Maharashtra Political Personality : राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांची मातृभक्ती अलौकिक अशीच होती. कॅबिनेट मंत्री असतानाही ते मातोश्रींना दररोज फिरायला बाहेर न्यायचे. ते राहायचे त्या इमारतीला त्यावेळी लिफ्ट नव्हती. त्यामुळे डॉक्टरसाहेब आपल्या मातोश्रींना पाठीवर घेऊन पायऱ्या उतरून खाली यायचे. घरी परत जाताना पुन्हा ते त्यांना पाठीवर घेऊन पायऱ्या चढायचे. मातोश्री सोलापुरातील रुग्णालयात असताना पाटील यांनी महिनाभर त्यांची काळजी घेतली होती.
डॉ. पाटील आता राजकारणात सक्रिय नाहीत. वयोमानानुसार त्यांनी स्वतःला मर्यादित करून घेतले आहे. राज्याचे गृह, ऊर्जा, पाटबंधारे आदी खाती त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. त्यांचे पुत्र, माजी राज्यमंत्री राणाजगतिसिंह पाटील हे सध्या तुळजापूरचे आमदार आहेत. त्यांचे दुसरे पुत्र पृथ्वीराज हे लंडनमध्ये सॉलिसिटर होते. ते आता मायदेशी परत आले आहेत.
डॉक्टर साहेबांच्या धाडसाचे अनेक किस्से चर्चेत असतात. त्यांच्या बुलेट प्रेमाचीही चर्चा नेहमी होत असते. ढकलून बुलेट स्टार्ट करायची आणि त्यावर स्वार होणारे डॉक्टर साहेब धाराशिवकरांनी पाहिले आहेत. त्यांचे हृदय मायेने भरलेले आहे, याचाही अनुभव धाराशिवकरांसह राज्यभरातील लोकांनी घेतला आहे.
मंत्री असताना डॉ. पद्मसिंह पाटील (Padamsinh Patil) हे मुंबईतील इमारतीत चौथ्या मजल्यावर राहायचे. त्याकाळी त्या इमारतीतसाठी लिफ्ट नव्हती. त्यामुळे अर्थातच पाऱ्यांवरून ये-जा करावी लागे. वय झाल्यामुळे त्यांच्या मातोश्रींना एकट्याने बाहेर फिरायला शक्य होत नव्हते. डॉ. पाटील यांना व्यायामाची प्रचंड आवड. ते कुठेही गेले तरी त्यांचा व्यायाम चुकत नसे. दिवसभराचे व्यस्त कामकाज सुरू होण्यापूर्वी ते पहाटे कसून व्यायाम करायचे. त्यानंतर मातोश्रींना फिरायला बाहेर न्यायचे.
लिफ्ट नसल्यामुळे पायऱ्या उतरून खाली यावे लागायचे. मातोश्रींना पायऱ्या उतरणे शक्य व्हायचे नाही. त्यामुळे त्यांना आपल्या पाठीवर बसवून डॉ. पाटील पायऱ्या उतरून खाली यायचे. त्यांचे फिरून झाले की पुन्हा पाठीवर बसवून पायऱ्या चढून घरी जायचे. त्यांच्या मातोश्रींना सोलापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर महिनाभर उपचार करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर साहेब महिनाभर हॉस्पिटलमध्येच राहिले होते. त्यांच्या मंत्रालयाचा कारभार त्यांनी तेथूनच पाहिला होता.
अडचणीतल्या महिलेला केली मदत
डॉ. पाटील खासदार असतानाचा हा किस्सा आहे. वेळ साधारण रात्री सातची. कळंब ते धाराशिव मार्गावर त्यांची गाडी धावत होती. त्याचवेळी बाळाला कडेवर घेऊन रस्त्याच्या कडेने एक महिला जात असल्याचे खासदार साहेबांच्या लक्षात आले. ते चालकाला गाडी थांबवायला सांगतात. ती महिला घरी निघाली असेल, आपण कशाला थांबायचे, असे गाडीतील त्यांचे सहकारी त्यांना सांगायचा प्रयत्न करतात. मात्र ती महिला अडचणीत असल्याचे खासदार साहेबांच्या नजरेने ओळखलेले असते.
खासदारांचे सहकारी चौकशीसाठी महिलेकडे निघताच ती आपला वेग वाढवते. शेवटी तिला थांबवून ते चर्चा करतात. ती महिला पतीशी भांडून माहेरी घराबाहेर पडलेली असते. ती माहेरी जाईल की जीवाचे काही बरेवाईट करून घेईल, असा संशय डॉक्टर साहेबांना येतो. ते थेट तिच्या सासरच्या गावातील लोकांशी संपर्क साधून तिला आपल्या वाहनातून गावात तिच्या घरी नेऊन सोडतात. पती-पत्नीची समजूत घालतात आणि त्यांच्या संसाराचा गाडा रुळावर येतो.
लौकिकार्थाने सिंहासारखी पराक्रमी प्रतिमा असणाऱ्या या नेत्याचे काळीज मात्र अत्यंत मायेने भरलेले आहे. मंत्रिपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत कामं करताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांचीही कामे त्यांनी तितक्याच तत्परतेने केली. डॉक्टर साहेब मंत्री असताना धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक लोक कामांसाठी मंत्रालयात यायचे. ते त्यांना सोबत घऊन ज्या ठिकाणी त्याचं काम आहे तिथपर्यंत जायचे. काम झाले की त्याच्या जेवणाची सोय करायचे. पीएकडे तिकीटाची रक्कम देऊन संबंधित माणसाच्या जेवणाची सोय करून त्याला बसमध्ये बसवूनच या, अशी सूचना द्यायचे.
शरद पवारांची सावली
राजकारणात सक्रिय असेपर्यंत डॉक्टरसाहेब हे शरद पवार यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांनंतर तेच होते. शरद पवारांसाठी काहीही, म्हणजे अगदी काहीही करण्याची त्यांची तयारी असायची. १९९१ मध्ये शरद पवार यांच्याविरुद्ध काहीजणांनी बंड केलं होतं. डॉक्टरसाहेब त्या बंडाला मोठ्या धाडसाने सामोरे गेले होते.
त्यावेळी काँग्रेसच्या एका नेत्याचा हात त्यांनी आपल्या हातात घेऊन दाबला की त्या नेत्याच्या डोळ्यांत पाणी आले. काँग्रेसचे एका तत्कालिन सरचिटणीसांचा पवारांच्या विरोधातील बंडाला पाठिंबा होता. डॉक्टर साहेब आणि ते एकाच केबिनमध्ये बसले होते. समोर टेबलावरील फोनची घंटा खणाणली. दोघांचेही हात फोनच्या रिसिव्हरकडे गेले. डॉक्टरसाहेबंनी फोन उचलला, मात्र उचलता उचलता रिसिव्हर त्या नेत्याच्या तोंडावर आपटला गेला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यंत्रिपदाची संधी हुकली...
संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार दिल्लीला गेले. त्यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदी डॉक्टरसाहेबांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असे शरद पवार यांच्या सर्व निकटवर्तीयांची इच्छा होती. मात्र ती संधी हुकली आणि सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.