Eknath Shinde-Uddhav Thackeray-Aditya Thackeray Sarkarnama
ब्लॉग

Shinde Group News : मुख्यमंत्री महोदय, ठाकरेंना सोडा; शिवसेना बांधणीकडे लक्ष द्या...!

Shivsena news : जनाधार नसलेल्या, नको ते उद्योग करणाऱ्या अशा पदाधिकाऱ्यांमुळे शिंदे गटाचे भवितव्य अद्याप तरी अधांतरीच लटकत आहे.

अय्यूब कादरी

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. मात्र, त्यांचा शासकीय आणि संघटनात्मक गाडा स्थिरावण्याचे नावच घेत नाही. सोळा आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, मंत्रिपद न मिळालेल्यांची नाराजी आणि त्यातच सरकारमध्ये अजितदादांच्या प्रवेशामुळे मंत्रिपदांची विभागणी झाल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. किमान महामंडळांवर तरी वर्णी लागेल, ही आमदारांची अपेक्षाही पूर्ण झालेली नाही. (CM Saheb, leave Thackeray father &son; Pay attention to ShivSena)

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून येत आहेत. काही ठिकाणी हाणामाऱ्याही झाल्या आहेत. जनाधार नसलेल्या, नको ते उद्योग करणाऱ्या अशा पदाधिकाऱ्यांमुळे शिंदे गटाचे भवितव्य अद्याप तरी अधांतरीच लटकत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सतत टीका करून जनमानसांत त्यांची सहानुभूती वाढविण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे पक्ष संघटना बळकट करण्यावर लक्ष देतील का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

राज ठाकरेंच्या फटकाऱ्याने उत्तर सभा बंद

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपद मिळाले. माझे हिंदुत्व शेंडी, जान्हव्याचे नाही, असे म्हणणारे स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान काय, असा प्रश्न जाहीरपणे विचारणारे उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी भाजपने ही खेळी केली होती. मात्र, भाजपची ही अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे यांना यश आले नाही. उलट ठाकरे कुटुंबीयांची सहानुभूती वाढत गेली. उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली, की तेथे सभा घेऊन प्रत्युत्तर देण्याची मोहीम शिंदे यांनी सुरू केली. राज ठाकरे यांनी फटकारल्यानंतर त्यांनी ते बंद केले.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

बोलघेवड्यांची भरती

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर लोकांची शिंदे गटावर प्रचंड नाराजी निर्माण झाली. त्यात शिंदेंच्या मंत्र्यांनी भर टाकली. नको त्या उद्योगांमुळे अब्दुल सत्तार यांचे कृषी खाते गेले. सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे शिंदे यांची गोची झाली. तिकडे गुलाबराव पाटील यांचेही बरळणे सुरूच होते. आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत हे तर मतदारसंघात आणि बाहेरही सातत्याने वादग्रस्त ठरले आहेत. जिल्हा नियोजन समितीचा निधी आपल्यात मतदारसंघात पळविल्यामुळे त्यांनी धाराशिव जिल्ह्यात भाजपची नाराजी ओढवून घेतली होती.

संतोष बांगर ठरले मोठी डोकेदुखी

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, तर शिंदे यांच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित बोलायचेच नसते, असे त्यांच्या मनावर कुणीतरी बिंबवले दिसते. मंत्रिपद मिळत नाही; म्हणून होत असलेली भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांची चिडचिड उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. सत्तेची भूक किती भयंकर आहे, आपला वकूब काय आहे, हे त्यांनी त्याद्वारे दाखवून दिले.

शिंदे गट तोंडघशी

आता १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेल्या विलंबामुळे लोकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचे बिलही शिंदे गटाच्या नावेच फाटणार आहे. हिंदुत्वासाठी बाहेर पडलो, हा जो नॅरेटिव्ह शिंदेंना सेट करायचा होता, तो त्यांच्या आमदारांनी आपल्या वागण्याद्वारे धुळीस मिळविला. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर तर शिंदेंच्या त्या नॅरेटिव्हचा विषयच संपला. कारण अजित पवार निधी देत नव्हते; म्हणूनच आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असेही एक कारण त्यावेळी सांगण्यात आले होते. उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केलेल्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, आम्हाला ते मान्य नव्हते, हेही एक कारण शिंदे गटाने नंतर पुढे केले होते. आता छगन भुजबळ महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे शिंदे गट तोंडघशी पडला आहे.

जिल्ह्याजिल्ह्यांत वाद

कायदेशीर लढाईत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. त्यानंतर संघटनात्मक बांधणीली वेग येणे अपेक्षित होते. विधानसभेची निवडणूक जवळ आली तरी ते होताना दिसत नाही. मंत्रिपदे, महामंडळे न मिळाल्यामुळे आमदारांची नाराजी कायम असतानाच आता पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर येत आहेत. सोलापुरात अलीकडेच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली. संघटनेत मोठा कोण, हे हाणामारीचे कारण. शिवसेना एकत्रित असताना या पदाधिकाऱ्यांची नावे बहुतांश लोकांना माहीत नव्हती. शिंदे बाहेर पडल्यानंतर अशा पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली, मात्र तिचे सोने त्यांना करता आले नाही. उलट त्यांच्या अशा वागण्यामुळे शिंदे गटाच्या प्रतिमेला हानी पोहोचत आहे.

वर्षभरातच होऊ लागली हकालपट्टीची मागणी

शिवसेनेच्या पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी करावी, अशी मागणी तालुकाध्यक्षाने केली आहे. जिल्हाप्रमुख विश्वासात घेऊन काम करत नाहीत, असा तालुकाप्रमुखांचा आरोप आहे. शिंदे पिता-पुत्रांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातही शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. गुत्तेदारीवरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात तर हास्यास्पद प्रकार घडला आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसोबत ओल्या पार्ट्या करतात, त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांना तसे निवेदन देण्यात आले आहे.

‘पन्नास खोके’ची दहशत

पक्ष संघटनेवर शिंदेंची अजिबात पकड नसल्याचे चित्र अशा प्रकारांमुळे निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करतात. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर का पडला, याचा आपल्याला हवा तसा संदेश उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी पद्धतशीरपणे पोचवला आहे. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा महाराष्ट्रातील घराघरांत पोचली आहे. मग अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदेंनी काय करायला हवे होते?

आमदार, मंत्र्यांवरील जरब संपुष्टात

सर्वात प्रथम आपल्या गटातील आमदार, वाचाळ मंत्र्यांना शांत करायला हवे होते. कठोर कारवाई केली तर आपल्यासोबतचे काहीजण उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जातील, अशी भीती त्यांना वाटत असावी. या भीतीतूनच शिंदे यांची त्यांचे आमदार आणि मंत्र्यांवरील जरब संपुष्टात आली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरही पक्ष संघटनेची म्हणावी तशी बांधणी झालेली नाही. शिवसेनेतून बाहेर पडून लोकांच्या नाराजीला बळी पडलेल्या शिंदे गटाचे भवितव्य अधांतरी आहे.

अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे

शिंदे गटाच्या पक्ष संघटनेची अशीच स्थिती राहिली आणि महाविकास आघाडीने तोडीस तोड उमेदवार दिले, तर शिंदे गटाच्या राजकीय अस्तित्वावर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे पुता-पुत्र आता तरी पक्षसंघटनेकडे लक्ष देतील काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT