्या सर्व प्रकार आमदार गायकवाड यांना फोन लावून सांगितला. काहीच वेळात आमदार गायकवाड हे देखील पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील हे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये बसले होते.

त्याच केबिनमध्ये आमदार गायकवाड देखील बसण्यासाठी गेले. पाच मिनिटं बसल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल जगताप बाहेर काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी गेले असतानाच आमदार गायकवाड यांनी स्वतःची रिव्हाॅल्व्हर काढून महेश गायकवाड यांच्यावर थेट गोळीबार सुरू केला. नंतर एकच गोंधळ उडाला. या गोळीबारात महेश गायकवाड हे जखमी झाल्याने त्यांना तेथून रुग्णालयात नेण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समर्थक जंगी स्वागत करणार..

गोळीबारानंतर दोन दिवस महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या शरीरातून एकूण सहा गोळ्या डॉक्टरांकडून बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. मात्र सुदैवाने त्या सगळ्या प्रकरणातून सुखरूप बाहेर आले असून आज त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात येणार आहे. ते घरी येणार असल्याने त्यांचे सर्वच कार्यकर्ते उत्सुक असून त्यांच्या जंगी स्वागताची त्यांनी तयारी केली आहे. त्याच निमित्ताने शहरभर बॅनर लावण्यात आले असून 'टाइगर इज बॅक', भावी आमदार.., टाइगर अभी जिंदा है या आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

कल्याणमध्ये येणार...

उपचारादरम्यान डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून होमहवन, मंत्र जप केले जात होते. तब्बल तेरा दिवसानंतर महेश गायकवाड रुग्णालयातून घरी येणार आहेत. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महेश गायकवाड हे कल्याणमध्ये दाखल होतील. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे .

माध्यमांशी बोलणार...

सायंकाळी साडेपाच वाजता महेश गायकवाड हे आपल्या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. या घटनेनंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलणार असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT