Eknath Khadse vs Chandrakant Patil Political struggle in jalgaon politics Sarkarnama
ब्लॉग

Eknath Khadse : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण

Eknath Khadse downfall : एकनाथ खडसे यांचे 40 वर्षांचे राजकीय साम्राज्य भ्रष्टाचाराचे आरोप, भाजप नेतृत्वातील नाराजी आणि शिवसैनिक चंद्रकांत पाटील यांच्या उदयानंतर कोसळले.

Sachin Waghmare

Maharashtra politics : एकनाथ गणपतराव खडसे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षांचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसले. पण मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपाचेच नेते खडसे यांना 'कोण होतास तू? काय झालास तू? अशा शब्दांमध्ये हिणवत आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे तो एक शिवसैनिक. याच शिवसैनिकांने खडसेंचं राजकारण जवळपास संपवत आणलं आहे. अर्थात याला भाजपमधील छुपा पाठींबाही होताच.

नेमकं खडसे यांचा राजकारणाचा उदय कसा झाला आणि कसं एका शिवसैनिकांने त्यांचं राजकारण संपवतं आणलं तेच आपण आज पाहूया...

ज्यावेळी जनसंघ आणि भाजप यांना महाराष्ट्रात कोणता जनाधार नव्हता त्यावेळी एकनाथ खडसेंनी भाजपच्या माध्यमातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. एक-एक कार्यकर्ता जोडून, उभा महाराष्ट्र पालथा घालून त्यांनी भाजपला रुजवलं आणि वाढवलं. या काळात त्यांना अनेक धक्के बसले मात्र ते कधीच डगमगले नाहीत, ते स्वत:च्या कार्य कर्तृत्वावर उभे राहिले. 1988 मध्ये ते जळगाव जिल्ह्यातील कोथळी गावचे सरपंच झाले. 1989 मध्ये ते पहिल्यांदा पूर्वीच्या एदलाबाद आणि आताच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून 2019 पर्यंत त्यांनी सलग सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

1995-1999 या काळात राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर ते पहिल्यांदा मंत्री झाले. यावेळी भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात त्यांनी पाटबंधारे मंत्री आणि नंतर अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2009-2014 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले, ज्यामुळे 2014 च्या निवडणुकीत भाजपला विजय मिळवण्यात मदत झाली. भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? अशी चर्चा झाली त्यात एकनाथ खडसे यांचे नाव अग्रक्रमाने पुढे आले होते. पण केंद्रातून देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद मिळाला. पण या सरकारमध्ये ते महसूल, कृषी, अल्पसंख्याक, राज्य उत्पादन शुल्क यांसह जवळपास 12 खात्यांचे मंत्री होते. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जात होते.

एकनाथ खडसे यांनी राजकारण करीत असताना जळगाववरती एकहाती वर्चस्व ठेवले होते. सर्वच सत्ता केंद्र त्यांच्या ताब्यात होती. खडसे राजकारणात एक एक पायरी वर जात असतानाच त्यांना मुलाच्या निधानाचा सर्वात मोठा धक्का सहन करावा लागला. पण या धक्क्यातून सावरत त्यांनी सून रक्षा खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांना राजकारणात आणलं. खडसे कुटुंबाचं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं एका बाजूला सुरु असताच खडसे यांच्या राजकारणाला मोठा धक्का बसला तो 2016 मध्ये. 2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. इथूनच त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागायला सुरुवात झाली.

2016 मध्ये महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्यातील जमीन व्यवहार आणि इतर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. या आरोपांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधून त्यांना राजीनामा द्यावा लागला. हा त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठा धक्का होता. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले नेते केवळ 2 वर्षांत मंत्रिपदावरून दूर झाले होते. इथून मग चंद्रकांत निंबा पाटील या शिवसैनिकाने खडसे यांना पुन्हा राजकारणात वर येऊच दिले नाही. खडसे यांचं 40 वर्षांच्या राजकारणाला आधी भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपांमुळे, राजीनाम्यामुळे मग चंद्रकांत निंबा पाटील यांच्या वाढत गेलेल्या ताकदीमुळे जोरदार हादरे बसले.

चंद्रकांत निंबा पाटील हे सुरुवातीपासूनच शिवसेना पक्षाशी जोडलेले होते. संघर्षातून त्यांनी जळगाव जिल्ह्यात शिवसेना वाढवली. शिवसेनेत सुरुवातीला तालुकाप्रमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख म्हणून पक्षाची जबाबदारी मोठ्या हिंमतीने सांभाळली. ते शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. जिल्हाप्रमुख या नात्याने, त्यांनी केवळ मुक्ताईनगरमध्येच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी केली आणि शिवसेनेचे कार्य तळा गाळापर्यंत पोहोचवले. शिवसैनिक आणि कार्यकर्ते: त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना पक्षात संधी देऊन, शिवसेनेचा स्थानिक पातळीवरील आधार वाढवला.

जळगाव जिल्ह्यात, विशेषतः मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला आव्हान देणारा चेहरा म्हणून ते शिवसेनेकडून उभे राहिले, ज्यामुळे शिवसेनेला या भागात बळ मिळाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने खडसे यांच्याविरोधात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यावेळी खडसे यांनी शिवसेनेसोबतची युती तोडण्यासाठी पुढाकार घेतल्याने शिवसैनिकांचा खडसे यांच्यावर विशेष राग होता. याच रागातून शिवसैनिक खडसे यांच्याविरोधात त्वेषाने लढले. त्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील पराभूत झाले पण दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या लढतीने त्यांना एक महत्त्वाचा राजकीय चेहरा म्हणून स्थापित केले.

2019 मध्ये मात्र चंद्रकांत पाटील यांची जायंट किलर म्हणून खरी ओळख निर्माण झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दूर व्हावे लागलेल्या खडसे यांना भाजपने तिकीट नाकारले. त्यांच्या ऐवजी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपने तिकीट दिले. भाजप-शिवसेना युतीमुळे चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी रोहिणी खडसे जरी उमेदवार असल्या तरीही त्यांच्या मागे एकनाथ खडसे यांनी सर्व ताकद लावली होती. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची त्यांचीही धडपड होती. पण खडसे विरोधकांनी चांगलेच डावपेच आखले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन चंद्रकांत निंबा पाटील यांना पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांना मदत केल्याची चर्चा आहे. निकाल लागल्यानंतर चंद्रकांत पाटील घसघशीत मतांनी निवडून आले होते. खडसे कुटुंबाचा पराभव करून ते आमदार झाले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना तालुक्याच्या राजकारणात प्रत्येक ठिकाणी आव्हान दिले. दूध संघ, जिल्हा बँक, नगरपंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत चंद्रकांत पाटील विरुद्ध एकनाथ खडसे हा संघर्ष बघायला मिळाला. या संघर्षाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही सातत्याने खतपाणी घातले.

याच घुसमटीतून अखेर एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली. ज्या राष्ट्रवादीविरोधात खडसे यांनी उभा आयुष्य संघर्ष केला त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2020 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, 2022 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्य संपर्कात आले. त्यांना राजकारणात पुन्हा स्थिरस्थावर करण्याचे आश्वासन मिळाले. त्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. पण भाजपमध्ये प्रवेश आजतागायत होऊ शकलेला नाही.

खरंतर एकनाथ खडसे यांचे राजकारण संपले असे म्हणण्याऐवजी, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा ब्रेक लागला किंवा त्यांच्या प्रभावाचे केंद्र बदलले, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. सुमारे चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भाजपमध्ये अत्यंत शक्तिशाली नेते म्हणून कार्यरत असलेल्या खडसे यांच्या राजकीय प्रवासात 2016 नंतर तीन प्रमुख टप्प्यांमध्ये बदल झाले, ज्यामुळे त्यांचा पूर्वीचा दबदबा कमी झालाय .

दुसरीकडे भाजप हायकमांडकडून त्यांचे कट्टर विरोधकी असलेले मंत्री गिरीश महाजन यांना मोठे करण्यात आले. महाजन नेहमीच खडसे यांना डिवचत राहिले. त्यामुळे खडसे यांचे खच्चीकरण झाले. महाजन यांच्या विरोधामुळे खडसे यांचा भाजप प्रवेश रोखला गेला. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. खडसे यांनी त्यांचा प्रचार केला. मात्र, त्यांचा शिवेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला. इथेही गिरीश महाजन यांनीच पडद्यामागून भूमिका बजावली.

चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबीयांना स्थानिक राजकारणात कशा प्रकारे आव्हान दिले, याचे उदाहरण मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होते. मुक्ताईनगर नगरपंचायतीवर अनेक वर्षे खडसे कुटुंबीयांचे राजकीय वर्चस्व राहिले होते. भाजपने मुक्ताईनगर शहरात स्वतंत्र भाजपचे पॅनल उभे केले आहे. तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे (Shivsena) पॅनल स्वतंत्र उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. निवडणूक प्रचारवेळी व मतदानाच्या दिवशी या दोन गटात मोठा संघर्ष पाहवयास मिळाला.

निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुक्ताईनगरमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला. या सर्व घटनाक्रमांनंतर रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा दावा करीत शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही कार्यकर्त्यांच्या जत्थ्यासह जाऊन शिवसेना कार्यकर्त्यांची देखील तक्रार घ्यावी, असे पोलिसांना म्हटले. तसेच शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटलांनी लावून धरली. यातून स्थानिक राजकारणापासून राज्य पातळीवरील राजकारणात खडसे यांच्याविरोधात एक शिवसैनिक काय त्वेषाने लढतोय याची प्रचिती आपल्याला येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT