Padmsingh Patil Sarkarnama
ब्लॉग

Padmsingh Patil : ...अन् धाराशिवचा दुष्काळी शिक्का पुसला; पद्मसिंह पाटलांनी नेमकं काय केलं ?

Dharashiv Ujani Water : उजनी धरणातून धाराशिवसाठी पाणी आरक्षित करून घेतले

अय्यूब कादरी

Maharashtra Political Personality : पूर्वी लातूर आणि धाराशिव मिळून एकच जिल्हा होता. त्यावेळी नेतृत्व लातूरकडे होतं. परिणामी, धाराशिवकडे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष झालं. अवर्षणग्रस्त अशी ओळख निर्माण झालेल्या धाराशिव जिल्ह्यात आता १६ साखर कारखान्यांची उभारणी झाली आहे. हा बदल चार दशकांपूर्वी सुरू झाला होता. धाराशिव जिल्ह्यातून एकही मोठी नदी वाहत नाही. पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही, तरीही सिंचनाखालील क्षेत्राचं प्रमाण चार टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर नेले.

डॉक्टर साहेबांनी दहा वर्षे राज्याचं पाटबंधारे खातं सांभाळलं. त्यांनी या पदाचा वापर आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी केला. सर्वाधिक निधी धाराशिव जिल्ह्यात आणला. त्यामुळे त्यांनी काही नेत्यांची नाराजीही ओढवून घेतली. पाटबंधारे खात्याचा सर्वाधिक निधी धाराशिव जिल्ह्यालाच का दिला जातो, अशा तक्रारी अन्य मंत्र्यांनी अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. मात्र डॉक्टर साहेबांनी त्याची कधीही पर्वा केली नाही. दुष्काळी धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करून शेतकऱ्यांना दिलासा देणे, हे त्यामागचं कारण होतं.

डॉ. पद्मसिंह पाटील हे १९७८ मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले. शेती हाच धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या जगण्याचा मुख्य आधार. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे लक्ष दिलं. १९८८ मध्ये त्यांना पाटबंधारे खात्याचं मंत्रिपद मिळालं. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे धाराशिव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची संख्या ५८ वरून थेट १२४८ वर गेली. त्यामुळे सिंचन क्षमतेत वाढ झाली आणि ३,६९,४३० एकर जमीन ओलिताखाली आली. फळबागांचे क्षेत्र २००० हेक्टरवरून ३२००० हेक्टर झाले. पाऊस चांगला झाला की उसाची लागवड वाढते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुष्काळी असा शिक्का बसलेल्या धाराशिव जिल्ह्यात उसाचं क्षेत्र वाढल्यामुळेच १६ साखर कारखाने सुरू झालेत. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात केल्यानं शेतकऱ्यांच्या दारात समृद्धीची गंगा आली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तलावांची उभारणी करण्यासाठी आता एकही साइट शिल्लक नाही. पाटबंधारे खात्याचे मंत्रिपद सांभाळताना डॉक्टर साहेबांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे ही किमया साधली गेली आहे. धाराशिव शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. माकणी आणि शहरालगतच्या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जायचा, मात्र पाऊस कमी झाला की टंचाईचे संकट आ वासून उभं राहायचं.

या समस्येवर कायमची मात करण्यासाठी डॉक्टर साहेबांनी उजनी धरणातून धाराशिवसाठी पाणी आरक्षित करून घेतले. पश्चिम महाराष्ट्राच्या धरणातील पाणी मराठवाड्यातील धाराशिवसाठी आरक्षित करून घेणं हे मोठ्या धाडसाचं काम होतं. केवळ डॉक्टर साहेबांमुळेच ते शक्य झालं. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी आयुर्वेद महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनेकतन, कृषी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT