Harshvardhan Jadhav sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Harshvardhan Jadhav News : 'टायगर अभी जिंदा है..' मी सव्वा दोन लाखांच्या पुढे : हर्षवर्धन जाधव यांचा दावा...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News :माझ्याजवळ पैसा नाही,आर्थिक दृष्ट्या कोलमडलोयं, हार्ट अटॅक येऊन गेलाय. राहायला घर नाही, असा बिकट परिस्थितीत काल झालेल्या मतदानाची जी आकडेवारी समोर येते आहे. त्यात आपण सव्वा दोन लाख मतांच्याही पुढे गेलो आहोत, असा दावा माजी आमदार आणि लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघातून अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

एकट्या कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून एक लाखांवर मते आपल्याला मिळाली आहेत. त्यामुळे मी निवडून आलो किंवा नाही आलो तरी शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहील, अशी भावनिक साद हर्षवर्धन जाधव यांनी मतदारांना घातली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2 लाख 83 हजार एवढी मते मिळवत हर्षवर्धन जाधव यांनी या मतदारसंघाचा निकाल फिरवला होता.

दरम्यान पाच वर्षात बऱ्याच घडामोडी जाधव यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात घडल्या. विधानसभेला त्यांचा पराभव झाला, स्वतःचाच शिवस्वराज्य बहुजन पक्ष बंद करून त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. पण काही काळ या गुलाबी वादळाच्या प्रेमात पडल्यानंतर तिथेही जाधव रमले नाही, पुढे बीआरएसची तेलंगणातील सत्ताच गेली आणि महाराष्ट्रातील त्यांच्या विस्ताराला ब्रेक लागला. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकला चलो रे ची भूमिका घेतली.

आर्थिक परिस्थिती बिकट असताना जाधव यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरला आणि जमेल तसा प्रचार सुरू केला. 2019 मध्ये ट्रॅक्टर फॅक्टरच्या जोरावर संपुर्ण मतदारसंघात धुराळा उडवून देणाऱ्या जाधव यांच्याकडे मात्र, यावेळी सगळ्यांनीच पाठ फिरवली.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

पण, काल मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'टायगर अभी जिंदा है..' असे म्हणत आपल्याला सव्वा दोन लाखांवर मते मिळाल्याचा दावा केला. एकट्या कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात एक लाख मते आपल्या पारड्यात पडली, असे सांगत जाधव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मतदारसंघातील जनतेची सेवा करणार, अशी भावनिक साद घातली. वैयक्तिक आयुष्यात कितीही संकट आली, मी रस्त्यावर आलो तरी कन्नड-सोयगावच्या जनतेने माझी साथ सोडली नाही, हे कालच्या मतदानातून स्पष्ट झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT