Indrajeet Gupta
Indrajeet Gupta  Sarkarnama
ब्लॉग

Indrajeet Gupata News : राजकारणातील नीतिमूल्यांचा महामेरू : इंद्रजित गुप्ता

अय्यूब कादरी

CPI News : काही सन्माननीय अपवाद वगळले तर सध्याच्या काळात राजकीय नेते आणि तत्त्वांचा फारसा संबध नसल्याचे दिसून येईल. थोडंस यश काय मिळतं, नेते आपला मूळ पक्ष सोडून स्वतःचा पक्ष तरी स्थापन करतात किंवा अन्य पक्षात तरी उड्या मारतात, असे चित्र अलीकडच्या काळात आपण पाहात आहोत. काही वर्षांपूर्वी सर्वच पक्षांत तत्त्वनिष्ठ, विचारांवर श्रद्धा ठावणारे नेते होते. इंद्रजित गुप्ता हे असेच एक तत्त्वनिष्ठ राजकीय नेते.

भारतीय कम्युनिष्ट पक्षात (सीपीआय़) त्यांनी 60 वर्षं घालवली आणि 11 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. सर्वाधिक वेळा लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा विक्रम त्यांच्याच नावे आहे. स्वातंत्र्यसैनिक ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. या प्रवासात त्यांनी आपल्या तत्त्वांशी कुठंही तडजोड केली नाही. देशाचे गृहमंत्री असतानाही त्यांनी स्वतःसाठी बंगला घेतला नव्हता. दोन खोल्यांच्या घरात ते राहायचे.

इंद्रजित गुप्ता (Indrajeet Gupta) यांचा जन्म कोलकाता येथे 15 मार्च 1999 रोजी झाला. त्यांचे वडील सतीश गुप्ता हे अकॉउंटंट जनरल होते. केंद्रीय विधानसभेचे सचिव म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यांचे मोठे बंधी रणजित गुप्ता आयसीएस (आताचे आयएएस) हे पश्चिम बंगालचे मुख्य सचिव होते. इंद्रजित गुप्ता यांचे आजोबा बिहारीलाल गुप्ता हेही आयसीएस होते. (Indrajeet Gupata News)

वडिलांची नियुक्ती सिमला येथे असल्यानं त्यांचं शालेय शिक्षण तिथंच झालं. दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून 1937 मध्ये इंद्रजित गुप्ता पदवीधर झाले. लंडनच्या केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एमए केलं. या काळातच त्यांचा साम्यवादी चळवळीशी संबंध आला. त्यानंतर त्यांनी मार्क्सवाद समजून घेतला. 1940 मध्ये ते भारतात परतले आणि सीपीआयचे सदस्य झाले. त्यावेळी या पक्षावर बंदी होती, त्यामुळे भूमिगत राहून या पक्षाचं काम सुरू होतं. 1942 मध्ये त्यांनी कामगार संघटनेत कामाला सुरुवात केली.

जूट मजुरांच्या आंदोलनासोबत त्यांनी या क्षेत्रातील काम सुरू केलं. कामगार संघटनेत ते अनेक वर्षे सक्रिय राहिले. मजूर, कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर सघर्ष केला. खासदार असतानाही त्यांनी कामगारांच्या समस्या संसदेत आणि बाहेरही अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. 1980 ते 1990 दरम्यान त्यांनी आयटक या कामगार संघटनेचं सरचिटणीसपद भूषवलं.

इंद्रजित गुप्ता यांची 1990 मध्ये भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या (CPI) सरटिणीसपदी निवड झाली. पुढे सहा-सात वर्षे ते या पदावर राहिले. तत्पूर्वी, 1960 मध्ये कोलकाता दक्षिण पश्चिम मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली. 1960 ते 2001 पर्यंत सलग लोकसभेवर निवडून गेले. अपवाद 1977 चा. पश्चिम बंगालमधील मिदनापूर, कलकत्ता दक्षिण पश्चिम, अलीपूर आणि बसीरहाट मतदारसंघांचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं.

संसदेचे ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे त्यांना फादर 'ऑफ द हाऊस' असं म्हटलं जायचं. 1947 नंतर सीपीआयवर काही वेळा बंदी घालण्यात आली होती. त्यामुळं केंद्राच्या राजकारणात या पक्षाला मोठी स्पेस मिळाली नाही. इंद्रजित गुप्ता यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात या पक्षाला संधी मिळाली होती. एच. डी. देवेगौडा (HD Dewegouda) आणि इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना त्यांनी गृहमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1996 मध्ये ते गृहमंत्री बनले.

इंद्रजित गुप्ता यांचा अभ्यास दांडगा होता. संसदेत त्यांनी केलेल्या भाषणांतून त्याची प्रचीती येत असे. सभागृहाच्या नियमांची त्यांना खडान् खडा माहिती होती. प्रभावी वक्तृत्वशैली, अभ्यासू मांडणीच्या बळावर विविध विषयांवरील चर्चेदरम्यान ते सत्ताधाऱ्यांची कोंडी करायचे. कोणत्याही मुद्द्यावर ते आकांडतांडव करत नसत.

आपली बाजू अत्यंत मृदू भाषेत ते मांडायचे. सार्वजनिक जीवनात नेत्यांनी आदर्श निर्माण केला पाहिजे, या मताचे ते होते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी, राजकारण, प्रशासनातील भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. लोकशाही आणि संविधानिक यंत्रणांच्या बळकटीकरणासाठी त्यांना 1992 मध्ये पहिला 'भारतरत्न पंडित गेविंद वल्लभ पंत उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.

तो काळच वेगळा होता. इंद्रजित गुप्ता यांनी पक्षाचा विश्वास 11 निवडणुकांमध्ये सार्थ ठरवला. लोकसभेची निवडणूक त्यांनी 12 वेळा लढवली. एका निवडणुकीत त्यांना पराभाव स्वीकारावा लागला. 1977 मध्ये अलीपूर मतदारसंघात अशोक कृष्ण दत्त यांनी त्यांचा पराभव केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लागू केली होती. गुप्ता यांच्या पक्षाने आणिबाणीचे समर्थन केले होते. पक्षाच्या या निर्णयाला गुप्ता यांनीही पाठिंबा दिला होता. त्याचा फटका त्यांना बसला आणि 1977 च्या निवडणुकीत गुप्ता यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

केंद्रीय गृहमंत्री बनलेले इंद्रजित गुप्ता पहिलेच कम्युनिष्ट नेते होते. खासदारांना दिल्लीतील वेस्टर्न कोर्ट येथील निवासस्थाने दिली जातात. या ठिकाणी राहण्यासाठी दिग्गज खासदारांची नापसंती असते. गुप्ता यांना वेस्टर्न कोर्ट इथं दोन खोल्यांचं घर मिळालं होतं. देशाचे गृहमंत्री बनल्यानंतरही त्यांनी हे दोन खोल्यांचं घर सोडलं नव्हतं.

गृहमंत्री म्हणून त्यांना आलिशान बंगला, प्रचंड सोयी-सुविधा मिळाल्या असत्या, मात्र त्या सर्व सोयी-सुविधा त्यांनी नाकारल्या. दोन खोल्यांच्या घरातूनच ते कामकाज पाहायचे. आयुष्यभर त्यांचे राहणीमान साधेच राहिले. सध्याच्या घडीला असे चित्र देशभरात कुठेही दिसणार नाही. केंद्रासह राज्यातील विविध सरकारामंध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे घडली. कम्युनिष्ट पक्षांचे नेते मात्र भ्रष्टाचारात अडकल्याचे पाहायला मिळत नाही.

कोलकाता येथे 20 फेब्रुवारी 2001 रोजी इंद्रजित गुप्ता यांचं निधन झालं. उपलब्ध सर्व सुख-सुविधांना देशाची सेवा करण्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बाजूला सारणाऱ्या शेवटच्या पिढीत इंद्रिजत गुप्ता यांचा समावेश होतो. महाविद्यालयीन जीवनात गुप्ता आणि त्यांच्यासारख्या अनेकांची पावले साम्यवादाकडे वळली होती.

मोहन कुमारमंगलम, भूपेश गुप्ता, ज्योती बसू आणि इंद्रजित गुप्ता हे समकालीन होते. ज्योती बसू हे सलग 23 वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिले. देशावरील इंग्रजांची सत्ता लवकरच संपुष्टात येईल आणि कम्नुनिष्टांना मोठी स्पेस मिळेल, असे या सर्वांना 1930 च्या अखेरीस वाटले होते. मात्र स्वातंत्र्यानंतर तसे झाले नाही.

डाव्या पक्षाचे खासदार, गृहमंत्री यापेक्षा भारतीय राजकारणात राजकीय मूल्ये, तत्त्वे जोपसण्यात इंद्रजित गुप्ता यांचे योगदान मोठे आहे. गांधीजींसारखी साधी राहणी, लोकशाहीबाबत व्यापक भूमिका आणि अतूट निष्ठा हे गुण इंद्रजित गुप्ता यांच्यात होते, अशा शब्दांत तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्यांना आदरांजली वाहिली होती.

गुप्ता गृहमंत्री असताना भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष होता. सभागृहात विविध मुद्द्यांवरून खडाजंगी होत असे. विरोधकांकडून आरोप केले जायचे. अख्खा दिवस वादळी चर्चेत जायचा. विरोधी बाकांवर असतो तर मीही आपल्यासारखीच भूमिका घेतली असती, असं ते विरोधकांना सांगायचे. निवडणूक सुधारणांबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय खासदारांची समिती स्थापन करण्यात आली होती. 1999 मध्ये समितीनं आपला अहवाल निवडणूक आयोगाला दिला होता. आयोगानं त्यातील अनेक शिफारशी लागू केल्या होत्या.

चीनच्या मुद्द्यावरून 1964 मध्ये भारतीय कम्यनिष्ट पक्षात फूट पडली. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखालील मूळ पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिलमध्ये गुप्ता यांचा समावेश होता. डांगे यांच्या गटाचा ठराव त्यांनीच तयार केला होता. आणिबाणीनंतर डांगे यांच्या काँग्रेसला पूरक अशा भूमिकेला त्यांनी आक्षेप घेतला, पण पक्षशिस्तीच्या चौकटीतच.

गुप्ता यांनी पक्षाच्या व्यासपीठाच्या बाहेर जाऊन डांगे यांच्या भूमिकेला कधीही विरोध केला नाही. काँग्रेससोबत (Congress) जाण्याबाबतही त्यांचं मत सकारात्मक नसायचं. 1996 मध्ये युनायटेड फ्रन्टच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता, मात्र पक्षात ते अल्पमतात आल्यामुळं त्यांचा विरोध मावळला होता.

वैयक्तिक जीवनातही गुप्ता यांनी सभ्यता, शालीनता आणि मर्यादांचे पालन केलं. सुरैय्या यांच्यावर त्यांचे प्रेम होते. सुरैय्या या छायाचित्रकार अहेमद अली (समाजवादी विचारसरणीच्या नेत्या, अभिनेत्री नफीसा अली यांचे वडील) यांच्या पत्नी होत्या. ते दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले. त्यानंतरच वयाच्या 62 व्या वर्षी गुप्ता यांनी सुरैय्या यांच्याशी विवाह केला.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर गुप्ता यांनी कम्युनिष्ट पक्षाची आचारसंहिता अंगिकारली होती. त्यापासून ते कधीही दूर गेले नाहीत. वेस्टर्न कोर्ट भागात दोन खोल्यांच्या घरात ते राहायचे. घरात लुंगी आणि बुशर्ट अशा पेहेरावत ते काम करायचे.

मित्र, नातेवाईक यांच्याशिवाय कुणाचंही निमंत्रण त्यांनी स्वीकारलं नाही, म्हणजे अनोळखी लोकांच्या कार्यक्रमांना ते कधीही गेले नाहीत. पार्ट्यांनाही ते जायचे नाहीत. मंत्री असताना विमानतळावर विमानं थांबतात तेथे त्यांची कार आणायची नाही, अशी स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना देऊन ठेवली होती.

विमान कंपनीच्या कारमधूनच ते बाहेर यायचे. मंत्री व्हायच्या आधी ते वेस्टर्न कोर्ट येथील घरापासून संसदेपर्यंत पायीच ये-जा करायचे. राजकीय जीवनात गुप्ता यांनी रुजवलेली ही नैतिक मूल्ये आहेत. ते कम्युनिष्ट पक्षाचे खासदार, गृहमंत्री तर होतेच. याशिवाय भारताच्या राजकारणात राजकीय नितीमूल्यांची भर घालणारे नेते, अशीही त्यांची ठळक ओळख आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT